येशू ख्रिस्त

ख्रिस्ती धर्माचे संस्थापक

येशू ख्रिस्त (इंग्रजी: Jesus Christ किंवा Jesus of Nazareth ; हिब्रू: יֵשׁוּעַ yēšūă किंवा Yeshua); (इ.स.पू ४ ते इसवी सन ३० अंदाजे) हा ख्रिस्ती धर्माच्या केंद्रस्थानी आहे. ख्रिस्‍ती धर्मग्रंथातील (बायबलमधील) नवा करार नामक उपग्रंथ येशूच्‍या जन्मासंबंधी, तसेच त्‍याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. बायबल हा ग्रंथ ख्रिस्ती धर्माचा ग्रंथ आहे. त्‍याला मरियम पुत्र, नासरेथ गावाचा येशू, प्रभु येशू, ख्रिस्त, जीजस क्राइस्ट, यीशु किंवा ईसा मसीह असेही म्‍हटले जाते.

येशू
Cefalù Pantocrator retouched.jpg
जन्म इ.स. ४
बेथलेहेम
मृत्यू इ.स. ३०
जेरुसलेम
मृत्यूचे कारण क्रूसावर चढवले
प्रसिद्ध कामे मृतांना जीवंत करणे, रोग्यांना बरे करणे, आंधळ्यांना दृष्टी देणे, मानवजातीचा पापांसाठी मरणे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जीवंत होणे आणि स्वर्गात जाणे
मूळ गाव नाझारेथ
पदवी हुद्दा परमेश्वराचा पुत्र (जगाचा तारणहार)
वडील जोसेफ
आई मारिया

नावाचा अर्थसंपादन करा

मत्‍तयरचित शुभवर्तमानाच्या पुस्‍तकातल्या पहिल्या अध्‍यायातले २१ वे पद येशू ख्रिस्ताच्या नावाबद्दल सांगते की,

तिला पुत्र होईल आणि तू त्‍याचे नाव येशू ठेव कारण तो आपल्‍या लोकांना त्‍यांच्‍या पापांपासून तारील. (मत्तयः१:२१)

येशू ख्रिस्ताला, 'इब्री(हिब्रू) भाषेत 'येशुआ'[१] तर ग्रीक भाषेत 'येसूस' Ιησούς (Iēsoûs) असे म्हटले आहे येशू हे याच शब्‍दाचे मराठी रूपांतर आहे, या नावाचा अर्थ तारणारा असा होतो , येशू सर्व मानवजातीला पापांच्‍या बंधनातून सोडविण्‍याकरिता आला, असे पवित्र शास्त्र(=बायबल) सांगते. या येशूला तत्कालीन राजसत्तेने क्रूसावर चढवून ठार मारण्याचा प्रयत्‍न केला. येशूच्या केवळ नावाद्वारे पापातून मुक्ती मिळत आहे. (प्र‍ेषित(?). ४.१२)

ख्रिस्त हा शब्‍द ग्रीक भाषेतील ख्रिस्‍तोस (Χριστός, Christós अभिषिक्त एक ) या शब्‍दावरून आलेला असून त्‍याचा अर्थ अभिषिक्‍त असा होतो. यहूदी लोकांना(ज्यू धर्मीयांना) याव्‍हे (यहोवा) नावाच्या देवाकडून मानवाला पापांपासून तारण्यासाठी ख्रिस्ताचा जन्म होईल असे आश्वासन प्राप्‍त झाले होते, असे समजले जाते. तरीसुद्धा त्या येशूचा यहूदी लोकांनी स्‍वीकार केला नाही, देवाने येशूला अभिषेक करून विशेष कार्यासाठी निवडून, पृथ्वीवर पाठविण्‍यात आले होते, अशी ख्रिस्ती लोकांची श्रद्धा आहे.

