रासपुतीन

(रास्पुतिन या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्रिगोरी येफिमोविच नोविख उर्फ रासपुतीन याचा जन्म (जुन्या दिनदर्शिकेनुसार) जानेवारी १० (तर नव्या दिनदर्शिकेनुसार) जानेवारी २२ १८६९ रोजी सायबेरियातील पोक्रोवस्कोये या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. एक अशिक्षित, दुर्व्यसनी माणूस म्हणून याची ख्याती होती. सायबेरियातील स्थानिक भाषेत अनीतिमान किंवा व्यभिचारी माणसास रासपुतीन म्हणतात व तेच याचे नाव पडले. हा एक संत, वैदू वा वेडा फकीर होता किंवा एक स्वार्थी ठग होता याबाबत बरेच समज-गैरसमज आहेत. [ संदर्भ हवा ]

ग्रिगोरी रासपुतीन
जन्म ग्रिगोरी येफिमोविच नोविख
२२ जानेवारी १८६९
पोक्रोव्हस्कोये, सायबेरिया, रशियन साम्राज्य
मृत्यू २९ डिसेंबर १९१६ (वय ४७)
सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य
मृत्यूचे कारण खून
राष्ट्रीयत्व रशियन
टोपणनावे दी बॅड मॉंक (वाईट धर्मगुरू)
दी ब्लॅक मॉंक(काळा धर्मगुरू)
पेशा धर्मगुरू


ग्रिगोरी रास्पुतिन

१९०३ मध्ये रासपुतीन आपले घरदार सोडून निंद्य व विक्षिप्त कृती करणाऱ्या काही धार्मिक गटांसोबत थोडा काळ राहिला. काही वजनदार उमरावांशी परिचय झाल्याने रासपुतीन थेट रशियाचा दुसरा निकोलस या झारच्या (अर्थ राजा) सानिध्यात आला. त्यावेळी युवराज अलेक्सेई हा रक्तदोषाने आजारी होता. त्याच्यावर रासपुतीनने उपचार केल्याने युवराज अलेक्सेईच्या रोगाची तीव्रता कमी झाली. यामुळे रासपुतीनचा प्रभाव राजदंपतीवर पडला. झारिना (अर्थ राणी) आलेक्सांद्रा हिच्यावर रासपुतीनचा प्रभाव पडल्याने तर ती कोणत्याही लहान मोठ्या समस्या रासपुतीनसमोर मांडण्यात स्वतःला धन्य समजू लागली. रशियाच्या एकमेव वारसाच्या रक्षणाकरिताच परमेश्वराने रासपुतीनला पाठविले असल्याचे तिला वाटे. रोमानोव्ह राजपरिवारासाठी येशू ख्रिस्ताने पुन्हा जन्म घेतला असल्याचे ती बोलून दाखवी.

१९०६ साली तत्कालीन रशियाचे प्रधानमंत्री स्तोलिपिन यांच्या निवासस्थानावर क्रांतिकारकांनी बॉंब फेकले तेव्हा जखमी लोकांवर उपचार रासपुतीननेच केले. रासपुतीनचे वाढते महत्त्वव रशियाच्या राजकारणासाठी अतिशय घातक वळण घेत असल्याबाबत प्रधानमंत्री स्तोलिपिन याने झार निकोलसच्या कानावर घातले व रासपुतीनला हद्दपार करण्यात यावे अशी मागणीही त्याने केली. पण परिणाम उलटा झाला व झार निकोलसने स्तोलिपिनलाच प्रधानमंत्रीपदावरून दूर केले. रासपुतीनच्या विरोधात जो वागेल, बोलेल त्याला कठोर शिक्षा होऊ लागली. यातून राजघराण्याचे धर्मगुरू थिओफन, गृहमंत्री मकरोव्ह वगैरे मातब्बर मंडळीही सुटली नाहीत.

रासपुतीनने हळूहळू रशियाच्या शासन व्यवस्थेवरही आपली पकड घट्ट केली. रासपुतीनची मर्जी संपादन न करणाऱ्यांची हकालपट्टी झाल्याने अनेक राजनिष्ठ व कर्तव्यदक्ष लोकांना शासनाबाहेर जावे लागले. त्यांच्याऐवजी स्वार्थी व तत्त्वशून्य व्यक्तींचा भरणा राज्ययंत्रणेत झाला. रशियाचे सरसेनापती निकोलाय निकोलाययेविच यांनाही झारने पदावरून काढून टाकले व ते पद स्वतः राखले. या घटनेमुळे अनेकांच्या मनात रासपुतीनबद्दल संताप उफाळून आला. ड्यूमा (रशियन संसद) मध्ये रासपुतीविरुद्ध एकमताने ठराव संमत झाला आणि ड्यूमाच्या शिफारशीवरून झार निकोलसने रासपुतीनला शिक्षा करण्याचे आदेश दिले. पण झारिना आलेक्सांद्राच्या दबावामुळे रासपुतीनची शिक्षा लगेच मागे घेण्यात आली.

रासपुतीनला ठार मारण्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही असे अनेकांचे मत होते. दि. सप्टेंबर २९ १९१६ या दिवशी युसुपोव्ह नावाच्या एका उमरावाच्या घरी रासपुतीनला जेवणाचे आमंत्रण देण्यात आले. त्या दिवशी रासपुतीनला मारण्याचा बेत आखला गेला. जेवणात विष कालवले होते. रासपुतीनने जेवणावर ताव मारला पण त्याच्यावर विषाचा परिणाम झाला नाही. मग युसुपोव्हने आपल्या पिस्तुलातून रासपुतीनवर गोळी झाडली, तरीही तो पळत ओरडत घराबाहेर अंगणात गेला. शेवटी पुरिश्केविचने आपल्या पिस्तुलातील सर्व गोळ्या रासपुतीनवर झाडल्या, रासपुतीन जागेवरच मारला गेला. रासपुतीन मारला गेल्याची बातमी कळताच अनेकांनी आनंद व्यक्त केला. रासपुतीनच्या निधनानंतर अवघ्या काहीच महिन्यात मार्च १९१७ मध्ये रशियात राज्यक्रांती घडून आली आणि रोमानोव्ह घराण्याची सत्ता संपुष्टात आली.

संदर्भ

संपादन
  • रशियाचा इतिहास : लेखिका डॉ. सुमन वैद्य, नागपूर