संगीत पुण्यप्रभाव
'संगीत पुण्यप्रभाव' हे राम गणेश गडकरी यांचे स्वतःची पद्यरचना असलेले हे एकमेव पूर्ण नाटक आहे. हे नाटक १९१६ च्या जून-जुलैच्या सुमारास रंगभूमीवर आले. पण त्याचे लेखन गडकऱ्यांनी १९१४ च्या सुमारास सुरू केले होते. भारतीय संस्कृतीत स्त्रियांच्या पातिव्रत्याला व तिच्या त्यागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून 'पातिव्रत्य' हा विषय केंद्रीभूत ठेवून त्यांनी कथेची कल्पनारम्य उभारणी करून हे नाटक लिहावयास घेतले.
गडकरी नाटके नेहमी उलट्या क्रमाने लिहीत. 'पुण्यप्रभाव'चा सहाव्या अंकातील शेवटचा वृंदावन-वसुंधरेचा हार घालण्याचा अटीतटीचा प्रवेश प्रथम लिहून व सहावा अंक प्रथम लिहून, उरलेले अंक उलट्या क्रमाने लिहून व शेवटी पहिला अंक लिहून त्यांनी नाटक पूर्ण केले.
नाटक मंडळीत पुण्यप्रभाव
संपादनसन १९१३ च्या सुमारास किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीत काही कारणामुळे फाटाफूट होऊन टेंबे, बोडस व बालगंधर्व कंपनीतून बाहेर पडले व त्यांनी समाईक भागिदारीची गंधर्व नाटक मंडळी स्थापन केली. साहजिकच किर्लोस्कर नाटक मंडळीचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे कंपनीचे मालक शंकरराव मुजुमदार नव्या नाटकाच्या शोधात होते. गंधर्व नाटक मंडळीसुद्धा स्वतःच्या हक्काच्या नव्या नाटकाच्या शोधात होती.
दरम्यान राम गणेश गडकरी यांनी नवीन नाटक लिहावयास घेतल्याचे बोडसांना समजले. त्यांनी या नाटकाची मागणी गडकऱ्यांकडे केली. म्हणून गडकऱ्यांनी 'पुण्यप्रभाव'चा ६व्या अंकाचा शेवटचा प्रवेश वाचावयास दिला. तो वाचून बोडस खूश झाले. गंधर्व मंडळीत त्याचे वाचन करण्यास हस्तलिखित गडकऱ्यांच्या परवानगीने घेऊन गेले.
गडकऱ्यांची अटी आणि गंधर्व मंडळीचा नकार
संपादनगंधर्व कंपनीने 'संगीत पुण्यप्रभाव' हे नाटक घेण्याचे ठरविले, त्याप्रमाणे गडकऱ्यांना कळविले गेले. गडकरी यांना गंधर्व कंपनीला तीन अटी घातल्या. त्या ऐकून कंपनी नाटक स्वीकारायला नकार दिला.
गडकऱ्यांनी घातलेल्या अटी
संपादन१) नाटक पदांसहित लिहून झाल्यावर चार महिन्यांच्या मुदतीत तालमी घेऊन त्याचा प्रयोग केला जावा.. पदांच्या चाली गंधर्व कंपनीने द्याव्यात, पदे गडकरी लिहून देतील.
२) पात्रांची वाटणी गंधर्व कंपनीने करावी. पण कालिंदीचे काम करणारा नट गडकरी ठरवतील.
३) कंपनीने नाटकाच्या हक्काप्रीत्यर्थ गडकऱ्यांना ३००० रुपये द्यावेत.
ज्या काळात ‘कोल्हटकर आणि खाडिलकर यांना २००० ते २५०० रुपये मिळत होते, त्या काळात गडकऱ्यांना ३००० रुपये कसे देणार’ या कारणास्तव बोलणी फिस्कटली आणि गंधर्व मंडळीने नाटक स्वीकारण्यास नकार दिला..
==नाटक पूर्ण झाले आणि गडकऱ्यांनी पदांसहित नाटक ६ महिन्यांत लिहून पूर्ण केले व किर्लोस्कर नाटक कंपनीच्या हवाली केले. चिंतामणराव कोल्हटकरांनी नाटक बसविले.
