लीला वसंत ठकार ह्या पूर्वाश्रमीच्या लीला लोणकर यांचा जन्म- ( ३० जून, १९१७ ) मृत्यू- ( १९ ऑगस्ट, २००४ ) सोलापूर येथे झाला.

लीला वसंत ठकार
जन्म ३० जून, १९१७
सोलापूर
मृत्यू १९ ऑगस्ट, २००४
निवासस्थान पुणेनाशिक
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण मॅट्रिक
पेशा शिक्षिका
कार्यकाळ इ.स.१९५६ ते इ.स.१९७५
धर्म हिंदू
पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार

व्यक्तिगत जीवन संपादन

लीलाबाईच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात सोलापूर येथे झाली. पण पितृछत्र हरपल्याने त्यांचे कुटुंब पुण्यात येऊन स्थायिक झाले. पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून लीलाताई मॅट्रिक झाल्या. या शाळेतील शिक्षक व्यवसायास वाहून घेतलेल्या शिक्षकांचे संस्कार त्यांनी आयुष्यभर जतन केले व प्रत्यक्षात आणले. मद्रासला प्रत्यक्ष मॅडम माँटेसरीच्या हाताखाली शिकण्याची संधी त्यांना मिळाली. विवाहानंतर त्या नाशिकला आल्या.

नोकरी संपादन

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे विद्यालयात शिक्षकी पेशास त्यांनी सुरुवात केली. इंग्रजी व भूगोल हे त्यांचे हातखंडा विषय होते. १९५० मध्ये लीलाताईंची संस्थेच्या ‘शारदा मंदिर’ या शाळेत बदली झाली. त्या काळात नाशिकमधील मुली ‘शारदा मंदिरा’त याव्यात म्हणून त्यांनी नाशिक पिंजून काढले. मुलींना आर्थिक मदत, सवलती देऊन शाळेत शिक्षणाच्या प्रवाहात आणले. घरी बसणाऱ्या मुलींना आकर्षण वाटावे म्हणून चैत्रगौर, हळदीकुंकू, रांगोळी प्रदर्शन, छोट्या-मोठ्या सहली, नाटके बसविणे, विविध स्पर्धांमधून सहभाग, गृहसभा, सामने असे उपक्रम सुरू केले. मुलींची संख्या वाढल्यावर राजे बहादूर वाड्याची जागा कमी पडू लागली. १९५६ मध्ये लीलाताई शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या. अधिक जागा मिळविण्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न सुरू झाले आणि हायस्कूल ग्राऊंडवर शाळेसाठी जागा मिळाली. हा लीलाताईंच्या जीवनातील कार्यपूर्तींचा क्षण होता. अल्पावधीत टिळक पथावर शाळेची सुसज्ज इमारत उभी राहिली. नाशिकमधील उद्योजक सारडा बंधूंनी देणगी दिल्यामुळे शाळेचे नाव बदलून ‘मा. रा. सारडा कन्या विद्या मंदिर’ असे झाले. लीलाताईंच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रभर शाळेचे नाव झाले. माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळाच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थिनी चमकण्याची सुरुवात लीलाताईंच्याच कारकिर्दीत झाली. समाजसेवेचे संस्कार व्हावेत म्हणून दर रविवारी त्या मुलींना घेऊन पेठ रोड परिसरातील वडारवस्तीत नेत असत. करमणुकीच्या कार्यक्रमांतून विद्यार्थिनी स्वच्छतेचे, साक्षरतेचे संस्कार तेथील स्त्रियांवर, मुलींवर करीत असत. लीलाताईंच्या प्रयत्नातून नाशिक रोड परिसरात शेठ ध. सा. कोठारी कन्याशाळा सुरू झाली. प्रारंभी एका छोट्या बंगल्यात भरणारी ही शाळा आज भव्य इमारतीत भरते व नामवंत शाळा म्हणून ओळखली जाते.

कारकीर्द संपादन

१९७१ मध्ये पेठे विद्यालयाचा व संस्थेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. नाशिक एज्युकेशन सोसायटीची नवीन घटना अस्तित्वात आली त्यावेळी ‘शिक्षक मंडळा’च्या पहिल्या अध्यक्षा होण्याचा मान लीलाताईंना मिळाला आणि संस्थेला एका खंबीर नेत्याचे मार्गदर्शन मिळाले. १९७५ मध्ये पेठे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून लीलाताई निवृत्त झाल्या. या निवृत्तीच्या काळातही संस्थेच्या विविध समित्या, नाशिक मधील अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांना सदस्य म्हणून, अध्यक्ष म्हणून त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ झाला. लीलाताई स्काऊट आणि गाईड संस्थेच्या कमिशनर होत्या.  नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहाला त्या नेहमी भेट देत असत.[१]

पुरस्कार संपादन

१९६८ मध्ये ‘राष्ट्रपती पुरस्कार’ प्रदान करून लीलाताईंच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील त्या पहिल्याच शिक्षिका होत.


संदर्भ संपादन

  1. ^ The Progress of Education (इंग्रजी भाषेत). 1960.