शाळासमूह म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाळांचे करण्यात येणारे समूह. आधुनिक मानसशास्त्रातील संशोधनानुसार सर्व मुलांना सारख्याच गतीने ज्ञानग्रहण करता येत नाही म्हणून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘शाळासमूहा’ ची कल्पना उदयास आली.

शिक्षणाचा जसजसा प्रसार होतो, तसतशी शिक्षणाची गुणवत्ता काही अंशी कमी होते. ही समस्या मुख्यतः विकसनशील देशांत आहे. तिची कारणे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक अशी तिहेरी आहेत. या समस्येचा एक पैलू म्हणजे वेगवेगळ्या संस्थांच्या शैक्षणिक पातळीतील फरक आणि त्यांच्यात वाढत जाणारे अंतर होय. काही संस्थांना दर्जेदार शिक्षक, अध्यापनसामग्री, सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला विद्यार्थिवर्ग यांची अनुकूलता असते, तर मागास व ग्रामीण भागांतील संस्थांना या गोष्टींची प्रतिकूलता जाणवते. आणखी एक बाजू म्हणजे, वेगवेगळ्या स्तरांवरील संस्था अलगपणे काम करतात व त्यांच्यामध्ये परस्परसंबंध नसतात. या उणिवा दूर करण्याचा एक मार्ग म्हणून शाळासमूहाची कल्पना पुढे आली.

शाळासमूह दोन स्तरांवर असू शकतात : (१) उच्च शिक्षण, (२) शालेय शिक्षण. एखादे मध्यवर्ती महाविद्यालय व त्याच्या ८ ते १० किमी. परिघातील माध्यमिक शाळा, यांचा एक समूह तयार करून महाविद्यालयाने माध्यमिक शाळांतील शिक्षणाचा व शिक्षकांचा दर्जा उंचावण्याची जबाबदारी घेणे, हा एक प्रकार आहे. माध्यमिक शाळांतील शिक्षकांचे, त्या त्या विषयांचे ज्ञान सखोल व विस्तृत करणे, विज्ञानाचे साहित्य त्यांना उपलब्ध करून देणे, त्यांच्याकडून प्रयोग करवून घेणे इ. विविध कार्ये या समूहामार्फत होऊ शकतील. त्यामुळे प्राध्यापकांना माध्यमिक शिक्षणातील समस्यांचे ज्ञानही होईल. त्याचबरोबर महाविद्यालयात येणारे विद्यार्थी चांगल्या तयारीनिशी येतील. विद्यापीठ व संलग्न महाविद्यालये यांचाही असाच समूह करता येईल. प्रायोगिक तत्त्वावर प्राथमिक व माध्यमिक शाळा चालविणे, पाठ्यपुस्तके व अध्यापनसाहित्य यांचा दर्जा सुधारण्यास साहाय्य करणे, अल्प मुदतीचे नवीन अभ्यासक्रम आखणे इ. कार्यक्रम या समूहांना हाती घेता येतील.

शालेय स्तरावरही एक माध्यमिक विद्यालय, पाच-सहा उच्च दर्जाच्या प्राथमिक शाळा आणि वीस-पंचवीस निम्न दर्जाच्या शाळा यांचा एक गट तयार होऊ शकेल. यापूर्वी एक उच्च दर्जाची प्राथमिक शाळा व चारपाच निम्न दर्जाच्या प्राथमिक शाळा यांचाही समूह तयार करणे इष्ट ठरेल. केंद्रशाळा ही उत्कृष्ट अध्यापन, साहित्यसमृद्ध प्रयोगशाळा, ग्रंथालय व कुशल प्रशिक्षित शिक्षक यांनी युक्त असली पाहिजे. ज्ञान व ज्ञानग्रहणांची साधने यांचा प्रवाह उच्च स्तरांवरून निम्न स्तराकडे सतत वाहता राखण्यासाठी, शाळासमूहाचा प्रयोग उपयोगी आहे.