डॉ. राम देशपांडे हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे एक मराठी गायक आहेत. श्री. चेपे, पानके आणि पंडित प्रभाकर देशकर यांच्यामुळे राम देशपांड्यांना संगीतात रुची निर्माण झाली.

राम देशपांडे हे नागपूर विद्यापीठात संगीत हा विषय घेऊन एम.ए. आणि त्यानंतर पीएच.डी झाले. ‘मिश्र राग’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. पं. वि.रा. आठवले हे त्यांचे पीएच.डीचे मार्गदर्शक होते.

त्यानंतर पंडित यशवंतबुवा जोशी आणि उल्हास कशाळकर यांच्याकडून प्रशिक्षण घेत राम देशपांडे यांनी ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्यांची गायकी संपादन केली. त्याशिवाय त्यांनी पं. बबनराव हळदणकर यांच्याकडून आग्रा घराण्याची तालीम घेतली आणि पंडित यशवंतराव महाल्यांकडून भातखंडे परंपरेचे ज्ञान मिळवले.

गमक, बेहलाव आणि मींड या गायनाच्या अंगांवर डॉ. राम देशपांडे यांची हुकूमत आहे. त्यांच्या लयकारी आणि ताना यांबद्दल ते रसिकांत लोकप्रिय आहेत. प्रचलित आणि अनवट रागांचा त्याचा खासा अभ्यास आहे.