हिराबाई पॆडणेकर (जन्म :सावंतवाडी २२ नोव्हेंबर १८८६; - पालशेत-रत्‍नागिरी १८ ऑक्टोबर १९५१) [ संदर्भ हवा ] या मूळच्या कोकणातल्या. पण त्यांचे बालपण, शिक्षण, लेखन मुंबईतील गिरगावात झाले. शिक्षणामुळेच स्त्रियांची स्थिती सुधारेल, असा त्यांना विश्वास होता, आणि स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी ते सिद्ध करून दाखवले. त्यांच्या घराण्यातच नृत्य, संगीत या कला होत्या. त्यांना चागले संस्कृत येत होते. त्यांचे संगीतातले अधिक शिक्षण भास्करबुवा बखले यांच्याकडे झाले.

गुर्जरशास्त्री यांच्याकडून हिराबाईंनी, संस्कृत नाट्यशास्त्र, आणि नाट्यवाङ्‌मय यांच्या सूक्ष्म अभ्यासासाठी मार्गदर्शन घेतले. गोविंद बल्लाळ देवल यांच्या प्रेरणेने त्यांना मराठी नाटकाची गोडी लागली. पुढे मराठी साहित्यिक राम गणेश गडकरी, बालकवी ठोंबरे यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यानंतर हिराबाई पेडणेकरांचा अण्णासाहेब किर्लोस्कर आणि बालगंधर्व यांच्यासारख्या नाट्यक्षेत्रातील मंडळींशी, आणि पुढे नानासाहेब फाटक, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याशी घनिष्ट संबंध आला. या मंडळींकडून स्फूर्ती घेऊन हिराबाई पेडणेकर स्वतःच नाटककार झाल्या.

हिराबाईंनी वयाच्या विशीत १९०५ साली पहिले नाटक लिहिले ते 'जयद्रथ विडंबन.' ते रंगभूमीवर आले नसले तरी अनेकांनी ते वाचून हिराबाईंची प्रशंसा केली. त्यांचे 'संगीत दामिनी' (पहिला प्रयोग १९०८, पुस्तकरूपाने प्रकाशित सन १९१२) हे नाटक त्यानंतर काही वर्षांनी रंगभूमीवर आले आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासात एक ऐतिहासिक नोंद झाली. कारण स्त्रीने लिहिलेले हे पहिले नाटक होते. किर्लोस्कर मंडळींनी हे नाटक करावे अशी हिराबाईंची इच्छा होती, पण ते घडू शकले नाही. 'ललितकलादर्श'ने या नाटकाला यश मिळवून दिले आणि ते चार वर्षे रंगभूमीवर गाजत राहिले. हिराबाई पेडणेकर केवळ नाटक लिहीत नव्हत्या तर कविता-निबंधलेखनही करत. त्या काळातल्या अव्वल दर्जाच्या 'मनोरंजन' मासिकात त्यांचे लेखन प्रसिद्ध होई. [१] त्यांनी लिहिलेल्या मीराबाईच्या आणि कवी जयदेवाची पत्नी यांच्यावरच्या दोनही नाटकांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.

हिराबाई पेडणेकरांच्या जीवनावर वसंत कानेटकरांनी 'कस्तुरीमृग' हे नाटक लिहिले होते.

संगीतकार म्हणून कारकीर्द संपादन

हिराबाईंनी श्री.कृ.कोल्हटकरांच्या 'प्रेमशोधन' (१९१०) या आणि गडकऱ्यांच्या 'पुण्यप्रभाव' (१९१६) या नाटकांना संगीत दिले होते.

हिराबाई पेडणेकरांसंबंधी पुस्तके संपादन

  • कस्तुतीमृग (नाटक, लेखक - वसंत कानेटकर)
  • आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर (चरित्र, लेखिका - शिल्पा सुर्वे)

संदर्भ संपादन

  1. ^ Gender, Culture, and Performance: Marathi Theatre and Cinema before Independence, ले. मीरा कोसंबी, रूटलेज प्रकाशन, जुलै २०१७.

हिराबाई आणि कोल्टकर- म.ल. वऱ्हाडपांडे