बेल्हे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील कल्याण- अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ व राष्ट्रीय महामार्ग ७६१ बेल्हे- शिरूर वरील छोटे शहर आहे . बेल्हे जनावरांचा बाजार महाराष्ट्रात क्रमांक एकवर आहे .

  ?बेल्हे
बेल्हे
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर जुन्नर
जिल्हा पुणे जिल्हा
लोकसंख्या
घनता
१२,६५८ (2021)
• ७३०/किमी
भाषा मराठी,हिंदी
सरपंच
बोलीभाषा मराठी,उर्दू, कन्नड,हिंदी मारवाडी
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२१३२
• एमएच/14

पार्श्वभूमी

बेल्हे जुन्नर तालुक्यातीलराज्यात बैल बाजार, जनावरांचा बाजारसाठी विशेष प्रसिद्ध मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. अहमदनगर अन् पुणे जिल्हा सीमेवर वसलेलं असल्यामुळे नेहमी मोठया प्रमाणात बाजारपेठ सजलेली असते. दर सोमवारचा आठवडे बाजार म्हणजे स्थानिक लोकांसाठी मोठी यात्राच किंवा मेळा. या बाजाराला चारशे वर्षांची परंपरा लाभली आहे. शनिवार सुरू होणारा बाजार मंगळवारी संपत असे. परिसरातील गावातही बाजार होत आहेत त्यामुळे गर्दी तुलनेनं कमी असते पण प्रसिद्धी अजून तशीच आहे. शिवकाळातील कसबे बेल्हे म्हणून प्रसिद्ध होते. बेल्हे गावाला चारशे वर्ष जुनी आठवडे बाजार परंपरा लाभली आहे. गावात अनेक पुरातन वास्तू आहेत, "नवाबाचे गाव" असा राजकीय ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ग्रामदैवत बेल्हेश्वर मंदिर, ग्रामदैवत मुक्ताई मातेचे भव्य ६५ फूट उंच विशाल व विविध रंगछटांमध्ये रंगकाम केलेलं मंदिर, बिल्वकेश्वर मंदिर, संत निळोबा यांनी स्थापन केलेले विठ्ठल मंदिर, बालेश्वर, पोलेश्वर शनी मंदिर, मारुती मंदिर, भैरवनाथ, संतरविदास मंदिर, जैन मंदिर, महावीर स्थानक, बौद्ध विहार, सारनाथ, दावलमलिकदर्गा, नियांमतशवली दर्गा, जनाबाई मठ आदी देवस्थान गावात आहेत.

बेल्हे येथील सोमवारचा "बैलांचा बाजार" राज्यभरात क्रमांक एकवर आहे. सोमवारचा जनावरांचा बाजारही खूप प्रसिद्ध आहे. या बाजारामध्ये गाय, विविध जातीच्या म्हशी, बोकड, बैल, शेळी, गावरान कोंबड्या, अंडी, खेचर, घोडी, तसेच भुसार कडधान्य, मासे, सुकी मासळी, रोजच्या वापरातील गृह उपयोगी वस्तू, भाजीपाला, कपडे, शेतोपयोगी साहित्य, बियाणे, खते, मिठाई अशा विविध प्रकारच्या विविध विभागात बाजारपेठ सजलेली असते.

बेल्हेश्वर विद्यामंदिर नावाची एक चांगली शाळा आहे. मॉडर्न इंग्लिश स्कूल, समर्थ गुरुकुल स्कूल, समर्थ शिक्षण संकुल येथे विविध अभियांत्रिकी, पॅरामेडिकल, पॉलिटेक्निक, iti, low, फार्मसी, असे उच्च अभ्यासक्रम शिकवले जातात व ती एक नामवंत संस्था आहे. सह्याद्री पॉलिटेक्निक नावाजलेले आहे. तमासगीर कै. दत्ता महाडीक पुणेकर याच गावचे. गावाला "तमासगीरांचे गाव" असेही म्हणतात. अतिशय जुनी हॉटेल पालाची हॉटेल आहेत. जी बाजारात येणाऱ्यांच्या जेवण्याच्या सोईसाठी पूर्वीपासून आहेत. मटण भाकरी, चिकन, मटकीची भाजी, पिठलं भाकरी, झुणका, मासवडीही प्रसिद्ध आहे. तसेच मिसळ, वडापावसाठी काही हॉटेल बेल्हेश्वर राज, विठू माउली, नंदाभौचा पेढा, भेळ, लाडू चिवडा, शेव ही प्रसिद्ध आहेत.

