प्रा. भा. ग. उर्फ भालचंद्र गजानन केतकर हे एक मराठी भाषांतरकार होते. ते धुळे येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या कला महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. भाषाकोविद म्हणून ते प्रसिद्ध होते. निवृत्तीनंतर ते पुण्यात राहिले. त्यांनी जुन्या काळातील लेखक, तत्त्ववेत्ते आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक एम. हिरियण्णा यांच्या The Outlines of Indian Philosophy या पुस्तकाचे मराठी भाषांतर केले आहे.

शिक्षण संपादन

कौटुंबिक माहिती संपादन

प्रा. भा.ग. केतकर हे लोकमान्य टिळकांचे पणतू होते. प्रा. केतकर यांचे वडील गजानन विश्वनाथ केतकर हे लो. टिळकांची थोरली मुलगी पार्वतीबाई यांचे ज्येष्ठ पुत्र असून दैनिक केसरीचे संपादक होते. [१][२]

तत्त्वज्ञानविषयक योगदान संपादन

केतकर यांनी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक एम. हिरियण्णा यांच्या Outlines of Indian Philosophy या ग्रंथाचे मराठी भाषांतर केले. पुणे विद्यापीठाने हा ग्रंथ जानेवारी १९७३मध्ये प्रसिद्ध केला. या भाषांतरामुळे भारतीय तत्त्वज्ञानाबद्दलचा एक वेगळा दृष्टिकोन मराठी वाचकांना माहीत झाला. या ग्रंथामुळे मराठी सारस्वतात एक नवी भर पडली. पहिल्या आवृत्तीनंतर या पुस्तकाचे मुद्रण न झाल्याने हे पुस्तक आता दुर्मिळ झाले आहे. पुणे विद्यापीठाचा प्रकाशन विभाग गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याने ग्रंथ निर्मिती थांबली आहे; त्यामुळे जुन्या ग्रंथांचे पुनर्मुद्रण होत नाही. या पुस्तकाच्या काही प्रती निवडक ग्रंथालयांत आणि खाजगी मालकीत आहेत.

ग्रंथाचा तपशील संपादन

  • मूळ नाव : Outlines of Indian Philosophy
  • मूळ प्रकाशक : जॉर्ज ॲलन ॲन्ड अनविन लंडन
  • नाव : भारतीय तत्त्वज्ञानाची रूपरेषा
  • लेखक: प्रोफेसर एम. हिरियण्णा
  • अनुवाद : प्रा. भा. ग. केतकर
  • प्रकाशक : पां. स. सावंत, कुलसचिव, पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे ४११००७
  • मुद्रक : ग. ज. अभ्यंकर, उपकुलसचिव, पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे ४११००७
  • मुद्रणस्थळ : पुणे विद्यापीठ मुद्रणालय, गणेशखिंड, पुणे ४११००७
  • प्रथमावृत्ती : जानेवारी १९७३
  • प्रती: अकराशे
  • मूल्यः बावीस रुपये.
  • सर्व हक्क : पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे ४११००७


हा ग्रंथ अनुवादकाने प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर यांना समर्पित केला आहे. दिनांक ०१ ऑगस्ट १९६९

प्रकाशकाचे निवेदन संपादन

१९८० च्या दशकात तत्कालीन महाराष्ट्र राज्य सरकारने प्रादेशिक भाषांतून पाठ्यपुस्तके आणि संदर्भ ग्रंथ तयार करण्यासाठी राज्यातील विद्यापीठांना राज्याच्या शिक्षण खात्याकडून बिनव्याजी कर्जाच्या रूपाने अनुदान दिले होते. या अनुदानाच्या विनियोगासाठी पुणे विद्यापीठाने एक प्रकाशन योजना आखली होती. या योजनेनुसार प्रोफेसर एम. हिरियण्णा यांच्या Outlines of Indian Philosophy या अनुवादाचे काम प्रा. भा. ग. केतकर यांचेकडे सोपविले होते. त्यानुसार प्रा. केतकरांनी “भारतीय तत्त्वज्ञानाची रूपरेषा” हा अनुवाद केला, असे प्रकाशकाने निवेदनात म्हटले आहे.हा अनुवाद प्रा. वि. म. बेडेकर यांनी तपासून दिला.[३]

