मोहटादेवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक देवीचे देऊळ आहे.. हे मंदिर हे महाराष्ट्रातील देवींच्या मोठ्या मंदिरांपैकी एक आहे.

पाथर्डी शहराच्या पूर्वेकडे ९ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. या मोठ्या मंदिराशिवाय मोहटादेवीचे आणखी एक छोटेसे मंदिर टेकडीवर आहे. या मंदिर परिसरातील पूर्वीचे जुने मंदिर पूर्णपणे हटवून त्या जागेवर देवस्थानातील सुखसोईंनीयुक्त असे दर्शनरांगेसह बांधकाम झाले आहे. या भव्य मंदिर बांधकामासाठी राजस्थानातील जैसलमेर येथून दगड आणले होते. मंदिरांच्या शिलाखंडांवर दीड वर्षे नक्षीकाम, कोरीव काम सुरू होते. मंदिरांचे खांब उभे करण्याचे कसरतीचे काम पूर्ण झालेले आहे. या नक्षीकामासाठी १५ कारागीर कामाला लावले होते. आजही २०१५ साली या मंदिर परिसरात देवस्थान विकासांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

१० एकर परिसरात, सुमारे २५ कोटी रुपयांच्या देवीभक्तांच्या देणग्यांमधून व दानांमधून दक्षिण भारतीय पद्धतीचे हे मंदिर उभारले जात आहे. या देवस्थानाच्या आवारात पाच मजली इमारत, भक्त निवास, भोजनकक्ष, व्हीआयपींच्या निवासाची सोय, देवस्थान समिती कार्यालय, देवस्थान समितीचे चेरमन, पदाधिकारी यांचे स्वतंत्र कार्यालय वगैरे उभारली असून कीर्तन, भजन यांसाठी एक भव्य मंडप उभारला आहे.

देवीची आरती दिवसभरात तीन वेळा होते. पहाटे ५ वाजल्यापासून पूजेला आरंभ होतो. सकाळी ७ वा. पहिली आरती, दुपारी १२ वा. आणि सायं.७ वा. महाआरती केली जते. भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत मंदिर खुले असते. नवरात्रात येथे शारदीय महोत्सवाचे आयोजन देवस्थान समितील भाविक करतात. १५ दिवसांचा हा भक्तिउत्सव असतो. मोहटागडाच्या पायथ्याला असणाऱ्या मोहटा गावातून देवीची पालखी, मिरवणूक आयोजित केली जाते.

नवसाला पावणारी देवी म्हणून मोहटादेवीची ख्याती आहे. रझाकाराच्या काळात मोहटा गावात म्हशीचोरीची आख्यायिका आहे त्यामुळे येथे आजही येथे दूध, दही, लोणी, तूप विकले जात नाही.

या देवस्थानाचे माहात्म्य सांगणारे पप्पू खान यांनी ’जय रेणुका माता’ व उद्योगपती रमेश खाडे यांनी ’मोहट्याची देवी रेणुकामाता’ हे मराठी चित्रपट काढले आहेत.


मंदिरातील गोल भागात आपण शक्यतो न ऐकलेल्या मातेची वेगवेगळी रुपे छान दगडी कोरीव काम असलेली पहायला मिळतात..

उदाहरणार्थ श्री भुवनेश्वरी महाविद्या, श्री भेरुण्डा कींवा श्री छिन्नमस्ता महाविद्या... अशा प्रकारची नावे वेगवेगळी रुपे पहायला मिळतात..

आख्यायिका

संपादन

श्री भगवान वृद्धेश्वर (म्हातारदेव) आदिनाथ गुरू सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।।

मच्छिंद्रनाथांची संजीवन समाथी सावरगांव येथे, कानिफनाथांची संजीवन समाधी मढी ,(श्री क्षेत्र कानिफनाथ गड)येथे अशा भूमीमध्ये फार फार वर्षापूर्वी नवनाथांनी जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी एक महायज्ञ करून भगवती, महाशक्ती श्री जगदंबादेवीची आराधना केली. या महायज्ञास अनेक ऋषीमुनींना पाचारण केले. यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या. त्याचवेळी पृथ्वीवर महादुष्काळ पडला होता.

यज्ञाद्‌ भवति पर्जन्यो पर्जन्याद्‌ अन्न संभवः ।। या उक्तीप्रमाणे विपुल अशी पर्जन्यवृष्टी होऊन भरपूर अन्य धान्याची निर्मिती झाली. प्राण्याना चारा उपलब्ध झाला. लोक आनंदी झाले. आणि पूर्णाहुती सोहळ्याच्या वेळी यज्ञकुंडात एक दिव्यशक्ती प्रगट झाली. तीच महाशक्ती श्री जगदंबा रेणुका माता. नवनाथाना तिने वरदान दिले व जगत्‌ कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्वास आशीर्वचन दिले. त्यावेळी जगदोद्धारार्थ तू याच ठिकाणी रहावे अशी आईस प्रार्थना केली. तेव्हा मला काम आहे हे सांगून योग्यवेळी मी येथे पुन्हा प्रगट होऊन येथेच राहीन असे वचन दिले.

