भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर

(भांडारकर संशोधन संस्था या पानावरून पुनर्निर्देशित)

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही महाराष्ट्रामधील पुणे शहरातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे .पुण्यातील भांडारकर रस्ता किंवा विधी महाविद्यालय रस्त्यावर ६ जुलै १९१७ रोजी डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था असून आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची संशोधन संस्था आहे. ह्या संस्थेत अंदाजे १,२५,००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९,५१० हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची इमारत,पुणे.

प्राच्यविद्या संशोधक डॉ. रा.ना. दांडेकर यांनी ५४ वर्षे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या मानद सचिवपदाची धुरा सांभाळली होती. संस्थेच्या डॉ. रा.ना. दांडेकर ग्रंथालयामध्ये भारतीय आणि युरोपियन भाषेतील सव्वा लाख पुस्तकांचा समावेश असून त्यापैकी २० हजार पुस्तके दुर्मिळ आहेत. प्राकृत शब्दकोश हा महत्त्वपूर्ण प्रकल्प संस्थेने पूर्णत्वास नेण्याकडे वाटचाल केली आहे. केवळ अभ्यास आणि संशोधन या कार्यालाच वाहून घेतलेल्या अभ्यासकांची पिढी घडविण्याचे कार्य संस्थेने केले आहे.

इतिहास

संपादन

पहिल्या पिढीतील अभ्यासक आणि थोर समाजसेवक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि हितचिंतकांनी भांडारकर संस्थेची स्थापना केली. ६ जुलै १९१७ रोजी भांडारकर यांच्या सहस्रचंद्रदर्शनाचा योग साधून संस्था कार्यरत झाली. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या ताब्यात असलेला हस्तलिखितांचा ठेवा १९१८ मध्ये संस्थेकडे देणगी म्हणून सोपविण्यात आला.

प्राच्यविद्येच्या क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील संशोधकांच्या ज्ञानाची भूक भागविणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचा सुवर्णकाळ आता इतिहासबद्ध होत आहे. 'भांडारकर'मध्येच ग्रंथपाल म्हणून अर्धशतकाहून अधिक काळ काम पाहिलेले वा.ल. मंजुळ हा इतिहास लिहीत आहेत. २०१७ मध्ये संस्थेच्या शताब्दी महोत्सवापूर्वी हा इतिहास जगासमोर आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

'भांडारकर'मध्ये झालेले संशोधनाचे कार्य, त्यामध्ये आपापला वाटा सक्षमपणे उचललेल्या व्यक्तींचे योगदान नव्या पिढीसमोर यावे, यासाठी हा इतिहास लिहिला जात आहे.

संस्थेच्या स्थापनेसाठी 'आनंदाश्रमा'मध्ये झालेली बैठक, डॉ. रामकृष्ण भांडारकर, डॉ. नरहर सरदेसाई, डॉ. श्रीपाद बेलवलकर यांचे संस्थेच्या स्थापनेपासूनचे योगदान, संस्थेकडील हस्तलिखितांच्या संग्रहामध्ये होत असलेली प्रगती आणि त्याचे जतन करण्यासाठी होणारे प्रयत्न, संस्थेमध्ये कार्य करणाऱ्या सर्व ज्येष्ठ संशोधकांचे काम आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींचा या इतिहासामध्ये समावेश होणार आहे. संस्थेमध्ये झालेल्या महाभारताची चिकित्सक आवृत्ती, धर्मशास्त्राचा इतिहास, महाभारताची स्वीकृत संहिता, महाभारताची श्लोक सूची, प्राकृत शब्दकोश अशा विविध संशोधन प्रकल्पांच्या कामांची पार्श्वभूमीही या इतिहासामध्ये समाविष्ट केली जाणार असल्याचे समजते. हे पुस्तक सुमारे तीनशे पानांचे असेल.

काही महत्त्वाच्या नोंदी

१९१६ : 'आनंदाश्रमा'मध्ये झालेली पहिली बैठक.

१९१७ : डॉ. भांडारकरांकडील साडेतीन हजार हस्तलिखितांच्या संग्रहातून संस्थेची स्थापना

१९१९ : 'भांडारकर'चेच अपत्य असलेल्या 'ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स'ची स्थापना आणि पहिली द्वैवार्षिक परिषद.

१९२० : डेक्कन कॉलेजमधील १८ हजार हस्तलिखितांचा भांडारकरच्या हस्तलिखितांमध्ये झालेला समावेश.

१९६५ : महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे प्रकाशन

महाभारत प्रकाशन

संपादन

महाभारत प्रकाशन मध्ये निजामाची देणगी  

संपादन

अतिथिगृहाची इमारत बांधण्यासाठी व महाभारत हे हिंदू महाकाव्य प्रकाशित करण्यासाठी पैशाची गरज होती.तेव्हा संस्थेने हैद्राबादचा सातवा निजाम मीर उस्मान अली खान याला विनंती केली. तेव्हा त्याने कोणताही वेळ न दवडता लगेच प्रतिवर्षी रु.१०००ची मदत ११ वर्षासाठी मंजूर केली. त्याबरोबरच अतिथिगृहासाठी रु.५०,०००ची मदत जाहीर केली. [][]

महाभारताची चिकित्सक आवृत्ती

संपादन

संस्थेने १९१९ मध्ये महाभारताची चिकित्सक आवृत्ती प्रकाशित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. विष्णू सीताराम सुखठणकर यांची महाभारत प्रकल्पाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रकल्पाला ब्रिटिश अ‍ॅकॅडमीने अर्थसाह्य केले होते. सुखटणकर यांच्या निधनानंतर श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांच्याकडे संपादकपदाची धुरा सोपविण्यात आली. १९४३ मध्ये संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमास स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रपती झालेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन उपस्थित होते. तर, १९६८ मध्ये झालेल्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमास राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन उपस्थित होते.

प्राच्य विद्या परिषद

संपादन

अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद (ऑल इंडिया ओरिएन्टल कॉन्फरन्स) ही भांडारकर संस्थेने दिलेली देणगी आहे. संस्कृत आणि प्राच्यविद्या क्षेत्रातील अभ्यासक आणि संशोधकांचे संमेलन असे या परिषदेचे स्वरूप असून आतापर्यंत देशभरात विविध ठिकाणी ४७ परिषदा झाल्या आहेत.

ग्रंथभांडार

संपादन

भांडारकर संस्थेतील ग्रंथालयात(लायब्ररी)ग्रंथाचे प्रामुख्याने चार विभाग करण्यात आले आहेत.

  1. हस्तलिखित(Manuscripts)ग्रंथ विभाग.
  2. प्रकाशन विभाग.
  3. संशोधन विभाग.
  4. महाभारत विभाग.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Nizam's generous side and love for books". 16 सप्टेंबर 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Reminiscing the seventh Nizam's enormous contribution to education". 16 सप्टेंबर 2018 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन