शब्द व्युत्पत्ती

मराठी भाषेतील शब्दांची व्युत्पत्ती
(व्युत्पत्ती या पानावरून पुनर्निर्देशित)


शब्द-घटना अभिनय

"तत्सम" शब्द

संपादन

मराठीमध्ये विशेष करून संस्कृत, देशी,अरबी, फारसी ह्या भाषांचे शब्द आढळतात. तसेच हिंदी, गुजराती, तेलुगू, कानडीइंग्लिश या भाषांचे शब्दही बरेच आलेले आहेत. मराठी संस्कृतोत्पन्न असल्यामुळे व संस्कृतांत नवीन शब्द बनविण्याला उपसर्ग, प्रत्यय, धातुसमास यांमुळे फारच मदत होत असल्यामुने त्यांचा वापर करून संस्कृत शब्द बनतात. अशाप्रकारे बनलेले पुष्कळशे संस्कृत शब्द मराठीत जसेच्या तसे काही फरक ने होता आले आहेत. ते शब्द मराठीत तसेच ठेवले जातात. अशा संस्कृत शब्दांना "तत्सम" शब्द असे म्हणतात. उदा- देव, माता, पिता, कवी, गुरू, शत्रु, मित्र, इ.

"तद्भव" शब्द

संपादन

जे शब्द संस्कृत श्ब्दांच्या मूळ रूपात फरक होऊन मराठीत आलेले आहेत, त्यास "तद्भव" शब्द असे म्हणतात. उदा.- घर (गृह), हात (हस्त), पाय (पाद), कान (कर्ण), पान (पर्ण), काटा (कंटक), इ.

"देशी" शब्द

संपादन

मराठीत असे काही शब्द आहेत की ते तत्सम, तद्भव, यवनी वगैरे नसून कोठून उत्पन्न झाले असावे हे सांगता येत नाही. ते मूळचेच येथल्या पूर्वीच्या महाराष्ट्रात वसती करून राहिलेल्या लोकांचे असावे आणि ते आपल्या मराठीत दृढ झाले असावेत असे दिसते. अशा शब्दांना "देशी" शब्द असे म्हणतात. उदा.- झाड, धकटा, लेकरू, इ.

  • टीप- मराठी, गुजराती, हिंदी, बांगला, इ. भागात सध्या चालू असलेल्या भाषांनाही देशीभाषा किंवा देशभाषा असे म्हणतात. पण त्या अर्थाने येथे देशी हा शब्द वापरला नसून महाराष्ट्रात मूलतः राहणाऱ्या लोकांचे जे शब्द मराठीत जसेच्या तसे शिल्लक उरले आहेत, ते 'देशी' शब्द ह्या अर्थानेच हेमचंद्र वगैरे पूर्वव्याकरणकार तो शब्द वापरतात, तसा येथे वापरला आहे.

शब्दांची साधनिका

संपादन

जे शब्द मराठीत ते तत्सम असोत, तद्भव असोत, देशी असोत, त्या शब्दांची साधनिका काय, त्यांचे पूर्वस्वरूप व सध्याचे स्वरूप ह्यात कोणत्या प्रकारे व कोणत्या कारणाने फरक झाले, त्यांचे काही अर्थांतर झाले काय, ते का झाले, इ. गोष्टींविषयी आपल्या भाषेसंबंधी स्थूल अभ्यास करणाऱ्यांना थोडी-फार माहिती असणे आवश्यक आहे. तिच्या योगाने चिकित्सक बुद्धि वाढते. यापूर्वीचे समाज, त्यांच्या चालीरिती इत्यादींवर प्रकाश पडतो. तसेच मानवी संस्कृतीचे पाऊल कसे कसे पुढे पडत गेले याची कल्पना येते आणि एकंदरीत ह्या गोष्टी पाहत असता काही चमत्कारिक माहिती मिळून मनाला आनंदही होतो.

येथे प्रथम संस्कृतसाधित शब्द, नंतर मराठी साधित शब्द आणि शेवटी यवनी म्हणजे अरबी व फारसी भाषांतील व हिंदी, गुजराती, कानडी व मराठीच्या सहचर भाषांतील मराठीत आलेले शब्द, यांचा क्रमाने विचार करू.

मराठीत येणारे बरेचसे संस्कृत शब्द जसेच्या तसे येतात, ते शब्द मूळ संस्कृत धातूंना कधी मागे उपसर्ग कधी पुढे प्रत्यय लावून बनतात तर कधी दोन्ही लागून बनतात.

