श्रीमंत सुभेदार मालेराव होळकर द्वितीय बहादूर (१७४५ – ५ एप्रिल, १७६७), हे मराठ्यांच्या होळकर घराण्यातील इंदूरचे महाराज (राज्यकालावधी १७६६ – १७६७) होते. ते खंडेराव होळकर बहादूर आणि अहिल्याबाई होळकर यांचे एकुलते एक पुत्र होते. [१]

मालेराव होळकर
श्रीमंत सुभेदार मालेराव होळकर द्वितीय बहादूर
अधिकारकाळ १७६६ – १७६७
राजधानी इंदोर
पूर्ण नाव मालेराव खंडेराव होळकर
जन्म १७४५
मृत्यू ५ एप्रिल, १७६७ (वय २२)
इंदौर, सध्याचे मध्यप्रदेश
पूर्वाधिकारी मल्हारराव होळकर
उत्तराधिकारी अहिल्याबाई होळकर
वडील खंडेराव होळकर
आई अहिल्याबाई होळकर
पत्नी मैनाबाई
राजघराणे होळकर घराणे
धर्म हिंदू

इ.स. १७५४ मध्ये कुंभेरच्या लढाईत वडील खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाल्यापासून मालेराव होळकर हे त्यांचे आजोबा मल्हारराव होळकर यांचे वारस होते.

वयाच्या ८-९ वर्षापासून ते वडील खंडेराव होळकर आणि आजोबा मल्हारराव होळकर यांच्यासोबत विविध मोहिमांना जात असत.

मालेराव हे महान योद्धा होते. त्यांच्या तलवारबाजीच्या कौशल्याने चकित होऊन मल्हार रावांनी त्यांना १७६१-६२ मध्ये बक्षीस म्हणून सुलतानपूरची जहागीर भेट दिली.

एकदा पेशव्यांनी त्यांना जवाहरसिंग जाट यांच्याशी समझोता करण्याची जबाबदारी देऊ पाठवले होते आणि ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली देखील.

त्यांचा प्रथम विवाह मैनाबाई होळकर यांच्याशी १७५६ मध्ये वयाच्या ११ व्या वर्षी झाला. आणि नंतर त्यांचा दुसरा विवाह १७६५ मध्ये पिरताबाई होळकर यांच्याशी झाला. त्या मराठा सैन्यातील सेनापती सरदार संताजी वाघ यांच्या कन्या होत्या.

मृत्यू

संपादन

मालेराव मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले होते आणि त्यांच्या या आजारामुळे १७६७ मध्ये त्यांचे निधन झाले. [२] मालेरावांनी एका निरपराध व्यक्तीला दोषी समजून फाशीची शिक्षा दिली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. पीडितेच्या निर्दोषतेबद्दलचे सत्य समजल्यानंतर ते निराश होऊन आणि मानसिक आजारी पडले. आजारपणाच्या काळात, ते ४ महिने झोपू शकले नाहीत आणि शेवटी १७६७ मध्ये या आजारामुळे त्यांचे निधन झाले.

संदर्भ

संपादन
  1. ^ Jankiraman, M. (2020). Perspectives in Indian History: From the Origins to AD 1857. Notion Press. ISBN 9781649839954.
  2. ^ "Devi Ahilya Vishwavidyalaya, Indore". www.dauniv.ac.in. 2022-04-18 रोजी पाहिले.