जन्मसंपादन करा

येशू ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी किंवा कोणत्या महिन्यात झाला, हे इतिहासात कुठेच नमूद केलेले नाही. तरी नवीन करारातील लूककृत शुभवर्तमान ह्या पुस्तकात यहुदी कॅलेंडर प्रमाणे सहाव्या महिन्यात ( सध्याच्या कॅलेंडर प्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबर) मरियेला देवदूताने तिच्या पोटी येशू जन्म घेणार असल्याचा देवाचा निरोप दिल्याची नोंद आहे. असे असले तरी, दर वर्षी २५ डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ म्हणून पाळला जातो.[२]

येशू ख्रिस्ताचा जन्म नक्की कधी झाला ?

नाताळ हा ख्रिस्ती धर्मियांचा महत्त्वाचा सण असला तरी ख्रिस्तीधर्माच्या स्थापनेनंतर बरीच वर्ष हा सण साजरा करण्याची प्रथा पडली नव्हती. मानव मुक्तीसाठी ख्रिस्ताने स्वीकारलेला मृत्यू आणि त्याचे पुनरुत्थान या घटनांनापूर्वी अधिक प्राधान्य देण्यात येत होते. म्हणून त्या घटनांचे सण अधिक महत्त्वाचे गणले जात. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा म्हणजेच ईस्टरचा सण तर अगदी प्रारंभापासूनसाजरा केला जात होता. रविवार (या दिवशी ख्रिस्त पुनरुत्थित झाला) हा परमेश्वराचा दिवस म्हणून साप्ताहिक ईस्टर म्हणून साजरा केला जात असे.  मात्र नाताळ म्हणजे ख्रिस्तजन्माचा सण साजरा केला जात नव्हता. ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर जवळजवळ १०० वर्षानी ख्रिस्तजन्माचा सण साजरा करण्याची कल्पना पुढे आली. तरी फारच थोड्या ठिकाणी हा सण साजरा होऊ लागला. चवथ्या शतकानंतरच साऱ्या ख्रिस्ती जगतात हा सण साजराकेला जाऊ लागला. आणि इसवी सन ५३४ मध्ये सार्वजनिक सुट्टीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला.

चवथ्या शतकापर्यंत नाताळ वेगवेगळ्या दिवशी साजरा करण्यात येत असे. काही देशात तो नोव्हेबरमध्ये साजरा करण्यात येई. इतर देशात डिसेंबरमध्ये तर अन्यत्र जानेवारीत बहुतेक ६ तारखेला, तर कुठे एप्रिल महिन्यात हा सण साजरा करण्यात येई. याला कारण म्हणजे ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी व कोणत्या तारखेला झाला याची माहिती कुणालाच नव्हती. त्याकाळी जन्मतारीख नोंदविण्याची प्रथा नव्हती. यहुदी लोकात तर जन्मदिवसाला अजिबात महत्त्व नव्हते. त्यामुळे जन्मदिवस लक्षात ठेवण्याचा, नोंदविण्याचा किंवासाजरा करण्याचा प्रश्नच नव्हता. पोप पहिले लायबेरीऊस यांनी इसवी सन ३५३ ते ३५४ यावर्षी जगातील सर्व ख्रिस्ती धर्मियांसाठी ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्याची तारीख २५ डिसेंबर ही निश्चित केली.  

               २५ डिसेंबर या दिवशी रोमन लोक सूर्यदेवतेचा सण साजरा करीत. दक्षिणेकडे गेलेला सूर्य परत उत्तरेकडे फिरताना (उत्तरायण) थोडावेळ स्थिर झालेला वाटे तो दिवस हे लोक फारच महत्त्वाचा मानीत. सूर्यदेव आता पुन्हा प्रकाश घेऊन उत्तरेकडे परत येणार म्हणून सूर्यदेवाच्या उत्तरायणाचा (आपल्या भारतीय संस्कृतीत याला मकर संक्रात असे म्हणतात) सण या दिवशी साजरा करीत. ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे (योहान 8:12) म्हणून ख्रिस्ती लोकांनी या दिवशी जगाचा प्रकाश जो ख्रिस्त त्याचा जन्मदिवस साजरा करायला सुरुवात केली. रोमन लोक या दिवशी आनंदउत्सव साजरा करीत. मुलांना भेटवस्तू देत, एकमेकांना शुभेच्छा भेटी देत. याच प्रथा ख्रिस्ती लोकांनी स्वीकारल्या.

