अनंतदास रामदासी
बालपण
संपादनअनंतदास रामदासी यांचा जन्म वडील श्री. मोरेश्वर लोहोकरे व आई सौ. रंगुबाई ( सरस्वती बाई ) लोहोकरे या भोर जि. पुणे येथील सत्शील माता पित्यांच्या पोटी अधिक ज्येष्ठ शुद्ध 10, शके 1807 या तिथीला झाला. त्यांचे पूर्ण नाव श्री. दत्तात्रय मोरेश्वर लोहकरे हे होते.
श्री. दत्तात्रय यांना लहानपणीच सद्ग्रंथ वाचनाची व सत्संग श्रवणाची गोडी लागली होती. त्याचा परिणाम म्हणून हा संसार मिथ्या आहे हे कळण्यास त्यांना उशीर लागला नाही. शाळेतील आठवीची परिक्षा उत्तीर्ण होताच त्यांनी गृहत्याग केला. पुढे काही दिवस व-हाडात नोकरी पण केली पण त्यात ते रमले नाहीत.
पुढे योगायोगाने त्यांना समर्थ भक्त श्री. ल.रा.पांगारकर यांच्या " मुमुक्षु " मासिकाच्या कार्यालयात कामही मिळाले. मुळात विरक्ती होतीच त्यात आता " पराधीनता रामदासी घडेना " हे लक्षात आल्याने श्री. दत्तात्रय यांच्या ठिकाणी असलेले मुमुक्षुत्व अधिकच प्रकट होत गेले. श्री. पांगारकरांचा सत्संग लाभलाच होताच . त्यामुळे श्री. दत्तात्रय यांना श्री ग्रंथराज दासबोध वाचन व अभ्यासाची गोडी लागली. मासिकातील नोकरी सोडून पंचवटी, नाशिक येथे त्यांनी गायत्री पुरश्चरण केले.
साधना
संपादनकाळाराम मंदिरातील श्री. रामचंद्रांकडून पुढील कार्याची दिशा प्राप्त झाली. राम नेईल तिकडे जायचे या निर्धाराने श्री. क्षेत्र काशीस माघ , शके 1829 साली वयाच्या 22 व्या वर्षीच पुढील साधनेसाठी श्री. दत्तात्रय हे आले.
काशी येथील राम घाटावरील श्री. बालकराम मंदिरात श्री.गोजीवनदास चौंडे महाराज यांच्या नेतृत्वात त्याचवेळेस त्रयोदशाक्षरी मंत्राचे अनुष्ठान सुरू झाले होते. श्री. दत्तात्रय मोरेश्वर लोहोकरे या तरुणाच्या ठिकाणी असलेली भक्तीची ओढ पाहून श्री. चौंडे महाराज यांनी श्री. दत्तात्रय लोहोकरे यांना माघ शुद्ध सप्तमी, रथसप्तमी , शके 1829 या पवित्र दिवशी अनुग्रह दिला. श्री. दत्तात्रय मोरेश्वर लोहोकरे आता श्री. अनंतदास रामदासी झाले. त्यांची मुमुक्षु अवस्था जाऊन आता साधकावस्था त्यांना प्राप्त झाली होती. शके 1829 ते शके 1831 दरम्यान श्री. अनंतदास रामदासी यांनी पुरश्चरण केले व शके 1831 मध्ये ते महाराष्ट्रात परत आले.
कार्य
संपादनश्री. अनंतदास रामदासी हे काशीहून महाराष्ट्रात शके 1831 मध्ये आले. सर्व प्रथम श्री. सज्जनगडावर श्री. समर्थाच्या समाधीचे दर्शन घेऊन तेथेच गडावर त्यांनी 13 कोटीचा त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप पूर्ण केला. पुढे वाई येथील गोवर्धन संस्थेचे ते काम पाहू लागले. "श्री रामदासी सांप्रदायिक उपासना पद्धती " हा ग्रंथ त्यांनी शके 1833 मध्ये लिहून प्रकाशित केला. शके 1844 मध्ये गोवर्धन मेळा गणेशोत्सवाची सुरुवात श्री. अनंतदास रामदासी यांनी केली. सद्गुरू श्री. गोजीवनदास चौंडे महाराज यांच्या सोबत व स्वतंत्रपणे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर प्रवास करून समर्थ संप्रदाय आणि गोसेवेचा प्रचार केला.
वर्धा जिल्हय़ातील हिंगणघाट तालुक्यातील गिरड येथे पुरातन राममंदिर व रामदासी परंपरेतील मठ होता. वर्धा येथील श्री. बापूजी पनके यांनी नाव सुचवलल्या प्रमाणे गिरडच्या रामदासी मठाचे मठपती म्हणून श्री. अनंतदास रामदासी यांनी शके 1857 साली जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्य करण्याच्या विशिष्ठ पद्धतीने गिरड मठाला लवकरच मोठा नावलौकिक प्राप्त झाला. शके 1864 साली गिरड, हिंगणघाट आणि नागपूर येथे वैदिक पाठशाळा देखील त्यांनी स्थापन केल्या.