राष्ट्रीय महामार्ग 61 कल्याण अहमदनगर परभणी नांदेड निर्मल जगदिलं बेल्हेतून जातो.

राष्ट्रीय महामार्ग 761 बेल्हे शिरूर येथून सुरू होतो.

राज्य महामार्ग क्रमांक 117 बेल्हे शिक्रापुर जेजुरी लोणंद सातारा हा जातो.

राज्य महामार्ग क्रमांक 112 बेल्हे मंचर भीमाशंकर हा बेल्हे येथून सुरू होतो.

भौगोलिक स्थान

हवामान

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलांनुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत हिवाळा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन

कलाप्रेमी गाव: गणेश उत्सव, नवरात्र, दिवाळी, शिवजयंती, हनुमानजयंती, रामनवमी, महावीर जयंती, भीम जयंती, बुद्धपौर्णिमा, रमजान, मोहरम हे सण मोठ्या प्रमाणात साजरे होतात. खवय्यांची पहिली पसंत, मिसळ, वडापाव, मास वडी, पालातील चिकन मटण, बिर्याणी, शाकाहारी जेवण खाण्यासाठी अनेक नेहमीच रेलचेल असते .

तमाशा कलावंत पारंपरिक पद्धतीने तमासगीर म्हणून ओळखले जातात. तमाशा कलावंत व तमाशा आश्रय देणारे गाव म्हणून बेल्हेची ओळख आहे. गावाला इतिहास खूप मोठा आहे. भिन्न जाती धर्माचे विविध क्षेत्रातली कलाकार लोक येथे गुण्यागोविंदाने राहत आलेत. शेकडो वर्षे जुना आठवडे बाजार हा इथले लोकजीवन किती पुढारलेले होते याची साक्ष देत आहे. पारंपरिक पद्धतीने सण, उत्सव साजरे केले जातात. हिंदू, मुस्लीम, जैन, बौद्ध लोक एकत्र येऊन रितीरिवाजानुसार आपले सण साजरे करतात. दांवल मलिक तीर्थक्षेत्र, नियामात शहावली, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. इथे दोन्हीं धर्मीय एकत्र पूजाविधी करतात.