अनुवादकाची प्रस्तावना संपादन

"अनुवाद शक्य तितक्या निर्दोषपणें करणें, हें अनुवादकाचें काम. तें केल्यानंतर वाचकाला सांगायचें खरोखर कांहीं उरत नाही. अमुक ग्रंथाचा अनुवाद कां केला, या अनुवादाला प्रेरणा कशी मिळाली इत्यादी प्रश्नांचा खुलासा अगदी अप्रस्तुत असतो. मूल्यमापनाचें काम वाचकांचें. अनुवादातील गुणदोष वाचकांच्या- विशेषतः तज्ज्ञांच्या-सहज लक्षात येतात. अनुवादकानें स्वतःच या गुणदोषांचें प्रत्यक्षपणे निर्देशन करणे, किंवा, अनुवाद करताना कोणत्या अडचणी आल्या, त्या अडचणींवर कशी मात केली इत्यादी सांगण्याच्या मिषानें त्या गुणदोषांचा अप्रत्यक्षपणें निर्देश करणें म्हणजे आत्मश्लाघा अथवा असमर्थतेचें समर्थन करणें. तेव्हां अनुवादकाच्या प्रस्तावनेचें कांहीं प्रयोजन नाहीं."[४]

ग्रंथाची रचना संपादन

अनुवादक प्रा. केतकर यांनी प्रस्तावनेतच ग्रंथात त्यांनी स्वतः समाविष्ट केलेल्या अनुषंगिक गोष्टी सांगितल्या आहेत. मूळ ग्रंथात नसलेल्या आणि अनुवादकाची भर यांनी मिळून ग्रंथाची रचना झाली आहे.

  1. (१) मूळ ग्रंथाची अनुक्रमणिका ही प्रकरणांच्या शीर्षकांची केवळ यादी आहे; अनुवादामध्ये सविस्तर अनुक्रमणिका असून तीत चर्चेसाठी घेतलेल्या विषयांची विभागशः नोंद आहे. शिवाय प्रत्येक प्रकारांच्या प्रत्येक विभागाच्या प्रारंभी, त्या त्या विभागांत चर्चेसाठी घेतलेल्या विषयांची नोंद शीर्षकांच्या रूपाने दिली आहे.
  2. (२) तत्त्वज्ञानाची मराठी परिभाषा अजून व्हावी तितकी सुनिश्चित आणि रूढ झालेली नाही. अनुवादात योजिलेल्या कांही पारिभाषिक संज्ञा वाचक-विद्यार्थ्यांना अपरिचित असतील, कांही संज्ञा तज्ज्ञांना सदोष म्हणून आक्षेपार्ह वाटतील. अपसमज टाळण्यासाठी, अनुवादाच्या अखेरी, एका परिशिष्टात महत्त्वाच्या प्रतिसंज्ञांची सूची दिली आहे आणि दुसऱ्या परिशिष्टात इंग्रजी संज्ञा, मराठी प्रतिसंज्ञा आणि त्यांचे अर्थ दिले आहेत.

अर्थसाह्य संपादन

मूळ इंग्लिश ग्रंथाच्या निर्मितीला तत्कालीन आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अर्थसाह्य केल्याचे मूळ लेखक प्रोफेसर एम. हिरियण्णा नमूद करतात.

संदर्भ संपादन

  1. ^ पहा: 'टिळक कुटुंबीय' हे छायाचित्र : दुसरी ओळ दुसरे छायाचित्र, फोटो गॅलरी http://www.lokmanyatilak.org/index.php/vadmay/lokmnaynvaril-sahitya/lokmanyanvaril/82-photo-gallery/83-event-photo-3, २० सप्टेंबर २०१५ रोजी पहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2015-12-01. 2015-09-20 रोजी पाहिले.
  3. ^ प्रकाशक : पां. स. सावंत, कुलसचिव, पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे ४११००७,१८ सप्टेंबर १९७२, “भारतीय तत्त्वज्ञानाची रूपरेषा” :अनुवाद – प्रा. भा. ग. केतकर
  4. ^ अनुवादकाची प्रस्तावना, प्रा. भा. ग. केतकर, “भारतीय तत्त्वज्ञानाची रूपरेषा” : अनुवाद – प्रा. भा. ग. केतकर, पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे ४११००७