ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे (१० जून, इ.स. १९२८:पाडळी, सिन्‍नर तालुका, महाराष्ट्र - २६ जानेवारी, इ.स. २०१५:श्रीरामपूर, महाराष्ट्र) शिक्षण व सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असलेले एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष होते. भारताचे माजी मंत्री कै. अण्णासाहेब शिंदे हे रावसाहेबांचे ज्येष्ठ बंधू होत.

रावसाहेब शिंदे यांनी पाडळी व देवठाण (नाशिक) येथे प्राथमिक शालेय शिक्षण घेतले. त्यांचे माध्यमिक शिक्षण सिन्नर व नाशिकच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व संगमनेरच्या पेटिट विद्यालयात झाले. नगर, कोल्हापूर व पुणे येथे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. ते बी.ए. एलएल.बी. होते.

स्वातंत्र्य चळवळीत सहभाग

संपादन

रावसाहेब शिंदे हे कॉलेजात असतानाच भारतीय स्वातंत्र्य चळवळ जोरात सुरू होती. ‘करेंगे या मरेंगे’ आंदोलनात त्यांनी भाग घेतला. १९४२ च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात व नाशिकला राष्ट्रसेवा दलात काम करताना गुप्त बैठका आयोजित करणे, बुलेटिन काढणे, प्रभात फेऱ्या व मोर्चे काढणे, रस्ते अडविणे, पूल तोडणे, तारा तोडणे अशा भूमिगत चळवळींमध्ये ते सक्रिय होते. मोठे बंधू व माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री (कै.) अण्णासाहेब शिंदेंसह सर्व शिंदे परिवार स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाल्याने ब्रिटिशांनी त्यांचे पाटील वतन रद्द केले. मात्र या परिवाराचे कार्य थांबले नाही. त्‍यासाठी रावसाहेबांना दोन वेळा तुरुंगवास भोगावा लागला.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर

संपादन

स्वातंत्र्यानंतर देशात स्वकीयांचे राज्य आले. मात्र शेतकरी, आदिवासी व गरीब जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्याचे प्रकार वाढू लागले. सावकारशाहीच्या विळख्यात अडकलेल्या जनतेला मुक्त करण्यासाठी रावसाहेबांनी सत्ताधारी स्वकीयांच्या अन्यायाविरुद्ध दंड थोपटले. साम्यवादी चळवळ व किसान सभेच्या माध्यमातून शेतकरी, आदिवासींच्या संघटना तयार केल्या. शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करणाऱ्या दस्तावेजांची होळी व सरकारी गोदामे फोडून गरिबांना धान्यवाटप अशी आंदोलने केली. त्यामुळे रावसाहेबांना फरारी घोषित करून त्यांना पकडून देणाऱ्यास दहा हजारांचे बक्षीस जाहीर झाले होते. १९४५ ते १९५१ पर्यंतच्या या काळातील त्यांचे कार्य दीनदलितांना व गरिबांना न्याय देऊन गेले.

रावसाहेब शिंदे यांचे समाजकार्य

संपादन

स्वराज्य मिळविल्यानंतर त्याचे सुराज्यात रूपांतर व्हावे, यासाठी ॲड. शिंदे यांनी आयुष्यभर प्रयत्‍न केले. १९५४ पासून १९९१ पर्यंतच्या ३७ वर्षांच्या काळात वकिली, सहकार विकास, शेतीमध्ये प्रयोगशीलता, दुग्धोत्पादन याकडे लक्ष देत असतानाच दुसरीकडे बाबा आमटेंसमवेत कुष्ठरुग्णांच्या सेवाकार्यात त्यांनी भाग घेतला. वकिली करताना दरवर्षी ६५ खटले मोफत व २३५ खटले माफक शुल्क घेऊन लढविले. गरीब कुळांना स्वखर्चाने खटले लढवून जमिनी मिळवून दिल्या. भोकर व ऐनतपूर येथील स्वतःच्या शेतीचा विकास करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, सुधारित वाण, औषधी वनस्पती, फळझाडांची लागवड असे प्रयोग केले. बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’ येथील कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसन उपक्रमात भाग घेताना, तेथील अपंगांनी तयार केलेल्या वस्तूंची प्रदर्शने, अंध कलावंतांच्या ऑर्केस्ट्रांचे आयोजन, ‘आनंदवन’च्या शुभेच्छा कार्डांची विक्री असे उपक्रम राबविले. तसेच श्रीरामपूर परिसरातील विवाह समारंभ, वाढदिवस, पदोन्नती, नेमणूक, घरभरणी वा दशक्रिया विधीसारख्या कार्यक्रमांतून ‘आनंदवन’साठी देणगी देण्याची प्रथा रुजविली. यातून सुमारे दहा लाखांचा निधी ‘आनंदवन’ला त्यांनी पाठविला.