नाटकातील भूमिका
संपादनपुण्यप्रभाव नाटकाचा संगीत प्रयोग किर्लोस्कर कंपनीच्या रंगमंचावर १ जून १९१६ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला. त्या प्रयोगात पुढील नटांनी भूमिका केल्या- १) वृंदावन (चिंतामणराव कोल्हटकर) २) भूपाल (विसूभाऊ भडकमकर) ३) नुपूर (चिंतोबा गुरव (दिवेकर)) ४) कंकण (बाबूराव गाडेकर) ५) सुदाम (कृष्णराव मिरजकर) ६) युवराज (मास्टर रत्नू) ७) राजा (महाडकर) ८) ईश्वर (यशवंतराव आठवले) ९) वसुंधरा (कृष्णराव कोल्हापुरे) १०) कालिंदी (विनायकराव बेहेरे) ११) किंकिणी (मास्टर दीनानाथ मंगेशकर) १२) दामिनी (बाळकोबा गोखले)..
पहिला प्रयोग तुफान रंगला. मुंबईकर प्रेक्षक-रसिक आनंदून गेले. वृत्तपत्रांतून स्तुतीचा वर्षाव झाला. बेहेरे, कोल्हापुरे व मास्टर दीनानाथांच्या गायनाने प्रेक्षकांची पकड घेतली. किर्लोस्करच्या नटवर्गाचे सर्वतोपरी कौतुक झाले. ओळीने चार प्रयोग मुंबईस झाले. पुणेकर प्रेक्षकांनी व विद्वानांनी 'पुण्यप्रभाव'चे सहर्ष स्वागत केले, तर नागपूरकरांनी नाटक डोक्यावर घेतले.
नाटकाचे संगीत
संपादननाटकातील काही पदांच्या चाली त्या वेळच्या प्रख्यात गायिका/गायक मलकाजान, गोहरजान, मौजुद्दीन, प्यारासाहेब, झोराबाई यांच्या ग्रामोफोनवर उपलब्ध असलेल्या विविध ढंगाच्या शास्त्रीय चिजांवरून आणि काही चाली गोव्याच्या हिराबाई पेडणेकरांकडून घेतल्या. काही चाली पारंपरिक होत्या.
नाटकातील पदे
संपादन- अनुकार जनाने कालांतरी थोरपदा
- करा करुणामया
- घडे नाथा प्रमाद जरि आतां क्षमाच तरि हो तयां
- चतुराचातुरी
- नाचतना गगनात नाथा
- निरोप घ्यावा माझा
- प्रलयाची हतदशा
- बोल ब्रिजलाला रे
- 'रंग अहा भरला
- रणवीर कुमारा
- वाजीव रे बाळा वेल्हाळा रुमझुम घुंगुरवाळा
- सदा रंगे या हृदयी तरंगे, वगैरे वगैरे.
नाटकाची लोकप्रियता
संपादनसंगीत पुण्यप्रभाव या नाटकाची लोकप्रियता किमान १०० वर्षे टिकली. या नाटकाच्या लोकप्रियतेचे पहिले कारण म्हणजे गडकऱ्यांची अद्बितीय असामान्य भाषाशैली व अंकागणिक तीव्र होत जाणारा नाटकाती संघर्ष. दुसरे कारण म्हणजे या नाटकासाठी वेगवेगळ्या नाटक कंपन्यांचा मिळालेला सर्वोत्कृष्ट नटवर्ग. हे नाटक 'महाराष्ट्र नाटक मंडळी' 'किर्लोस्कर', 'बलवंत', 'ललित कलादर्श', 'मनोरमा संगीत मंडळी', 'यशवंत नाटक मंडळी', हिराबाई बडोदेकरांची 'नूतन नाट्य संगीत मंडळी', तसेच गोव्याकडच्या अनेक लहान-मोठ्या नाटक मंडळ्या गद्य व संगीत स्वरूपात करीत असत.
चित्रकार-नेपथ्यकार पु.श्री. काळे आपल्या 'ललितकलेच्या सहवासात' या पुस्तकात म्हणतात, 'पुण्यप्रभाव इतके लालित्यपूर्ण दुसरे नाटक 'ललितकलादर्श'च्या रंगमंचावर पूर्वी व नंतर आले नाही.' अरविंद पिळगावकर, , केशवराव दाते, चिंतामण कोल्हटकर, जयश्री शेजवाडकर, मास्टर दत्ताराम, दामुअण्णा मालवणकर, मास्टर दीनानाथ मंगेशकर, नयना आपटे, नानासाहेब फाटक, नूतन पेंढारकर (मास्टर दामले), बापूराव पेंढारकर, भार्गवराम आचरेकर, रजनी जोशी, राजा गोसावी, वसंत शिंदे अशा मोठ्या नटनट्यांनी हे नाटक केले.