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत । अभ्युत्थानमधर्मस्य संभवामि युगे युगे ।। या न्यायाने एकाच्या कैवारे उघडी बहुतांची अंतरे यानुसार मोहटा गांवच्या दहिफळे बन्सी, हरी गोपाळ, आदींच्या निमित्ताने जगत्‌ कल्याणार्थ रेणुकामाता येथे प्रगट होऊन स्थानापन्न झाली. व मोहटादेवी या नावाने प्रसिद्ध झाली.

देवीच्या नावे क्षेत्र मोहटादेवीगड प्रसिद्ध झाले.

जनमानसातील विकाररुपी, मोहादि, राक्षसांचा वध करून मोहात अडकवून स्वधर्माचे विस्मरण होत चाललेल्या माणासास जागे करून दिव्य शक्ती, दृष्टी प्राप्त होऊ लागली. लोक जसजसे भजू लागले उपासना करु लागले तस तशी त्याची मनोकामना पूर्ण होऊ लागली. आनंदाने जगू लागले. जीवनातील अगतीकथा, नैराश्य, दुःख दारिद्र्य, क्लेश, दैर्बल्यता,नी राष्ट्रविघातक प्रवृत्ती, दैन्य नाहीसे होऊ लागले व मी सामर्थ शक्तिसंपन्न बलवान आहे असा आत्मविश्वास माणसास वाटू लागला आणि जगण्याचा यथार्थ आनंद मिळू लागला ही सारी किमया महती श्री मोहटादेवीचीच होय, असे भक्त समजतात.

शरीराचे आणि मनाचिया रोग । न होतीहे भोग प्रारब्धाते ।।

रोगट शरीर व मन हे आपल्याच कर्माचे फळ आहे. तो रोग आपणच नाहीसा केला पाहिजे, हा उपदेश माणसास मिळू लागला. मनातील विकल्प जाऊन सत्यसंकल्पत्व प्राप्त होऊ लागले. आत्वल क्षीण झाले. नाहीसे झाले की, नाना व्याथी मनास ग्रासून टोकतात व मनुष्य जिवंत असूनही जिवंतपणाची अनुभूती येत नाही ही अवस्था नष्ट होऊन आत्मबल प्राप्त होऊन जगत असताना जीवनानंद मिळण्यासाठी प्रत्येक क्षणी शक्ती प्राप्त होते, हाच मोहटादेवीच्या कृपेचा नित्य अनुभव, साक्षात्कार, चमत्कार व हीच महती आहे असे भक्त समजतात.

अनेक भक्तगणांना दृश्य स्वरूपात साक्षात्कार होऊ लागला व श्रीमोहटादेवीची महती गावोगावी पसरू लागली. श्री मोहटादेवीच्या स्वरूपाकडे पाहिले की, कितीही दुःखी असणारे मन हे प्रसन्न होते हीच पहिली अनुभूती.

म्हशीचा रंग बदलला - एक कथा

संपादन

एक दिवस मोहटा गावामध्ये एकदा वाट चुकलेल्या म्हशी आल्या. म्हशी काही दिवस सांभाळून ज्यांच्या असतील त्यांना देऊ अशीच भावना ठेवून ग्रामस्थांनी त्या ठेवून घेतल्या. अनेक दिवस वाट पाहूनही कुणीही आले नाही. मात्र ही वार्ता मोगलांच्या नाकेदारांना कळली व त्यांनी म्हशी चोरीचा आरोप भक्तांवर केला. आणि त्यांना बोलावून बंदिस्त करण्याचे आदेश केला. बिचाऱ्या भक्तांस खूप दुःख झाले. दुःखातून मुक्त होण्यासाठी त्यांनी मोहटादेवीची आळवणी केली. खडा पहारा केला उपवास केला व नवस केला. आई, यापुढे आम्ही गायी-म्हशीचे दूध, तूप, विकणार नाही व तुला अर्पण केल्याशिवाय खाणारदेखील नाही, परंतु हे संकटनिवारण कर. आम्ही कोणतीही चोरी केली नाही. भक्तांची भावना व सत्यसंकल्प पाहून मोहटादेवीची कृपा झाली. दुसऱ्या दिवशी नाकेदार, बंदिस्त करण्यास येणार होते त्याप्रमाणे आले आणि पाहतात तर रात्रीतून म्हशीचा काळा रंग बदलून पांढरा झाला. आदल्या दिवशी पाहिलेल्या ह्या म्हशी नाहीत हे नाकेदारांच्या लक्षात आले.व त्यांनी बंदिस्त करण्याचा हुकुम रद्द केला. तेव्हापासून आजपर्यत दहिफळे घराण्यातील लोक दूध, दही, तूप विकत नाहीत. व देवीस अर्पण केल्याशिवाय खातही नाहीत.

संदर्भ आणि नोंदी

संपादन