राज गिधाड

पक्ष्यांच्या प्रजाती

राज गिधाड किंवा लाल डोक्याचे गिधाड (इंग्रजी: Red-headed Vulture) भारतीय उपखंडात आढळणारे गिधाड आहे.

राज गिधाड

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: एव्हीज
वर्ग: ॲक्सिपिट्रिफॉर्मेस
कुळ: ॲक्सिपिट्रिडे
जातकुळी: सार्कोजिप्स
जीव: एस. कॅल्वस
शास्त्रीय नाव
सार्कोजिप्स कॅल्वस
(स्कोपोली, १७८६)

ओळखण संपादन

हे एक मध्यम आकाराचे गिधाड आहे. त्याची लांबी ७६ — ८६ सेंमी, पंखांची लांबी १.९९ — २.६ मी आणि वजन ३.५ — ६.३ किलोग्रॅम असते. या गिधाडांच्या डोक्यावर पिसे नसतात. प्रौढ गिधाडांचे डोके गर्द लाल ते नारंगी रंगाचे असते, तर अल्पवयीन गिधाडांचे डोके फिकट लाल रंगाचे असते. त्याच्या शरीराचा रंग काळा असतो आणि पंखांच्या बुडाला छातीवर फिकट करडा पट्टा असतो. चोच मोठी, मजबूत, टोकाशी वाकडी आणि काळसर असते. नर आणि मादी दिसायला सारखे असतात. एक फरक म्हणजे नरांचे बुबुळ पांढरे असते, तर माद्यांचे गर्द तपकिरी असते.

मेलेल्या प्राण्यांच्या मांसावर हे उपजीविका करतात. खेड्यापाड्यांच्या किंवा गावांच्या आसपास फेकून दिलेल्या मेलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता तेथे गिधाडे, घारी, कावळे वगैरे गोळा होतात आणि मांसावर ताव मारतात. थोड्याच वेळात हे पक्षी मेलेल्या जनावराचा फक्त सांगाडाच शिल्लक ठेवतात.

वितरण संपादन

एके काळी ही गिधाडे संपूर्ण भारतात विपुल प्रमाणात आढळत असत. ते पूर्वेला सिंगापूरपर्यंत आढळत असत. आता त्यांचे क्षेत्र मुख्यत: उत्तर भारतापुरते मर्यादित राहिले आहे. ते मोकळा, शेतीचा प्रदेश आणि अर्ध वाळवंटी प्रदेशात आढळतात. त्याचबरोबर पानगळी जंगले, नद्यांचे खोरे आणि दऱ्यांमध्येसुद्धा आढळतात. ते समुद्रसपाटीपासून ३००० मी उंचीपर्यंत आढळतात.

संरक्षण स्थिती संपादन

गेल्या काही दशकांमध्ये या गिधाडांची संख्या सतत कमी होत होती. पण १९९४ नंतर यांची संख्या कमी होण्याचा दर खूप वाढला आणि दर दोन वर्षांनी त्यांची संख्या आर्धी होऊ लागली. याचे कारण जनावरांना सांधेदुखीच्या आजारासाठी दिले जाणारे औषध डायक्लोफिनॅक होते. डायक्लोफिनॅक गिधाडांसाठी अतिशय विषारी आहे.[२] जेव्हा हे औषध खाल्लेले जनावर मरते, आणि त्या जनावराला मरण्याच्या काही वेळापूर्वीच हे औषध देण्यात आले असेल, तर अश्या जनावराला गिधाडाने खाल्ले असता ते औषध गिधाडांच्या शरीरात जाते आणि त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे एके काळी लाखोंच्या संख्येत असणारी ही गिधाडे दोनच दशकात नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहेत. त्यामुळे याला अतिशय चिंताजनक प्रजाती घोषित करण्यात आले आहे.

जनावरांची अनेक औषधे मेलेल्या जनावरांचे मांस खाणाऱ्या पक्ष्यांसाठी घातक आहेत. डायक्लोफेनॅक, कारप्रोफेन, फ्लुनिक्सिन, इबुप्रोफेन आणि फिनाईलब्युटॅझोन यांमुळे गिधाडांचा मृत्यू होतो. आता मेलॉक्सिकॅम हे नवीन औषध उपलब्ध झाले आहे जे गिधाडांसाठी हानिकरक नाही.

संदर्भ संपादन

  1. ^ बर्डलाइफ इंटरनॅशनल. "सार्कोजिप्स कॅल्वस". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आवृत्ती २०१३-२. १९-०४-२०१७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: ref=harv (link)
  2. ^ Green, Rhys E.; Newton, IAN; Shultz, Susanne; Cunningham, Andrew A.; Gilbert, Martin; Pain, Deborah J.; Prakash, Vibhu (2004). "Diclofenac poisoning as a cause of vulture population declines across the Indian subcontinent". Journal of Applied Ecology. 41 (5): 793–800. doi:10.1111/j.0021-8901.2004.00954.x.