वामन पंडित
वामन नरहरी शेष (वामन पंडित) (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले मराठी कवी होते.[१]
माहितीची अनिश्चितता
संपादनवामन पंडितांबद्दल खात्रीची माहिती मिळत नाही. कोणी वामन पाच आहेत असे समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळे कोणी वामन दोन होते असेही मानतात. 'यथार्थ दीपिका'कार वामन व भर्तृहरीच्या श्लोकांचे भाषांतर करणारे वामन हे दोन वेगळे होते, असे काहींचे मत आहे.
वामन पंडितांचा जन्म नांदेडचा समजला जातो[२]. मूळ विजापूरचे रहिवासी.[१] यांच्या आईचे नांव लक्ष्मीबाई. लहानपणापासून विद्याव्यासंगी व बुद्धिमान होते असे म्हणतात. लहानपणीच फारशी भाषेचा अभ्यास केला होता. यांनी काही दिवस विजापूरच्या दरबारी काढले. पण जेव्हा विजापूरच्या बादशहास त्यांना बाटवावे असे वाटले तेव्हा त्यांनी विजापूर सोडले. [१] उदरनिर्वाहाकरिता काही दिवस भिक्षावृत्तीवर ठिकठिकाणी हिंडून पुढे काशीक्षेत्री प्रयाण केले. तेथे एका मध्वमतानुयायी गुरूजवळ वेद व शास्त्रे यांचा उत्तम अभ्यास केला. या विद्येच्या जोरावर ठिकठिकाणी पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करून अनेक सभा जिंकल्या व विजयपत्रे मिळविली. वामन पंडित प्रथमतः द्वैतमतवादी असले, तरी त्यांच्या मनाचे त्या विचारसरणीने समाधान होईना. त्यामुळे त्यांनी निरनिराळया मतांच्या ग्रंथांचे अवलोकन करून अनेक शास्त्रीपंडितांच्या गाठीही घेतल्या, परंतु मनाचे समाधान झाले नसल्याने निराशेने कंटाळून शेवटी आत्मत्यागाच्या विचारापर्यंत त्यांची मजल गेली होती. ते पुढे मलयाचल पर्वताकडे गेले. तेथे त्यांना एका यतीने गुरुपदेश दिला. ही हकीकत त्याने 'निगमसागर' नांवाच्या ग्रंथात आरंभी विस्ताराने दिली आहे. निगमसागर ग्रंथ शके १५९५ मध्ये लिहिल्याचा त्या ग्रंथातच उल्लेख आहे.
वामन पंडिताचे काव्य
संपादनवामन पंडितांची गणना उच्च दर्जाच्या कवीत होते. लांब लांब यमके साधण्यात त्यांचे कौशल्य दिसून येते. वामन पंडितांची कांहीं काव्ये भाषांतररूप आहेत व काही स्वतंत्र. भर्तृहरीची श्रृंगार, नीति, वैराग्य शतके, गंगालहरी, समश्लोकी गीता ही भाषांतरित होत. निगमसागर नावाचा वेदान्तपर ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. 'यथार्थदीपिका' या नावाची गीतेवरील टीका अनेक लोकांच्या आग्रहास्तव लिहिली. तीत ’आंधळी भक्ती ही कुचकामाची असून ज्ञानयुक्त सगुण भक्तीच श्रेष्ठ व मोक्षसाधनाचा उत्तम मार्ग आहे’ असे प्रतिपादिले आहे. या ग्रंथाची ओवीसंख्या २२ हजारांवर आहे. ओवीरचना अनियमित असून ती कोठे लांब तर कोठे आखूड झाली आहे. याशिवाय, रामजन्म, कंसवध, हरिविलास, आर्याटीका, कात्यायनीव्रत, अनुभूतीलेश, जलक्रीडा, जटायुस्तुति अशी इतर पुराणप्रसंगांवर वामन पंडितांनी काव्ये केली आहेत. 