एका चातुर्मासात गिरड मठात 13 कोटी जप संकल्प पूर्ण करण्यात आला. जप समाप्तीला स्वतः सद्गुरू श्री. चौंडे महाराज उपस्थित होते. श्री. अनंतदास रामदासी यांच्या नेतृत्वात गिरड ते सज्जनगड अशी पायी दिंडी पण काढण्यात आली होती. . शरीर थकत आल्याने समर्थ सेवा व गोसेवा करण्यासाठी त्यांनी मराठवाड्याची निवड केली. धाराशीव ( उस्मानाबाद ) जिल्ह्यातील योगीराज श्री. कल्याण स्वामी यांच्या समाधी मंदिरात डोमगावला श्री. अनंतदास रामदासी यांनी धाव घेतली. दोन तीन वर्षे तेथे वास्तव्य करून सेवा दिली. गोसेवेचा आदर्श आणि श्री रामनामाचा प्रचार तरुण पिढीसमोर ठेवला.
श्री. सद्गुरू चौंडे महाराज यांच्या आज्ञेनुसार डोमगावाहून सज्जनगड अशी श्री. कल्याण स्वामी यांची पालखी नेण्याची सुरुवात श्री. अनंतदास रामदासी यांनी केली. ही प्रथा त्यांनी पुढे देह असे पर्यंत चालू ठेवली. "आपणामागे जगदिशासी | भजत जावे ||" या समर्थ वचनाप्रमाणे श्री अनंतदास रामदासी यांनी श्रीराम व श्रीसमर्थ प्रेमाची ज्योत अखंड तेवत ठेवली. श्री. अनंतदास रामदासी यांचा संपर्क श्री. कल्याण स्वामी परंपरेतील 40-45 मठांशी होता.
ग्रंथ रचना
संपादनश्री. समर्थ संप्रदायातील सर्वच महापुरुषांनी स्वतंत्र अशी रचना, ग्रंथ निर्मिती करून ठेवली आहे. समर्थ-ह्रदय श्री. शंकर श्रीकृष्ण देव ( नानासाहेब देव ) यांनी मोठय़ा कष्टाने हे सर्व वाङमय धुळे येथील श्री. समर्थ वाग्देवता मंदिरात आपल्यासाठी जतन करून ठेवले आहे. त्या समर्थ वाग्देवतेचे दर्शन प्रत्येक रामदासींनी आवश्य घेतले पाहिजे. श्री. अनंतदास रामदासी यांनी देखील फार मोठ्या प्रमाणावर ग्रंथ निर्माण केले आहेत. त्यातील काहींचा उल्लेख म्हणजे 1) सन 1928 मध्ये लिहिलेला श्री. समर्थांचा गाथा यात श्री. समर्थ कृत 1749 अभंग दिले आहेत. 2) श्री. समर्थांचे सप्तकांडात्मक चरित्र असलेला " श्री दासायन " हा ग्रंथ . 3) श्री. हंसराज स्वामी कृत " श्री संकेतकुबडी " ही संक्षिप्त टीका . 4) विद्यार्थी व शिक्षक यांना प्रेरक असा " विद्यार्थ्यांचे रामदास " हा ग्रंथ . 5) शके 1833 मध्ये प्रकाशित " श्रीरामदासी उपासना पद्धती " हा ग्रंथ. 6) सद्गुरू श्री गोजीवनदास चौंडे महाराज यांचे चरित्र . 7) रामदासी संप्रदायाचे अभ्यासक , संशोधक यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा " श्री दासबोध प्रवेश " हा ग्रंथ.
समाधी
संपादनश्री. अनंतदास रामदासी यांनी आश्विन शुद्ध एकादशी , शके 1885, रविवारी सकाळीच 4 वाजता समाधी घेतली. समाधी घेण्यापूर्वी त्यांनी नवरात्र महोत्सवात आपल्या भक्तांकडून रोज 11-11 श्रीरामरक्षास्तोत्राचे पाठ करवून घेतले. आश्विन शुद्ध एकादशीस आपला देह ठेवला.
श्री. समर्थ शिष्य श्री. आण्णाप्पा ( श्री. आनंद स्वामी ) यांचा मठ लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे आहे. श्री. आनंद स्वामी यांची समाधी गावाबाहेर एका शेतात आहे. श्री. अनंतदास रामदासी हे सन 1960 पर्यंत अनेक वेळा या समाधी मंदिरात वास्तव्य व साधनेसाठी येत असत. त्या समाधी समोर श्री. अनंतदास रामदासी यांची समाधी व पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत.
तसेच डोमगाव परंडा येथेही ते श्री. कल्याण स्वामी समाधीच्या सेवेत राहात होते. परंडा येथील श्री. हंसराज स्वामी समाधी शेजारी देखील श्री. अनंतदास रामदासी यांचे समाधी वृंदावन आहे.
पण श्री. अनंतदास रामदासी यांचे मुख्य समाधी स्थान धाराशीव ( उस्मानाबाद ) येथे देशपांडे गिरणी स्टाॅप आहे.