               नाताळ हा शब्द “नातूस” म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून बनला आहे. या दिवसाला “ख्रिसमस” असे इंग्रजीत म्हणतात. ख्रिसमस म्हणजे ख्रिस्तमहायज्ञ (Christ Mass). सहाव्या शतकात धर्मगुरूंना नाताळच्या दिवशी तीन ख्रिस्तमहायज्ञ (मिस्सा) अर्पण करण्याची परवानगी देण्यात आली होती. ख्रिस्ताच्या जन्मघटकेचे स्मरण करण्यासाठी पहिला मिस्सा मध्यरात्री अर्पण केला जाई. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्रीझाला असे मानतात. दूसरा मिस्सा पहाटे आणि तिसरा मिस्सा दिवसा अर्पण केला जाई. अशा प्रकारे नाताळच्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करण्याच्या प्रथेचा उगम बेथलेहेम येथे झाला.  मध्यरात्रीचा मिस्सा बेथलेहेम येथे अर्पण केला जाई. हे एक छोटेसे गाव आहे. येथे ख्रिस्ताचा जन्म झाला. तेथून मग लोकांची मिरवणूक निघे. ती जेरूसलेम येथे पहाटे पोहोचत असे. मिरवणूक जेरूसलेमला पोहोचल्यावर तेथे दूसरा मिस्सा अर्पण केला जात असे. दिवस उजाडल्यावर त्याच शहरातील महामंदिरात सर्व ख्रिस्ती लोक जमा होत आणि मग तेथे तिसरा मिस्सा अर्पण केला जात असे.

               ६ व्या शतकात डायनाशियूस या मठवासी धर्मगुरुने ख्रिस्ताच्या जन्माचे वर्ष कोणते असावे याबाबतचे आणि त्या नंतरच्या ऐतिहासिक घटनांच्या तारखांचे एक गणित मांडले. ते थोडेसे कसे चुकले ते आपण नंतर पाहू. त्याने ख्रिस्तजन्मापूर्वीच्या वर्षांना बी. सी. (B.C. = Before Christ) आणि ख्रिस्तजन्मापासूनच्या वर्षांना ए. डी. आन्नुस डोमिनी (A.D. = Anno Domini) म्हणजे प्रभूचे वर्ष अशा नावाने संबोधण्याचा प्रघात पाडला. कालांतराने तारखांचे अधिक अचूक गणित मांडण्यात आले. तेव्हा लक्षात आले की ख्रिस्ताच्या जन्मतारखेचे वर्ष जवळ जवळ ४ ते ५ वर्षांनी चुकले होते. परंतु आता तर डायनाशियूसची दिनदर्शिका (कॅलेंडर) जगभर प्रचारात होती. ती बदलता येणे शक्य नव्हते. आजही आपण हेच  कॅलेंडर वापरतो. मात्र इसवी सनपूर्व ४ ते ७ वर्षंदरम्यान ख्रिस्ताचा जन्म झाला हे तज्ञाचे मत आता निश्चित झाले आहे.

               ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सन सुरू झाला, याचा अर्थ १ जानेवारी इसवी सन १ या साली त्याचा जन्म झाला, मग २५ डिसेंबरला ख्रिस्तजयंती का साजरी करतात असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर असे की ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा डायनाशियूस याने तयार केलेली दिनदर्शिका (कॅलेंडर) अस्तित्वात नव्हते. ख्रिस्तजन्मानंतर ६०० वर्षानी त्याने ही दिनदर्शिका तयार केली. सहाव्या शतकात गणित पद्धतीने त्याने ख्रिस्तजन्माचा काळ ठरविला आणि त्या वर्षाला इसवी सन १ कल्पून तेथून पुढील ६०० वर्षांची दिनदर्शिका तयार केली. ख्रिस्तजन्माचे वर्ष त्याने गणित पद्धतीने ठरविले तारीख ठरविली नाही हे लक्षात घ्यावे. हेही गणित ४ ते ५ वर्षानी कसे चुकले ते आपण आधी पाहिलेच आहे.