'सुश्लोक वामनाचा' असे मोरोपंतांनी म्हणले आहे, यावरून वामनपंडिताची योग्यता दिसून येते. निवृत्तिपर काव्यांप्रमाणेच वामन पंडितांनी शृंगार, वात्सल्य, करुण, वगैरे नवरसपूर्ण काव्येही केली आहेत. वर्णनशैली, रचनाचातुर्य, साधेपणा, व प्रासाद याच्या काव्यांत जागजागी दिसून येतो. आपल्या पत्नीस उपदेश करण्याकरिता लिहिलेले प्रियसुधा नावाचे प्रकरण फार उत्तम वठले आहे. [१]
विनामृत्तिका कुंभ जेव्हां दिसेना
विना मृत्तिका कुंभ कांहीं असेना
दिसेना असी ज्याविणें मृत्तिकाही
नसे मृत्तिकाही तयावीण कांहीं ॥१॥
अलंकार सृष्टीमधें काय आहे
सुवर्णाविणें हें विचारुनि पाहें .. चित्सुधा
सूर्याजी सदाशिव महात्मे यांनी वामन पंडितांच्या मिळतील तेवढ्या जुन्या हस्तलिखित पोथ्या गोळ्या केल्या व त्यातून वामन पंडितांची 'स्फुट रचना' व 'यथार्थ दीपिका' हे ग्रंथ सिद्ध झाले. हे ग्रंथ त्यानी त्यांच्या 'वामनग्रंथ' नावाच्या मासिकातून क्रमश: प्रसिद्ध केले.
उत्तरकालीन टीका
संपादनसंत साहित्यानंतरच्या मराठी काव्याचा टप्पा हा "पंत काव्या"चा येतो. या टप्प्याची सुरुवात वामन पंडितांपासून होते. संतांच्या नंतर आलेल्या वामन पंडित, मोरोपंत, रघुनाथ पंडित, विठ्ठल, नागेश, सामराज या पंडित कवींनी संस्कृत साहित्याप्रमाणे अभिजातवादाची देणगी मराठी भाषेस व साहित्यास दिली. [३]
निधन
संपादन[२] महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील नोंदीनुसार वामन पंडितांचे निधन शके १६१७ च्या वैशाख महिन्याच्या शु्क्ल पक्षात झाले.[१]. एका नोंदीनुसार त्यांचे निधन चैत्र शु. चतुर्थी इ.स. १६९५ या दिवशी झाले, अशी नोंद मिळते[४][२].
वामन पंडितांची समाधी सातारा जिल्ह्यातील वाईपासून ४.५ कि.मी. अंतरावर मेणवलीच्या पुढे कृृष्णातीरावर भोगांव नावाच्या खेड्यात आहे[१]. ही समाधी पूर्वीच्या दक्षिण सातारा व सध्याच्या सांगली जिल्ह्यात व वाळवा तालुक्यातील कोरेगांव येते समाधी शेष नारायण मंदिराच्या प्रांगणात असून या मंदिराचा जीर्णोद्धार इ.. स. २००४-५ मधे कोरेगाव वासीयांनी केला. याठिकाणी त्यांच्या घराण्याची देवता शेषनारायणाची मूर्ती आहे.
वामन पंडिताची चरित्रे
संपादनवामन पंडितांची चरित्रे अनेकांनी लिहिली आहे. त्यांपैकी राजाराम प्रासादी यांनी शके १५७६ मध्ये लिहिलेले ’भक्तमंजरीमाले’तील चरित्र बरेच विस्तृत आहे. वामनपंडितांबद्दल थोडी फार माहिती समर्थसांप्रदायिक बखरकारांच्या लेखनावरून उपलब्ध होते, पण ती तपासून पहावी लागते. वामनाचे साधार चरित्र लिहिण्याचा प्रयत्न नांदेडचे वि.अं, कानोले यांनी केला आणि तसे चरित्र इ.स.१९६६ साली प्रकाशित केले. त्यात लिहिल्याप्रमाणे नांदेडचे शेष घराणे आपल्या विद्वत्तेबद्दल अनेक शतके प्रसिद्ध होते. या घराण्यात वामन पंडिताचा जन्म विजापूर गावी झाला.
