मधुकर विश्वनाथ दिवेकर
प्रा.मधुकर विश्वनाथ दिवेकर(जन्म: ०८ जुलै १९५८ लोणी प्रवरानगर, राहाता तालुका, अहमदनगर - हयात) हे मराठीतील विज्ञानकथालेखक व सर्पकथालेखक आहेत. हे सर्पसंवर्धनाचे काम करीत असल्याने सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध आहेत. सर्पदंशावरील उपचारासाठी ते परिसरातील डॉक्टरांना मदत करतात. बालपणापासून सापांविषयी विशेष प्रेम असल्याने त्यांनी सर्पकथालेखन केले. साप माणसाच्या सान्निध्यात आल्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम, माणूस व साप यांचे नाते, त्या अनुषंगाने माणसांचे परस्पर संबंध अशा विषयांवर ते लेखन करतात. सापांविषयी माणसाला असलेली भीती घालविणे आणि वैज्ञानिक माहिती देणे हे त्यांच्या सर्पकथा लेखनामागील उद्दिष्ट आहे. परिसरातील डॉक्टर, निसर्गप्रेमी, विद्यार्थी यांच्यासाठी ते 'सर्पसंवर्धन व प्रशिक्षण' अशा कार्यशाळा आयोजित करतात. पुणे विद्यापीठ त्यासाठी त्यांना विशेष अनुदान देते. गेल्या दहा वर्षात त्यांनी या कार्यशाळेत ४०० जणांना प्रशिक्षित केले आहे. परिणामी परिसरात सर्पदंशाचे प्रमाण आणि सर्पदंश मृत्यूचे प्रमाण जवळपास शून्यावर आले आहे.
शिक्षण
संपादन- एस.एस.सी. १९७६ : प्रथम वर्ग, सह्याद्री विद्यालय, संगमनेर
- बी.एस्सी. १९८० : प्रथम वर्ग, विशेष श्रेणी, वनस्पतीशास्त्र, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर
- एम.एस्सी. १९८२ : प्रथम वर्ग, वनस्पतीशास्त्र,वनस्पतीशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे
- एम.फिल. १९९२ : 'अ' श्रेणी, वनस्पतीशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे
अध्यापन
संपादन१९८२ ऑगस्ट ते आजतागायत : प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर, अहमदनगर जिल्हा
लेखन कारकीर्द
संपादनप्रा.दिवेकर यांनी विज्ञान कथा या प्रकारात स्वतंत्र शैलीने 'सर्पकथा' हा कथाप्रकार रूढ केला. त्यांच्या एकूण कथा ३७ आहेत. त्यापैकी २२ विज्ञानकथा असून त्यात तीन दीर्घकथा, १९ लघुकथा १३ सर्पकथा आणि दोन इतर सामाजिक कथा आहेत. याशिवाय त्यांनी एक विज्ञान लघुकादंबरी आणि तीव वैज!ञानिक लेख लिहिले आहेत. विज्ञानयुग, धनंजय, कादंब, वसा, हेमांगी, पद्मगंधा, विवेक, यज्ञ इत्यादी दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. 'निवडक धनंजय': विज्ञानकथा - मे २०१५'[१] या ग्रंथसंग्रहात चार आणि 'मन्वंतर मे २०१५' या ग्रंथसंग्रहात[२] एक कथा समाविष्ट झाली आहे..
विज्ञान लघुकादंबरी
संपादन- स्पर्शवेल
विज्ञान लेख
संपादन- दशकातलं देवत्व
- वनस्पतींचं कामजीवन
- सर्पपुराण
विज्ञानकथा संग्रह
संपादन- तेथे जीवाणू जगती, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २००२
- विश्वामित्राची प्रतिसृष्टी, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती ०७ ऑगस्ट २०१३ ISBN 987-81-86177-35-8
- सर्पपुराण, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती १० मार्च २०१३ ISBN 978-93-82161-935-4
अभ्यासक्रमात समावेश
संपादन'पुनर्जन्म' ही विज्ञानकथा पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयांतर्गत २००८-२०१४ दरम्यानच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली.
कथांवरील संशोधन
संपादनप्रा. दिवेकर यांच्या कथांवर आणि त्यांच्या मराठी कथेतील योगदानासंबंधी Some Trends in Marathi Vidnyankatha By M. V. Divekar हा प्रा. रवींद्र ताशीलदार यांचा संशोधन निबंध आहे.[३]
पुरस्कार
संपादन- २०१५ :'मराठीतून विज्ञान प्रसारासाठी' - प्रा. मो. वा. चिपळोणकर पुरस्कार २०१५ - इंडियन फिजिक्स असोसिएशन (पुणे विभाग)
- २०१४ :'उत्कृष्ट शिक्षक' - संगमनेर महाविद्यालय, संगमनेर
- २०१३ :'आदर्श निसर्गप्रेमी' स्वामी विवेकानंद राष्ट्रगौरव पुरस्कार -२०१३, लोकमान्य मित्र मंडळ, पुणे
- २००६ :'Best Practices in Community Engagement': Wild Life Conservation and Protection - राष्ट्रीय मूल्यमापन आणि अधिमान्यता समिती (National Assessment and Accreditation Council)- देशातील १५ उत्तम सामाजिक कार्यांच्या यादीत समावेश.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ संपादक : नीलिमा राजेंद्र कुलकर्णी, धनंजय, राजेंद्र प्रकाशन, डोंबिवली, मुंबई ISBN -978-93-94631-01-7
- ^ संपादक - निरंजन घाटे प्रकाशक - डायमंड पब्लिकेशन्स,पुणे ISBN -978-81-8483-599-01
- ^ Dr. Ravindra Tashildar,Some Trends in Marathi Vidyankatha By M. V. Divekar, Some Trends in Indian Science Fiction and Fantasy Stories,Wizcraft Publications & Dixtributions Pvt. Ltd. Solapur 413 001, Feb.2015, ISBN 978-93-83183-70-8