जी अव्ययरूप अक्षरे धातूच्या मागे लागून, बरेच वेळा त्या धातूचा अर्थ बदलतात, त्यांस उपसर्ग असे म्हणतात. उदा.-'हर' धातूचा मूळ अर्थ हरण करणें; परंतु आ-हार=खाणें, वि-हार=खेळणें, सं-हार=ठार मारणें, प्र-हार=तडाखा देणें, याप्रमाणे मागे लागलेल्या अक्षरांमुळे त्या धातूच्या अर्थात बदल झाला आहे. असेच इतर धातूंविषयी समजावे. उपसर्ग हे स्वतंत्रपणे केव्हाच येऊ शकत नाहीत. कोणत्या उपसर्गामुळे कोणते अर्थ उत्पन्न होतात याची कल्पना येण्यासाठी ते उपसर्ग व त्यांनी युक्त असे शब्द पुढील प्रमाणे आहेत.

संस्कृत उपसर्ग

संपादन
  • अति-(आधिक्य)अतिशय, अतिरेक, अत्युत्कृष्ट
  • अति-(पलीकडे) अतिक्रम, अत्यंत
  • अधि-(मुख्य) अधिपती, अध्यक्ष
  • अधि-(वर)अध्ययन, अध्यापन
  • अनु-(मागुन) अनुक्रम, अनुताप, अनुज
  • अनु-(प्रमाणे) अनुकरण, अनुमोदन
  • अप-(खाली येणे) अपकर्ष, अपमान
  • अप-(विरुद्ध होणे) अपकार, अपजय
  • अपि-(आवरण) अपिधान=अच्छादन
  • अभि-(अधिक) अभिनंदन, अभिलाप
  • अभि-(जवळ) अभिमुख, अभिनय
  • अभि-(पुढे) अभ्युत्थान, अभ्युदय
  • अव-(खाली) अवगणना, अवतरण
  • अव-(अभाव, विरूद्धता) अवकृपा, अवगुण
  • आ-(पासून, पर्यंत) आकंठ, आजन्म
  • आ-(किंचित) आरक्त
  • आ-(उलट) आगमन, आदान
  • आ-(पलीकडे) आक्रमण, आकलन
  • उत्-(वर) उत्कर्ष, उत्तीर्ण, उद्भिज्ज
  • उप-(जवळ) उपाध्यक्ष, उपदिशा
  • उप-(गौण) उपग्रह, उपवेद, उपनेत्र
  • दुर्/दुस्-(वाईट) दुराशा, दुरुक्ति, दुश्चिन्ह, दुष्कृत्य
  • नि-(अत्यंत) निमग्न, निबंध
  • नि-(नकार) निकामी, निजोर
  • निर्-(अभाव) निरंजन, निराषा, निर्विकार
  • निस्(अभाव) निष्फळ, निश्चल, निःशेष
  • परा-(उलट) पराजय, पराभव
  • परि-(पूर्ण) परिपाक, परिपूर्ण(व्याप्त), परिमित, परिश्रम, परिवार
  • प्र-(आधिक्य) प्रकोप, प्रबल, प्रपिता
  • प्रति-(उलट) प्रतिकूल, प्रतिच्छाया
  • प्रति-(एकेक) प्रतिदिन, प्रतिवर्ष, प्रत्येक
  • वि-(विशेष) विख्यात, विनंती, विवाद
  • वि-(अभाव) विफल, विधवा, विसंगति
  • सम्-(चांगले)संस्कृत, संस्कार, संगीत
  • सम्-(बरोबर)संयम, संयोग, संकीर्ण
  • सु-(चांगले) सुभाषित, सुकृत, सुग्रास, सुसंगती
  • सु-(सोपें) सुगम, सुकर, स्वल्प
  • सु-(अधिक) सुबोधित, सुशिक्षित

एकाच शब्दात दोन किंवा अधिक उपसर्ग उदा.-

  • प्रति+अप+वाद=प्रत्यापवाद
  • सम्+आ+लोचन=समालोचन
  • वि+आ+करण=व्याकरण

उर्दू उपसर्ग

संपादन

उपसर्ग (अर्थ) - शब्दरूप

  • अल (निश्चित, अंतिम) - अलविदा, अलबत्ता
  • कम (हीन, थोडे, अल्प) - कमजोर
  • खुश - श्रेष्ठ ह्या अर्थाने - खुशहाली
  • गैर (निषेध ) गैरहजर
  • दर (मध्यात) दरम्यान
  • ना (अभाव) नामुराद, नालायक
  • बद (वाईट) बदनाम, बदमाश
  • बा (सहित) बाकायदा, बामुलाहिज़ा
  • बे (शिवाय) बेईमान, बेइज्जत बेअक्कल
  • सर (मुख्य) सरहद्द, सरकार

संदर्भ

संपादन

'मराठी व्याकरण'(प्रथम प्रकाशन १९३५):लेखक कै. मोरेश्वर सखाराम मोने (मृत्यु १९४७)