                पोप पहिले लायबेरीऊस यांनी चवथ्या शतकात ख्रिस्ती धर्मियांसाठी निश्चित केलेली ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्याची तारीख २५ डिसेंबर असणे शक्य नव्हते कारण तोपर्यंत डायनाशियूसची दिनदर्शिका (कॅलेंडर)  तयार झाली नव्हती. तसेच रोमन लोक जो सूर्यदेवाचा सण साजरा करीत तोही २५ डिसेंबेरला असे वर्णन वर आलेच आहे. खरे पाहता डायनाशियूस याने ही दिनदर्शिका तयार करण्यापूर्वी दिनक्रम मोजण्याच्या रोमन आणि यहुदी दिनदर्शिका अस्तित्वात होत्या. परंतु त्यात बऱ्याच त्रुटी होत्या. डायनाशियूसने सहाव्या शतकात अधिक परिपूर्ण अशी दिनदर्शिका तयार केली आणि त्यानुसार पुढच्या व मागच्या काही घटनांच्या तारखा ठरविण्यात आल्या. या गणित पद्धतीनुसार रोमन लोक सूर्यदेवाचा सण साजरा करीत ती तारीख आणि पोप पहिले लायबेरीऊस यांनी ख्रिस्तीधर्मियांसाठी ख्रिस्तजन्माची निश्चित केलेली तारीख इंग्रजी कलेंडरनुसार २५ डिसेंबर असल्याचे ठरविण्यात आले.

संदर्भग्रंथ :  झेप येशूची २००० वर्षाकडे   लेखक : फादर हिलरी फर्नांडिस

ख्रिसमस : तारणाचा आशादीप

ख्रिसमस हा शब्द इंग्रजी भाषेत खूप प्रचलित आहे. पण इतर भाषांमध्ये तारणाऱ्याच्या जन्मदिवसासाठी नाताळ हा शब्द प्रचलित आहे. नाताळ हा शब्द ‘नातालीस’ (Natalis) या लॅटिन शब्दापासून उगम पावला आहे. या शब्दाचा अर्थ आहे जन्मदिवस. स्पेनमध्ये नाविदाद (Navidad), इटलीमध्ये ‘नाताले’ (Natale), फ्रान्समध्ये ‘नोएल” (Noel), आणि पोर्तुगालमध्ये ‘नाताल’ (Natal) हाच शब्द ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी वापरला जातो. ख्रिसमस म्हणजे जन्मदिवस नव्हे तर नाताळ म्हणजे जन्मदिवस होय. मग ख्रिसमस हा शब्द का वापरला जातो असा प्रश्न पडतो.

ख्रिस्ताचा जन्म रात्री बारा वाजता झाला अशी पारंपारिक श्रद्धा आहे. म्हणून अकराव्या शतकात ख्रिस्तसभेने प्रभू येशूचा जन्मसोहळा साजरा करण्यासाठी मध्यरात्रीची मिस्सा साजरी करण्याची परवानगी दिली. ख्रिस्ती उपासनेमध्ये फक्त ही एकच मिस्सा मध्यरात्री अर्पण करण्याची परवानगी होती. म्हणून या मिस्साला विशेष महत्त्व प्राप्त झाले. दरवर्षी या मिस्साकडे ख्रिस्ती भाविक ख्रिस्तजन्माची अतिविशेष मिस्सा म्हणून पाहू लागले. आणि त्याला ‘ख्रिस्ताची मिस्सा’ (Christ’s Mass) हे नाव पडले. हे शब्द जुन्या इंग्रजीमधील Cristes Maesse (ख्रिसतेस मासी) या शब्दावरून आलेले आहेत. कालांतराने ‘Christ’s Mass’ या शब्दावरून ‘Christmas’ हा शब्द उगम पावला.

