वर्ग:मराठी व्यंगचित्रकार

राजेंद्र सरग यांची विचारचित्रे

      ‘विनोद ही डोळ्यांत अंजन घालून त्‍यातील घाण दूर करणारी एक शलाका आहे’ असं साहित्‍यसम्राट न. चिं. केळकरांनी म्‍हटलं आहे. यावरुन विनोदी साहित्‍याचं महत्‍त्‍व स्‍पष्‍टपणे प्रतीत होतं. विनोदी लेखन, विनोदी कविता अथवा व्‍यंगचित्रे हेही एक प्रकारे डोळ्यांत अंजन घालण्‍याचेच काम करतात.

व्‍यंगचित्रे जशी करमणूक करतात तसंच अंतर्मुखही करतात. आपल्‍याकडं व्‍यंगचित्रांची मोठी परंपरा आहे. दिवाळी अंकांनी या व्‍यंगचित्रांना कायमस्‍वरुपी व्‍यासपीठ मिळवून दिलं आहे. विनोदी दिवाळी अंकांमध्‍ये अनेक व्‍यंगचित्रकार आपल्‍या शब्‍दरेषांनी वाचकांना हसवतात. यामध्‍ये एक नाव आवर्जून घ्‍यावं लागेल ते म्‍हणजे राजेंद्र सरग यांचं.