शेतमजूर, आदिवासी यांच्या अन्यायाविरोधात लढा उभारणारे शिंदे हे निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध होते. ते श्रीरामपूर बार असोसिएशनचे १५ वर्षे अध्यक्ष होते. पुणे येथील इंडियन लॉ सोसायटीचे अध्यक्षपदही त्यांनी काही काळ सांभाळले. वकिलीखेरीज त्यांनी शेती, पाणीप्रश्‍न, दुग्ध व्यवसाय, सहकार, सामाजिक उपक्रम, शिक्षण व लेखनासह अनेक क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविला.

समाजजीवनाच्या बहुतांश विषयांत रस घेऊन उत्तुंग कार्य उभे करणारे ॲड. शिंदे शेवटपर्यंत उत्साहाने कार्यरत होते. वकिली व्यवसायाच्या माध्यमातून सामान्यांना न्याय मिळवून देत नवनवे प्रयोग राबवून रावसाहेबांनी शेतीविकासाचा आदर्श उभा केला होता. साहित्य-संस्कृतीच्या माध्यमातून रसिकतेचे दर्शन घडवितानाच रयत शिक्षण संस्थेच्या द्वारे गरीब मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोचविण्याचे महत्‌कार्य त्यांनी केले. निर्भीड व अभ्यासू वक्ता, अशी ख्याती असलेल्या रावसाहेबांनी राज्यात व देशाच्या विविध भागांत फिरताना सामाजिक कार्याचा जोमाने प्रसार केला.

रावसाहेब शिंदे यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारे ध्याससक्त, पत्रसंवाद, प्रेरणा पर्व हे तीन ग्रंथ प्रकाशित करण्यात आले होते.

संस्थाविषयक कार्य

संपादन

विद्यार्थी दशेत शिक्षणानिमित्त संगमनेरला असताना रावसाहेबांनी तेथे शिंदे बोर्डिंगची स्थापना केली. गरीब मुलांना एकत्र करून सहभोजन, सहनिवास व सहशिक्षण असा एकात्म सहजीवनाचा पायंडा निर्माण केला. विद्यार्थ्यांची चळवळ चालवून विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे प्रश्‍न सोडविले. पुढे रयत शिक्षण संस्थेत काम करताना याच कार्याचा वारसा होता. ‘रयत’च्या माध्यमातून गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात मोलाचा वाटा त्यांनी उचलला. ‘कमवा व शिका’ ही कर्मवीरांची स्वावलंबी शिक्षणाची योजना विद्यार्थ्यांमध्ये रुजविली. ‘रयत’साठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता व नेता म्हणून त्यांची ख्याती होती. अभ्यासूपणा, प्रश्‍न मुळापासून समजून घेण्याची हातोटी, श्रमिकांच्या श्रमाचे मोल जाणण्याची वृत्ती व उत्कृष्ट वक्तृत्वाद्वारे नेमकेपणाने प्रश्‍न मांडण्याचे कसब यामुळे ॲड. शिंदे यांचे नाव महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशात पोचले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, विनोबा भावे प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद अशा अनेक संस्थांच्या उभारणीत रावसाहेब शिंदे यांचा हातभार लागला होता.

रावसाहेब शिंदे यांनी वृत्तपत्रे, मासिके व नियतकालिकांतून शेती, शिक्षण, समाज, सहकार, संस्कृती अशा विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांची प्रकाशित पुस्तके :

  • एज्युकेशन अँड सोसायटी
  • चरित्र आणि चारित्र्य
  • शिक्षण आणि समाज
  • ध्यासपर्व
  • भावलेली माणसं
  • संवादपर्व खंड १ ते ५

पुरस्कार

संपादन
  • आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार (सप्टेंबर २०१०)
  • महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार
  • समाजरत्‍न पुरस्कार
  • जीवन साधना गौरव पुरस्कार