यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

महाराष्ट्रातील एक मुक्त विद्यापीठ

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक विद्यापीठ आहे. त्याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. प्रा.संजीव सोनवणे हे सध्या (मे 2023साली) विद्यापीठाचे कुलगुरू आहेत व डॉ. दिनेश भोंडे विद्यापीठाचे कुलसचिव आहेत. हे विद्यापीठ १ जुलै १९८८ रोजी सुरू झाले. विद्यापीठाचे संस्‍थापक कुलगुरू डॉ.राम ताकवले यांनी आपल्या कल्‍पक दृष्‍टीने आणि कार्यपद्धतीने बहुमाध्‍यम तंत्रज्ञानाचा उपयोग करत लोकांना त्यांच्या गरजेची कौशल्ये प्राप्‍त करून घेण्‍यासाठी आवड, सवड व निवड याला प्राधान्‍य देणारे अभ्‍यासक्रम तयार केले, त्यामुळे. अशा प्रकारच्या शिक्षणाच्‍या संधी या विद्यापीठामुळे उपलब्‍ध झाल्या.

देशातील या पाचव्या मुक्त विद्यापीठास यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्यावे असा आग्रह कुसुमाग्रजांनी धरला होता. विद्यापीठाचे गीत कुसमाग्रज यांनी लिहिले.

विद्यापीठातली अध्यासने

संपादन
  • कुसुमाग्रज अध्यासन : या अध्यासनातर्फे दरवर्षी कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार, श्रमसेवा पुरस्कार, कथालेखन पुरस्कार आणि ज्ञानदीप पुरस्कार, आदी देण्यात येतात. २०१६ साली छिदवाडा येथील साहित्यिक डॉ. विष्णू खरे यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अमरावतीच्या सामाजिक कार्यकर्त्या रझिया सुलताना यांना श्रमसेवा पुरस्कार तर, नाशिकच्या हेमलता बिडकर यांना ज्ञानदीप पुरस्कार प्रदान झाला. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या दोनही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
  • वेश्या व्यवसायातील महिलांसाठी काम करणाऱ्या पुणे येथील उषाताई वाघ यांना २०१४ सालचा श्रमसेवा पुरस्कार प्रदान झाला.
  • धुळ्याच्या समाजसेविका नजूबाई गावित यांनाही श्रमसेवा पुरस्कार मिळाला आहे.
  • कन्‍नड साहित्यिक डॉ. एच.एस. शिवप्रकाश यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार (२०१७)
  • लातूरच्या मेनका धुमाळे यांना बाबुराव बागुल कथालेखन पुरस्कार (२०१७)

विद्यापीठाचे गौरव

संपादन

कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग ही संस्था जगभरातील ५३ कॉमनवेल्थ देशांच्या सरकारांनी १९८७ साली स्थापित केली. कॅनडाने या संस्थेचे यजमानपद स्वीकारले. शाश्वत व प्रगत विकासासाठी मुक्त व दूर शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाचे नवे स्रोत निर्माण करणे व जगभरातील वंचीतांपर्यंत आधुनिक ज्ञानाचे भांडार पोचविणे हे उद्दिष्ट ठेवून ह्या संस्थेने अनेक माध्यमातून मुक्तशिक्षण संस्थांना मदतीचा हात दिला आहे. त्यातून मुक्त शिक्षण पद्धतीचा दर्जा, क्षमता आणि तंत्रज्ञानाचा वापर यांचा विकास करण्याचे कौशल्य संस्थांमध्ये निर्माण झाले. परिणामी मुक्त व दूरशिक्षणाची चळवळ सक्षमपणे उभी राहिली.

अश्या ह्या संस्थेने नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला अवार्ड ऑफ इन्स्टिट्यूशनल एक्सलन्स या पुरस्काराने सन्मानित केले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन आणि कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी स्कॉटलंड मधील एडिनबर्ग येथे एका भव्य समारंभात हा पुरस्कार स्वीकारला (सप्टेंबर २०१९). ह्या पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या समितीने एकमुखाने प्रशंसा करताना या विद्यापीठाने अत्यंत अल्पावधीत तंत्रज्ञानाचा वापर करून लक्षावधी विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वीरीत्या पोचल्याचे पाहून आपण प्रभावित झाल्याचे नमूद केले आहे.

नाशिकच्या मुक्त विद्यापीठास सन्मानपूर्वक दिलेल्या मानपत्रात कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगने पुढील मुद्द्यांचा उल्लेख करून प्रशंसा केली आहे :-

  • तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
  • विद्यार्थ्यांच्या नोंदणीपासून प्रमाणपत्र वितरणापर्यंत संगणकीय तंत्राचा वापर
  • शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कुशल व कार्यक्षम मनुष्यबळ विकासित करणे
  • २००२मध्ये प्रथम मिळालेल्या याच पुरस्कारपासून आजतागायत राखलेले प्रामाणिक प्रयत्न


बाह्य दुवे

संपादन