      सन 1987 पासून सरग यांचा व्‍यंगचित्रकलेचा प्रवास सुरु झाला. तो आजही अविरत चालू आहे. दैनिकं, साप्‍ताहिकं, मासिकं आणि दिवाळी अंकांमधून विविध विषयांवर त्‍यांनी 11 हजारांहून अधिक व्‍यंगचित्रं रेखाटली. काही हास्‍यचित्रं अथवा व्‍यंगचित्रं ही घटकाभर करमणूक करतात. ती पाहिल्‍यानंतर वाचक खदाखदा हसू लागतात. पण ते फारसे टिकावू नसतं. याउलट बुध्‍दीला आणि मनाला आव्‍हान देणारं व्‍यंगचित्र हे वाचकाच्‍या मनावर आपली पकड घट्ट बसवू शकतं. तथापि, आपल्‍याकडं अशा व्‍यंगचित्रांचं प्रमाण कमी आहे. त्‍याला कारण अशी गंभीर व्‍यंगचित्रे प्रसिध्‍द करणा-या संपादकमंडळींची नगण्‍य संख्‍या हे आहे.
      राजेंद्र सरग यांनी जशी हास्‍यचित्रं रेखाटली तशीच मृत्‍यू, वृध्‍दाश्रम, अनाथाश्रम या विषयावरील गंभीर, वाचताच डोळ्यांत टचकन आंसू आणणारी व्‍यंगचित्रंही रेखाटलीत. व्‍यंगचित्रांची निर्मिती केवळ हसविण्‍यासाठी, मनोरंजन करण्‍यासाठीच न करता समाजातील वाईट चाली-रिती, अनिष्‍ट रुढी-परंपरा अथवा मानवी स्‍वभावातील वाईट गोष्‍टींवर कोरडे ओढण्‍यासाठी करण्‍यावर त्‍यांचा विश्‍वास आहे. अशा व्‍यंगचित्रांतून वरवर दिसणारा विनोद हा मानवी स्‍वभावाच्‍या दुर्गुणांवर मार्मिकपणे टीका करतो. अशा काही निवडक व्‍यंगचित्रांविषयी अर्थात विचारचित्रांविषयी...
      ‘सवय’ ही माणसालाच नव्‍हे तर पशु-पक्ष्‍यालाही गुलाम बनवते, याचं प्रातिनिधीक उदाहरण म्‍हणजे व्‍यंगचित्र क्रमांक 1. बालपणापासून खुंटीला बांधण्‍यात येणारं गाढव. मोठे झाल्‍यावर न बांधताही जागेवर थांबतं. गुलामगिरीची, पारतंत्र्यात रहाण्‍याची सवय झालेल्‍या व्‍यक्‍तीला मिळणारं स्‍वातंत्र्य उपभोगण्‍याची ऊर्मी अथवा शक्‍तीही राहिलेली दिसून येत नाही. गुलामगिरी रक्‍तात, अंगात इतकी भिनलेली आहे की सहजतेने मिळणारं स्‍वातंत्र्य उपभोगण्‍याचा आत्‍मविश्‍वासही ते गाढव गमावून बसलेलं दिसून येतं. माणसांत आणि गाढवांत ‘सवयी’बाबतचा फरक तो काय?
      षट्कर्णी होणं म्‍हणजे तिस-याला कळणं. एखादी गोष्‍ट एकानं दुस-याला सांगितली तर त्‍यामध्‍ये बदल होत नाही. मात्र तीच गोष्‍ट दुस-यानं तिस-याला, तिस-यानं चौथ्‍याला अशा पध्‍दतीनं कर्णोपकर्णी झाली तर नवीनच गोष्‍ट तयार होते. त्‍यामध्‍ये सत्‍याचा अपलाप, विपर्यास होण्‍याची, स्‍वत:च्‍या पदरच्‍या काही नवीन बाबी समाविष्‍ट होण्‍याची शक्‍यता अधिक असते. अफवांच्‍या बाबतीत असंच असतं. व्‍यंगचित्र क्रमांक 2 मध्‍ये असंच काहीसं घडलेलं दिसतंय. प्रत्‍येक जण आपल्‍या परीनं त्‍यात अधिकची भर घालतोय. पण या अफवांकडं दुर्लक्ष केलं तर अफवांचा पुढील प्रवास थांबतो. या चित्रामधील व्‍यक्‍तीला ‘कान’ नाहीत, त्‍यामुळं तो ऐकत नाही म्‍हणूनच त्‍या ‘अफवा’ पुढं पसरल्‍या नाहीत. आजच्‍या काळात सोशल मिडीयावरुन येणारे वादग्रस्‍त, आक्षेपार्ह संदेश आणि त्‍याची खातरजमा न करता ‘फॉरवर्ड’ करणा-या व्‍यक्‍तींनाही हे व्‍यंगचित्र लागू होतं.
      ‘बोलणं’ हा मानवी स्‍वभाव. त्‍यातही स्‍त्रियांना म्‍हणे बोलायला खूप आवडतं. याबाबत जे काही असेल ते असो. व्‍यंगचित्र क्रमांक 3 मधील महिला आपल्‍या मैत्रिणीशी बोलण्‍यात इतकी गुंग आहे की टीव्‍हीवर चाललेली वादळी चर्चा तिच्‍या कानापर्यंत पोहोचलेली नाहीए. इतकंच काय तिचं बाळ रडतंय, पण तेही मातृह्रदयापर्यंत पोहोचलेलं नाही. यातून मोबाईलचं व्‍यसन आणि बोलण्‍याचं वेड सहजतेनं प्रतिबिंबीत झालेलं दिसून येतं.