प्रेक्षणीय स्थळे

बेल्हे, महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन पुष्करणी व एक प्राचीन नगर. बेल्हे गावचा काही ताम्रपट व शिलालेख यात बाल्हेग्राम असा उल्लेख आढळतो, शिवकाळात व मोगल काळात बेल्हा व नंतर बेल्हे असा सोपा अपभ्रंश झाला! सदर पोस्टमधील फोटो त्या बेल्हे पुष्करणी तलावाचे आहेत. जिने प्राचीन कल्याण प्रतिष्ठान मार्गावरून प्रवास करणारे वाटसरू, देशीविदेशी व्यापारी, संतमहंत यांची एक हजारपेक्षा जास्त वर्ष तहान भागवली आहे. तिची आता अशी दयनीय अवस्था झाली. तिला स्वच्छ करून तिथली झाडेझुडपे काढून, ऊर्जित करणे गरजेचे आहे. तिच्या शेजारचे एक प्राचीन दगडी कुंड व मार्ग सध्या गाडले गेले आहेत. मोगल काळात येथील प्राचीन विष्णू मंदीर (स्वामीनारायण) पवित्र बिल्वकेश्वर मंदीर नष्ट करण्यात आली, परत गावकऱ्यांनी महादेव मंदिर उभारले ही! येथे मोठे चिंचबन आहे. बेल्हे ठाणे पार करून येथे मुक्काम करत व्यापारी गंतव्य स्थानाकडे जात असत. शिवकालातही बेल्हे कसबा होते (बाजारपेठ) शहरातील यादवकालीन भुईकोटातून येथील नवाबाने शिवनेरी व चाकण किल्ल्याची किल्लेदारी केली. गावला दोन वेशी होत. (कल्याण) पश्चिम वेस काही वर्षांपूर्वी पडली व पूर्ववेस या वेशीतून तेराव्या शतकात नेवासेहुन आळंदीकडे तीर्थाटन करणाऱ्या संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान, निवृत्ती, कालोबा, "वेद वदविलेला रेडा"यांनी प्रवेश केला होता. गावात मारुती मंदिराजवळ नामसंकीर्तन, समाज उपदेश करत. काही दिवस मुक्काम करून आळेरेडा समाधीकडे प्रवास केला. सतराव्या शतकात छत्रपती संभाजी राजेंनी १३ डिसेंबर १६८४ रोजी येथील भुईकोट किल्ल्यावर स्वारी केली होती; पूर्व वेशीतून प्रवेश करून पश्चिम (वेस) दरवाजातून बाहेर पडले होते. असा उल्लेख जयपूरहून त्याकाळी प्रसिद्ध होणाऱ्या अखबारात आहे. शिवकालीन निजामशाहीत जाणारा हा मार्ग असून येथून श्री छत्रपती शिवाजीमहाराजांनी अनेकदा प्रवास केला होता. अठराव्या शतकातील संत निळोबाराय यांची कन्या भागीरथी ही बेल्हे गावचे कुलकर्णी अण्णाजी दत्तो याची सून झाली. निळोबाराय व त्यांच्या वंशजांनी येथे एक सुबक नक्षीकाम केलेले विठ्ठल रूक्मिणी मंदिर बांधले आहे. येथे जवळच शिवकालीन सुबक अशी बारव आहे जी ग्रामपंचायतीतर्फे गाडण्यात आली. फोटोतील पुष्करणी ग्रामदैवत बिल्वकेश्वर मंदिरास समर्पित आहे. पुष्करणीला अठरा सुबक देवकोस्टके आहेत. ६०x५० फूट आकाराच्या विशाल पुष्करणीत नैसर्गिक जिवंत पवित्र जलस्रोत आहे. शिळेची झालेली झीज, वास्तूरचना, ठेवण, या अंदाजातून ही कल्याण प्रतिष्ठान मार्गावरील सर्वात पहिली बांधलेली पुष्करणी हीच असावी. हा आध्यात्मिक व प्राचीन ठेवा जपण्यासाठी जीर्णोद्धाराच्या कामासाठी जात धर्म बाजूला ठेवून नागरिक, सेवाभावी संस्था, तरुण मंडळांनी एकत्र येऊन श्रमदान व आर्थिक सहाय्य करून हे कार्य तडीस न्यावे ही विनंती; बेल्हे ग्रामपंचायतीतर्फे याठिकाणी असणारा तलाव पुन्हा बनवून बोटींग क्लब, बाग आदी सुविधा दिल्या तर यातून पर्यटन विकास होऊन रोजगार निर्मिती होईल. ऐतिहासिक बेल्हे शहर वैभवसंपन्न होईल.

नागरी सुविधा

बेल्हे ग्रामपंचायत 1922 ला स्थापन झाली. बँक ऑफ इंडिया, pdcc बँक, शरद बँक, आदी बँका गावात आहेत. सरकारी दवाखाना, सरकारी पशुवैद्यकीय सेवा, अनेक शॉपिंग सेंटर, ग्रोसरी स्टोर आहेत. कृषी सेवा केंद्र, आठवडे बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, गावात बेल्हेश्वर विद्यामंदिर शाळा आहे. समर्थ शिक्षण संकुल नावाजलेले आहे. येथे अभियांत्रिकी, वैद्यकीय, iti, law college, फार्मसी महाविद्यालय आहे. मॉडर्न इंग्लिश स्कूल, बेल्हे ही उत्तम इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. समर्थ गुरुकुल स्कूल, ही उच्च शिक्षण देणारी संस्थादेखील येथे आहे. प्राथमिक शिक्षणासाठी पाच शाळा आहेत.

जवळपासची गावे

अहमदनगर, आलेफाटा, आळंदी, आळकुटी, ओझर, ओतूर, कल्याण, कोंबरवाडी, कोरठणखंडोबा, खेड, गुंजाळवाडी, गुळूंचवाडी, जुन्नर, टाकली, तांबेवडी, नारायणगाव, नाशिक, निमगाव, पारगाव, पारनेर, पुणे, बांगरवाडी, बोरी, मंगरुळ, मंचर, यादववाडी, रांजणगाव, रांधे, राजुरी, रानमळा, रेनवडी, लेण्याद्री, शिक्रापूर, शिरूर, साकोरी

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate