मुल्ला नुस्रती (?? - इ.स.१६७४)[१] हे विजापूरच्या आदिलशाही दरबारातील राजकवी होते. त्यांनी आपल्या काव्यरचना दक्खिनी, हिंदी आणि उर्दू भाषेत केल्या. यांनी विजापूरच्या तीन बादशहांची, मुहम्मद आदिलशाह, अली आदिलशाह आणि सिकंदर आदिलशाह यांच्या कारकिर्दी पाहिल्या.[१]

बालपण संपादन

यांचे बालपण आदिलशाही वातावरणात विजापूरातच व्यतित झाले. यांचे वडील लहान हुद्द्याचे सरदार होते. त्यांच्या वडिलांनी नुस्रती यांच्या विद्याभासाची व्यवस्थित काळजी घेतली. त्यासाठी चांगल्या शिक्षकांची नेमणूक केली होती. अशी माहिती खुद्द नुस्रती यांनीच आपल्या गुल्शने इश्क या काव्यात दिलेली आहे. [१]

राजाश्रय संपादन

विजापूरातच वाढलेल्या नुस्रती यांनी त्यानंतर आदिलशाही दरबाराचा आश्रय घेतला यात नवल नाही. तिथे त्यांना दरबारातील एक विद्वान काजी करीमुल्ला यांनी लेखनास प्रेत्साहन दिले. तरीही नुस्रती यांच्या मनात भीती होतीच. मात्र पुढे अली आदिलशहांच्या आदेशावरून त्यांनी लेखनास आरंभ केला.[१]

काव्यनिर्मिती संपादन

मुल्ला नुस्रती यांनी तीन ग्रंथ व कांही स्फूट काव्ये निर्माण केली.[१]

१. गुल्शने इष्क ( शके १५७९- इ.स. १६५७) संपादन

हे काव्य त्यांनी शके १५७९ म्हणजे इ.स. १६५७ मध्ये अली आदीलशहाच्या कारकिर्दीत लिहिले. हे प्रेमकाव्य आहे.

२. अलीनामा ( शके १५८७- इ.स. १६६५) संपादन

हा आपला अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ नुस्रती यांनी शके १५८७ म्हणजे इ.स.१६६५ मध्ये पुर्णत्वास नेला. या ग्रंथाची हस्तलिखितें हैद्राबाद येथील सेन्ट्रल रेकॉर्ड ऑफिस, सालारजंग ग्रंथालय आणि बिटिश म्युझियम, इंडिया ऑफिस ग्रंथालय आणि कराची येथे आहेत. या काव्यात प्रसंगानुसार कवीने सात कशीदे रचले आहेत. प्रत्येक कशीदा हा साधारणपणे हजाराच्यावर श्लोकांचा आहे.[१] ह्या ग्रंथांचे उर्दू लिपीतील संपादन सं. अब्दुल मजीद सिद्दीकी यांनी करून ते सालारजंग दक्खनी कमेटीने इ.स. १९५९साली प्रकाशीत केले आहे.

३. तारीखे इस्कंदरी ( शके १५९४- इ.स.१६७२) संपादन

हे काव्य नुस्रती यांनी शके १५९४ म्हणजे इ.स.१६७२ मध्ये पूर्ण केले. या ग्रंथाचे एकमेव हस्तलिखित कराची येथे आहे.

रसग्रहण संपादन

नुस्रती यांनी आपल्या काव्यांच्या दक्खिनी उर्दूत वा हिंदीत मराठी शब्दांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे दिसून येते. दक्खिनी उर्दू भाषेतला आद्य कवी म्हणून वली औरंगाबादी यांचे नाव जरी घेतले जात असले तरी वलीपेक्षा नुस्रती काळाने अगोदरचा असल्याचे मत उर्दू भाषेचो तज्ञ आणि नुस्रतीच्या काव्याचे अभ्यासक डॉ. अबदुल हक मरहुम व्यक्त करतात. त्यांच्या अभिप्रायानुसार नुस्रती वलीपेक्षा निदान साठसत्तर वर्षे अगोदरचे आहेत. काव्यगुणाच्या दृष्टीनेही नुस्रतींचा दर्जा अधिक उच्चतर असल्याचे मत डॉ. अबदुल हक मरहुम व्यक्त करतात.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ a b c d e f g देवीसिंह व्यकंटसिंह चौहान, दक्खिनी हिन्दीतील इतिहास व इतर लेख, समाविष्ट- प्रकरण २- नुस्रती व परमानंद, प्रका- वि.गो.खोबरेकर, इतिहास संशोधन मंडळ, दादर, मुंबई-१४, प्रथम संस्करण, १९७३. पान- १०.