शेषांचा मूळ पुरुष रामकृष्णपंत. त्यांच्या विठ्ठल नावाच्या मुलास अनंत आणि मेघनाथ असे दोन पुत्र होते. वामन आणि तिस्सो ही अनंताची मुले. तिस्सोचा पुत्र शिवपंडित ह्याला मूलबाळ नव्हते. त्यामुळे घराण्याचा वारसा वामन अनंताचा नातू म्हणजे वामन पंडितांकडे आला.
वामन पंडितांची ग्रंथसंपदा
संपादन- अनुभूतिलेश (संस्कृत)
- अपरोक्षानुभूति
- अहल्योद्धार आख्यान
- आरती भगवंताची
- उखळबंधन
- उपदेशमाला
- उपादान
- ऋषिपत्न्याख्यान/यज्ञपत्न्याख्यान
- कर्मतत्त्व प्रकरण
- कंसवध
- कात्यायनीव्रत (गोपीवस्त्रहरण)
- कात्यायनीव्रत-२
- काव्यसंग्रह -४ भाग (वामन पंडितांची कविता)
- जयद्रथवध
- भीष्मभक्तिभाग्य
- भीष्मार्जुनयुद्ध
- विराटपर्व
- कृष्णचरित्र
- कृष्णजन्म
- गंगालहरी (मूळ जगन्नाथ पंडिताच्या काव्याचा काव्यानुवाद)
- गजेंद्रमोक्ष
- गीतार्णवसुधा
- गोरसविक्रय
- गोरसहरण
- चरमगुरूमंजिरी
- चतुःश्लोक भागवत
- चित्सुधा
- जटायु्स्तुति आख्यान
- जलक्रीडा
- तत्त्वमाला
- दंपत्यचरित्र (अश्वस्नान)
- दशावतारचरित्र
- द्वारकाविजय
- ध्यानमाला
- नामसुधा (हरिनामसुधा)
- निगमसार
- नृहरिदर्पण
- नौकाक्रीडा
- प्रियसुधा
- प्रेमसरी
- ब्रह्मस्तुति
- ब्रह्मोपदेश प्रकरण
- भरतभाव आख्यान
- भागवती प्रकरणे
- भागवती रामायण
- भामाविलास
- मुकुंदविलास
- यथार्थदीपिका
- योगवासिष्ठ प्रकरण
- राजयोग (संस्कृत)
- राधाविलास
- राधाभुजंग
- रामजन्म आख्यान
- रामस्तव आख्यान
- रासक्रीडा
- रासमंडळ
- रुक्मिणीविलास
- लोपामुद्रासंवाद आख्यान
- वनसुधा
- विश्वासबंध
- वेणुसुधा
- श्रुतिसार (संस्कृत)
- समश्लोकी भगवद्गीता
- सीतास्वयंवर आख्यान
- सिद्धान्तविजय (संस्कृत)
- सुदामचरित्र
- हरिनामसुधा
- हरिविलास
(अपूर्ण)
संदर्भ
संपादन- ^ a b c d e f http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44
- ^ a b c "Yatharthdipika". www.bookganga.com. 2019-06-21 रोजी पाहिले.
- ^ दैनिक सामना संकेतस्थळावरील साहित्यिक नामदेव ढसाळ यांचा लेख (सदर : सर्वकाही समष्टीसाठी ) लेख: मुजोरी : ३ अभिजनांच्या वाङ्मयीन अधिसत्तेची (लेख तारीख ५ जानेवारी २०१३ ?) Archived 2014-08-20 at the Wayback Machine. हा लेख दिनांक २५ सप्टे २०१३ रात्रौ १० वाजता जसा अभ्यासला
- ^ "संग्रहित प्रत". 2016-04-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-09-26 रोजी पाहिले.