वि.सी. चितळे
वि़ष्णू सीताराम चितळे (१० मार्च, १९०० - २३ डिसेंबर, १९५३) हे एक इतिहासलेखक, इतिहास संशोधक व पत्रकार होते.
त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्यात झाले. पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजातून बी.ए., एम.ए. झाल्यावर त्यांनी लंडन येथून. टी.डी. (टीचर्स डिप्लोमा) हा डिप्लोमा घेतला, आणि पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इतिहासाचे अध्यापन केले. चितळे यांनी इतिहास संशोधन आणि लेखन या दोनही क्षेत्रांत मोठी कामगिरी बजावली.
चितळे यांनी लिहिलेल्या ग्रंथांत ब्रिटिशांचा इतिहास, हिंदुस्तानचा अभिनव इतिहास, 'नवभारताचा सांस्कृतिक इतिहास' आदी पुस्तके आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकांत उत्तमोत्तम चित्रे, छायाचित्रे, आलेख, नकाशे देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावण्याचे काम त्यांच्या पुस्तकांनी केले. त्यांचे आणखी एक मोलाचे काम म्हणजे त्यांनी इतिहास संशोधक रियासतकार गो.स. सरदेसाई यांना ऐतिहासिक वंशावळी तयार करण्याच्या कामात मदत केली. ह्याखेरीज त्यांनी लिहिलेल्या स्फुट लेखांचा संग्रह 'इतिहास संचार' या नावाने प्रकाशित झाला. याशिवाय १९४८ साली त्यांचे 'पेठे दप्तर - भाग ३' आणि १९५० साली 'पेठे दप्तर - भाग २' हे ऐतिहासिक पत्रांचे दोन संग्रह भारत इतिहास संशोधक मंडळाद्वारे संपादित व प्रकाशित झाले.
इतिहास हा मानवी समाजजीवनाचा वाहता प्रवाह असल्याने मुलांचे चारित्र्य घडविण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा असतो, ही वि.सी. चितळे ह्यांची इतिहास लेखनामागची भूमिका होती.
वि.सी. चितळे यांनी लिहिलेली पुस्तके
संपादन- नवभारताचा सांस्कृतिक इतिहास
- पेठे दप्तर भाग २ व ३.
- ब्रिटिशांचा इतिहास
- शनिवारवाडा
- सिंहगड (इतिहास, वर्णन, उपसंहार)
- हिंदुस्तानचा अभिनव इतिहास