प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची निश्चित तारीख कुणालाच माहीत नाही किंवा कोठेही त्याची तशी नोंद नाही. जरी हा दिवस अनिश्चित असला तरी साधारणपणे हे मान्य केले जाते की येशूचा जन्म ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकामध्ये साधारणपणे सहा ते चार या कालावधीमध्ये झाला होता. (6- 4 Th B.C.) ख्रिस्तानंतरच्या चवथ्या शतकात (4th A.D.) राजा कोंस्टंटटाईन याने ख्रिस्ती धर्माला अधिकृतरित्या ‘राज्याचा धर्म’ (Religion of the State) म्हणून घोषित केले तेव्हापासून नाताळचा सण अधिकृतरित्या साजरा करण्यास सुरुवात झाली. इसवी सन ३५३ साली पोप महोदय जुलियस यांनी जागतिक ख्रिस्तसभेसाठी २५ डिसेंबर हा दिवस ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जावा, अशी आज्ञा केली. तेव्हापासून संपूर्ण जगभर २५ डिसेंबर रोजीच ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा केला जातो. पण २५ डिसेंबरच का ? हा दिवस निवडण्यामागे काही महत्त्वाचे सिद्धांत सांगितले गेले आहेत.

       सिद्धांत पहिला : प्राचीन काळातील रोमन आणि ग्रीक लोक अनेक देव देवतांची पुजा करणारे लोक होते. सूर्याची ते देव म्हणून उपासना करीत असत. इसवी सन २७४ साली रोमन राजा ओरेलियन याने २५ डिसेंबर हादिवस अपराजित सूर्यदेवाचा जन्म या सणाची स्थापना केली. त्याच दिवशी रोमन सैनिक मिथ्रा या रोमन दैवताचा सण साजरा करीत. या रोमन आणि ग्रीक लोकांमधून बरेच लोक ख्रिस्ती धर्माकडे वळले होते. या रोमन दैवताच्या जन्मदिवसाऐवजी नवख्रिस्ती लोकांनी मानवी रूप धारण केलेला खरा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त याचाच जन्म साजरा करावा असा पोप महोदय जुलियस यांचा हेतु होता. म्हणून ख्रिस्ती लोकांचे लक्ष ख्रिस्तजनमकडे वळविण्यासाठी पोपमहोदयांनी २५ डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस या सणाची स्थापना केली.

       दूसरा सिद्धांत : रोमन लोक शनि (Saturn god) या दैवताचा सन्मान करण्यासाठी १७ डिसेंबर हा दिवस सॅटर्नआलिया (Saturnalia) म्हणून साजरा करीत. १७ ते २५ डिसेंबर हा कालावधीत संपूर्ण रोमन साम्राज्यात सुट्टी घोषित केली जात असे. ख्रिस्ती लोकांनी या सणाच्या आठवड्याचे ख्रिस्तीकरण करून सणाचा शेवटचा दिवस २५ डिसेंबर हा दिवस अंधारावर मात करणाऱ्या खऱ्या प्रकाशाचा उगम जो प्रभू येशू याचा जन्मदिवस साजरा करण्यास सुरुवात केली. अशा रीतीने २५ डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून पाळण्यात येऊ लागला.

नाताळ आणि बायबलमधील सिद्धांत : नाताळ हा २५ डिसेंबर रोजी साजरा करण्यामागे बायबलमधील एक सिद्धांत देखील महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा गब्रिएल दूताने जखऱ्याला यरूशलेम येथील मंदिरात बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माची शुभवार्ता सांगितली तो दिवस यहुदी धर्मातील अत्यंत पवित्र असा दिवस होता. (योम किप्पूर म्हणजे प्रायश्चीत करण्याचा दिवस) तो दिवस यहुदी कालगणनेप्रमाणे 22-30 सप्टेंबर या दरम्यान येतो. म्हणजे नऊ महिन्यांनी (25 जून) बाप्तिस्मा करणारा योहान याचा जन्म झाला. जेव्हा गब्रिएल महादूत पवित्र मरियेकडे तारणाऱ्याच्या जन्माविषयी शुभवार्ता घेऊन आला तेव्हा एलिझाबेथ सहा महिन्यांची गर्भवती होती. म्हणजे गब्रिएल महादूत मरियेला 25 मार्च (प्रभूच्या देहधारणाचा सण) रोजी प्रकट झाला आणि नऊ महिन्यांनी 25 डिसेंबर रोजी प्रभू येशूचा जन्म झाला.