      पर्यावरण संरक्षण असो की वृक्षसंवर्धन हा आज महत्‍त्वाचा मुद्दा झालेला आहे. व्‍यंगचित्र क्रमांक 4 मधील परिस्‍थिती अशीच विदारक आहे. एकमेव राहिलेल्‍या झाडावर स्‍वार्थी माणसानं कु-हाड चालविली आहे. या झाडावर घरटं असणारा पक्षी या माणसाला काही करु शकत नाही. तो त्‍याच्‍या परीनं या माणसाचा ‘निषेध’ करतोय. या पक्ष्‍याच्‍या भावना समजून वृक्षतोडीपासून हा माणूस परावृत्‍त होईल, एवढीच आशा करणं आपल्‍या हातात आहे.
      ‘कानून के हाथ लंबे होते है’ असं म्‍हणतात त्‍यावर ‘लंबे इसके हाथ सही, ताकत इसके साथ नही’ असंही प्रत्‍युत्‍तर दिलं जातं. व्‍यंगचित्र क्रमांक 5 मध्‍ये प्रदूषणाच्‍या समस्‍येवर प्रकाश टाकण्‍याचा प्रयत्‍न झालेला आहे. मोठ-मोठे कारखाने वायूप्रदूषण, जलप्रदूषण करतात. त्‍यामुळं प्राणीमात्रांवर विपरित परिणाम होतो. भारतीय कायदे कडक आहेत. मात्र त्‍याची अंमलबजावणी किती ‘नरमाईनं’ होते, याचं हे उदाहरण ठरावं. या व्‍यंगचित्रातील पोलीस मात्र ‘कायद्याचा रक्षक’ आहे. त्‍याच्‍या हद्दीत तो नियमभंग सहन करत नाही. संबंधित व्‍यक्‍तीला नियम मोडल्‍याबद्दल जागेवरच दंड ठोठावण्‍यास तो मागे-पुढे पहात नाही.
      व्‍यंगचित्र क्रमांक 6 या जोडचित्रामध्‍ये आकडेवारीचा खेळ दिसतो. ‘आपल्‍या देशाची अर्थव्‍यवस्‍था, आर्थिक स्‍थिती उत्‍तम आहे’ असं सांगण्‍यासाठी हुकूमशहा असलेला राजा त्‍याच्‍या अर्थशास्‍त्रज्ञास सुचवतो. ‘दो और दो पांच’ असं करण्‍यास अर्थशास्‍त्रज्ञ नकार देतो. गणित असो की विज्ञान ते खोटेपणावर टिकून रहात नाही, हे सांगण्‍याचा शास्‍त्रज्ञाकडून प्रयत्‍न केला जातो. ते राजाला पटत नाही. सत्‍तेपुढं शहाणपण टिकत नाही, असं म्‍हणतात. तशीच गत बिच्‍चा-या अर्थशास्‍त्रज्ञाची होते. तो ‘असत्‍य’ हे ‘सत्‍य’आहे हे सांगण्‍यास नकार न देता दुस-या पध्‍दतीनं ‘सत्‍य हेच सत्‍य’ सांगतो... पण आपल्‍या प्राणांची आहुती देऊन. थोडक्‍यात, ‘कोणत्‍याही नाण्‍याला, परिस्‍थितीला, घटनेला दोन बाजू असल्‍या तरी हुकूमशाहीला एकच बाजू असते, ती त्‍यांची स्‍वत:ची’, असा छुपा संदेश या व्‍यंगचित्रातून मिळतो.
      व्‍यंगचित्र क्रमांक 7 मधील अर्थ गूढ असला तरी समजण्‍यास अवघड नाही. माणूस आपल्‍या जीवनात अनेकदा प्रश्‍नांचे ओझे घेऊन वाटचाल करीत असतो. या व्‍यंगचित्रामधील व्‍यक्‍तीचेही तसंच आहे. बरं, ‘प्रश्‍न’ बरोबर असता तर काही हरकत नव्‍हती. पण चुकीच्‍या प्रश्‍नाबाबत, नको असलेल्‍या गोष्‍टीबाबत त्‍याचा आग्रह आहे.(खांद्यावरील उलटे प्रश्‍नचिन्‍ह हे त्‍याचंच द्योतक) प्रश्‍न चुकीचा आहे, हे कळल्‍यावर ‘उत्‍तर’ नाही मिळालं तरी काही वाईट वाटत नाही. पण इथं सगळंच उलटं आहे. हे कमी आहे की काय म्‍हणून हा व्‍यक्‍ती ‘आत्‍मकेंद्री’ दिसतो. ‘मी म्‍हणेल तीच पूर्व दिशा’ या तो-यामध्‍ये उत्‍तराच्‍या शोधात म्‍हणजे उत्तरेकडं न जाता ‘पूर्वेकडे’ जाण्‍याचा त्‍याचा अट्टाहास आहे. आपणही न पेलणा-या समस्‍या खांद्यावर घेऊन चुकीच्‍या दिशेनं जीवनप्रवास करतो आणि जेव्‍हा कळतं तेव्‍हा उशीर झालेला असतो. हेच सांगण्‍याचा प्रयत्‍न या व्‍यंगचित्रातून करण्‍यात आलेला आहे.
      थोडक्‍यात, व्‍यंगचि‍त्र हे मनाला आनंद देणारे एक प्रभावी माध्‍यम आहे. तथापि‍, बोधामृताचे कडू कोयनेल 'हास्‍यरुपी साखरेच्‍या' आवेष्‍टनातून दि‍ल्‍यास त्‍याचा योग्‍य परि‍णाम होतो.

कल्‍पना मार्कंडेय सरग