संदर्भ : सुवार्ता डिसेंबर २०२१ - लेखक : फा. डॉ. अनिल परेरा

मृत्यूसंपादन करा

 
येशू ख्रिस्त

येशूचा मृत्यू वयाच्या ३०-३३ वर्षाच्या सुमारास झाला आहे,असे बायबलमध्ये नमूद केले आहे. त्याला क्रूसावर खिळून ठार करण्यात आले.

क्रूसावरील मृत्यूदंड

मानवी क्रूरपणाचा कळस गाठणारी शिक्षा

ख्रिस्तपूर्व काळापासून गुन्हेगारांना क्रूसावर मारण्याची शिक्षा पर्शियन लोकांमध्ये अस्तित्वात होती. ती त्यांनी असिरियन आणि बाबिलोनियन लोकांकडून अवगत केली होती. आलेक्झांदर दी ग्रेट याने ती शिक्षा पूर्वेकडील देशात ख्रिस्तपूर्व चवथ्या शतकात आणली तर फोनेशियन लोकांकडून तिसऱ्या शतकात रोमन लोकांनी ती शिकून घेतली. रोमन साम्राज्यात या शिक्षेचा वापर होऊ लागल्यानंतर त्या काळातील अत्याधुनिक तांत्रिक आणि शास्त्रीय पद्धतीने ती शिक्षा देण्याचे तंत्र असे साधले गेले की ज्याद्वारे गुन्हेगाराला जास्तीत जास्त वेदना सहन कराव्या लागतील. क्रौर्याचा परमोच्च बिंदू गाठणारी ही शिक्षा अतिशय नीच दर्जाचे गुन्हेगार, बंडखोर, देशद्रोही आणि पळून जाणारे गुलाम अशांनाच दिली जाई.

     क्रूसाच्या शिक्षेपूर्वी वधस्तंभावर किंवा सुळावर गुन्हेगारांना मारण्याची शिक्षा अस्तित्वात होती. वधस्तंभ म्हणजे जमिनीत उभा केलेला एक खांब; ज्यावर गुन्हेगारांना बांधून ठार करण्यात येई; तर सुळ म्हणजे जमिनीत उभा केलेला एक अणकुचिदार खांब त्यावर गुन्हेगारांना अशा प्रकारे ठेवले जाई की तो सुळ गुन्हेगाराच्या पोटातून आरपार जाऊन त्याला मृत्यू येई या शिक्षेला इंग्रजीत इम्पालमेंट असे म्हणतात.

     वधस्तंभ आणि सुळ यावरील शिक्षा देण्याची पद्धत लक्षात घेता येशूला वधस्तंभावर दिले अगर सुळावर दिले असे म्हणणे किती चुकीचे आहे ते आपल्या लक्षात येईल. वधस्तंभ किंवा सुळ हा एकच खांब असतो तर एका उभ्या लाकडावर दूसरा आडवा खांब जखडून क्रूस (किंवा क्रॉस) तयार केला जातो. रोमन साम्राज्यातील क्रूसावरील मृत्यूदंडाची शिक्षा ही वधस्तंभावरील किंवा सुळावर देण्याच्या शिक्षेची सुधारित आवृत्ती होती असे म्हणता येईल. यावरून क्रुसाऐवजी वधस्तंभ किंवा सुळ शब्द वापरणे, बरोबर नाही हे लक्षात येईल.

क्रूसावर चढविण्यापूर्वी :

क्रूसावरील मृत्यूदंडाची शिक्षा फर्माविलेल्या गुन्हेगाराच्या खांद्यावर क्रूसाचे भलेमोठे ओझे देऊन त्याची भर वस्तीतून धिंड काढण्यात येत असे. त्याला ज्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली असेल त्याचा फलक घेऊन सरकारी बेलीफ पुढे चाललेला असेकिंवा सदर गुन्हेगाराच्या गळ्यात टांगविला जाई. हाच फलक नंतर क्रूसाच्या वरच्या भुजेवर लावला जाई. (मत्तय 27:37) शिपायांच्या पाहऱ्यानीशी गुन्हेगाराला गावाबाहेरील उंच ठिकाणी नेऊन क्रूसावर खिळले जाई, उद्देश असा की साऱ्या लोकांना त्या जीवघेण्या शिक्षेचे दर्शन घडून त्यांच्या मनात शासनाविषयी भीती व दहशत निर्माण व्हावी.

     क्रूसावर चढविण्यापूर्वी गुन्हेगाराला जास्तीत जास्त एकोणचाळीस फटक्यांची शिक्षा दिली जाई. ( हे फटके सराईतांकडून पाठीवर आणि ढुंगणावरच मारले जात. फटके मारणाऱ्याच्या हातातील चाबकाला ‘फ्लगरम’ असे म्हणतात. त्या असुडाला तीन चामडी पट्टे असत व तीनही पट्यांच्या शेवटी धातूचे किंवा हाडांचे लहान तुकडे बांधलेले असत. त्यामुळे एका फटक्यासरशी गुन्हेगाराच्या पाठीवर तीन जखमा होत असत अशा या जबरदस्त फटक्यांच्या मारामुळे गुन्हेगार अर्धमेला होई. येशूला अशा रीतीने ३९ फटके मारले गेले होते. (पहा योहानाचे शुभवर्तमान १९:१)

क्रूसावर खिळण्याची पद्धत :

क्रूसाच्या आडव्या लाकडावर गुन्हेगाराचे दोन्ही हात प्रथम खिळले जात. हे खिळे ठोकताना हाताच्या मनगटातून खिळे ठोकत; पंजातून नव्हे. त्याला एक शास्त्रीय कारण होते. हाताच्या पंजातून खिळे ठोकले तर पंजे फाटून शरीर खाली कोसळेल, मात्र मनगटाच्या सांध्याजवळ तीन हाडांच्या मध्ये लहान पोकळी असते; तिला इंग्रजीत डेस्टॉल पॉइंट असे म्हणतात. या पोकळीतून खिळा ठोकला तर त्यावर संपूर्ण शरीराचा भार सांभाळला जाऊ शकतो, कारण त्याच्या बाजूला मनगटाच्या सांध्याची भक्कम हाडे असतात. डेस्टॉल पॉइंट मधून खिळा ठोकताना हाताच्या बोटाकडे जाणारी संवेदनावाहिनी चिरडली गेल्याने प्रथम हाताचा अंगठा तळहातात खुपसला जातो व त्यानंतर मुठी आवळल्या जातात. अशा तऱ्हेने हात खिळून झाल्यावर गुन्हेगाराचे दोन्ही पाय उभ्या लाकडावर एकमेकांवर दाबून एकत्र खिळीत आणि तो क्रूस जमिनीतील खड्यात उभा केला जाई. अशाप्रकारे गुन्हेगाराला क्रूसावर खिळून झाल्यावर मारेकरी बाजूला उभे राहून गुन्हेगाराची चेष्टा करीत व त्याच्या वेदना आणि विव्हळणे न्याहाळण्याचा आसुरी आनंद लुटीत असत. गुन्हेगाराला क्रूसावर खिळण्यापूर्वी विवस्त्र केले असल्याने मारेकरी गुन्हेगाराचे कपडे आपसात वाटून घेत. (मत्तय २७:३५, योहान: १९:१७-३०) गुन्हेगाराच्या कंबरेला एखादा फडका गुंडाळीत.

क्रुसावरील मृत्यू :

क्रुसावरील मृत्यूदंड दिल्याने मरण पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहाचे आजच्या आधुनिक पद्धतीने शवविश्लेषण केले तर वैद्यकीय निष्कर्ष असा निघेल की सदर व्यक्तिला श्वासावरोधामुळे मृत्यू आला. वास्तविक क्रुसावर खिळल्याने मृत्यू येत नसून त्त्या व्यक्तिला जबरदस्त क्लेश आणि यातना सहन करीत मृत्यू भोगावा लागतो.

क्रुसावर हातपाय खिळलेली व्यक्ती जबरदस्त वेदनांनी विव्हळत असताना श्वासोच्छ्वास करण्यासाठी धडपडत असते. त्याला श्वास शरीरात घेण्यासाठी पायांच्या खिळ्यावर जोर लाऊन संपूर्ण शरीर वरच्या बाजूला घ्यावे लागे, तर श्वास बाहेर सोडताना शरीराचा भार हळूहळू खाली जाऊन हाताच्या खिळ्यांवर तो भार पडत असे. अशा प्रकारे श्वासोच्छ्वास घेण्यासाठी त्याला शरीराची वरखाली हालचाल करावी लागत असे. श्वासोच्छ्वासाचा वेग वाढून रुधिराभिसरणाची प्रक्रिया वेगाने होऊ लागे. रक्ताचा दाब प्रमाणाबाहेर वाढून छातीमधील भागात अंतर्गत रक्तस्त्राव होत असे. फुफ्फुसात रक्त जमा होई. त्या जमा झालेल्या रक्तातील पाणी वेगळे होऊन द्रवरूपाने वरच्या बाजूला साचे. त्यामुळे श्वासोच्छ्वासाला अडथळा निर्माण होई शेवटी त्या व्यक्तीचा श्वास बंद पडून मृत्यू होत असे. मात्र अशा प्रकारचा मृत्यू सर्वच गुन्हेगारांना लवकर येत नसे. धष्टपुष्ट गुन्हेगार तासनतासच नव्हे तर दिवसभर क्रुसावर तळमळत मरणाशी झगडत राहत. त्यामुळे गुन्हेगाराला क्रूसावर किती वेळ ताटकळत ठेवायचे हे ठरलेले असे. त्या ठरलेल्या वेळात त्याने प्राण सोडला नाही तर मारेकरी त्याला लवकर मरण्यास मदत करीत. प्रथम ते त्याच्या दोन्ही पावलांच्या तळव्यांची हाडे मोडीत. पायांचा आधार तुटताच शरीर मनगटांच्या खिळ्यावर टांगून राही. पाय मोडल्याने श्वास आत घेण्यासाठी शरीर वर उचलता येत नसे. त्यामुळे त्या व्यक्तीचा श्वास गुदमरून मृत्यू येत असे. शरीरातील प्राण निघून जाताच खाली मान टाकलेला मृतदेह क्रुसावर लोंबकळत राही. तरीही ती व्यक्ती कदाचित जिवंत असेल व तसे राहू नये म्हणून एक शिपाई भाला घेऊन मृत व्यक्तीच्या उजव्या कुशीतील पाचव्या आणि सहाव्या बरगड्यांच्या मधून तो भाला शरीरात घुसवित असे व तो थेट हृदधयातून आरपार मारला जात असे. त्याबरोबर हृदधयाच्या आजूबाजूला जमा झालेले पाणी आणि रक्त बाहेर येत असे. त्यानंतरच मृत व्यक्तीचे नातेवाईक येऊन तो मृतदेह ताब्यात घेत असत.

अशी ही जगाच्या इतिहासातील मानवी क्रूरपणाचा कळस गाठणारी क्रुसावरील मृत्यूदंडाची शिक्षा इसवी सन 320 साली सम्राट कोंस्टंटटाईन नावच्या बादशहाने कायमची बंद केली.

संदर्भ : कॅथॉलिक (संपादक : स्टीफन आय. परेरा, वसई)

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भ यादीसंपादन करा

  1. ^ "यीशु". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2020-01-05.
  2. ^ http://en.wikipedia.org/wiki/Special:BookSources/0567080463


बाह्य दुवासंपादन करा