बँग-बँग क्लब
"बॅंग-बॅंग क्लब" हे एका दक्षिण आफ्रिकेतील छायाचित्रकारांच्या गटाचे अनौपचारिक नाव होते. हा गट इ.स.१९९० ते १९९४ च्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेमध्ये कार्यरत होता. या कालखंडात दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेदी धोरणे संपुष्टात आणून कृष्णवर्णीयांना समान मताधिकार मिळवून देण्यासाठीच्या चर्चा सुरू होत्या, [१]. या चळवळीचे समर्थक असलेल्या इंकाथा मुक्ती दल (Inkatha Freedom Party) व आफ्रिकी राष्ट्रीय कॉग्रेस (African National Congress Archived 2015-08-14 at the Wayback Machine.) या दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आधीपासूनच सशस्त्र चकमकी घडायला सुरुवात झाली होती [२]. बॅंग-बॅंग क्लबच्या सदस्यांनी याच काळात (इ.स.१९९० ते १९९४) दक्षिण आफ्रिकेतील विविध उपनगरांमधून वृत्तांकणाची व छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडली.
या गटामध्ये मुख्यत: "केविन कार्टर", "ग्रेग मारिनोविच", "केन ऊस्टरब्रोएक" आणि "होआव सिल्वा" या चार छायाचित्रकार व पत्रकारांचा समवेश केला जातो, तथापि, आणखीही काही पत्रकारांनी तसेच छायाचित्रकारांनी बॅंग-बॅंग क्लब सोबत काम केलेले आहे (ऊदाहणार्थ: जेम्स नाख्टवे आणि गॅरी बर्नार्ड). [३]. बॅंग-बॅंग क्लबच्या कारकिर्दीवर आधारित असलेला याच नावाचा इंग्रजी चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता, स्टीव्हन सिल्व्हर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. [४].
इतिहास
संपादनबॅंग-बॅंग क्लब या नावाचा उगम दक्षिण आफ्रिकेतील "लिव्हिंग आफ्रिका" नावाच्या एका स्थानिक मासिकातील लेखामधून झाला. या लेखामध्ये बॅंग-बॅंग क्लब मधील छायाचित्रकारांचे वर्णन होते, आणि लेखाचे नाव "बॅंग-बॅंग पापारात्सी" असे होते. यातील "बॅंग-बॅंग" हा शब्द बंदूकीचा आवाज दर्शवतो, परंतु "पापारात्सी" (एकवचन: पापारात्सो) या इटालीयन शब्दाचा अर्थ "प्रसिद्ध व्यक्तींचा पाठलाग करून, त्यांची छायाचित्रे काढून विकणारे छायाचित्रकार" असा होतो [५]. या शब्दाला असलेल्या नकारात्मक अर्थामुळे, होआव सिल्वा आणि ग्रेग मारिनोविच यांनी, लिव्हिंग आफ्रिका मासिकाच्या संपादकाला (ख्रीस मॅरीस) विनंती करून तो शब्द बदलण्यास भाग पाडले. आणि शेवटी हा गट "बॅंग-बॅंग क्लब" या नावाने ओळखला जाऊ लागला. [६][३][७].
१८ एप्रिल १९९४ रोजी थोकोझा नावाच्या वस्तीमध्ये, राष्ट्रीय शांती सेना व आफ्रिकी राष्ट्रीय कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोळीबारात ३१ वर्षीय केन ऊस्टरब्रोएक मारले गेले आणि ग्रेग मारिनोविच गंभीर जखमी झाले. केन यांचा मृत्यू शांतीसेनेच्या गोळीमुळेच झाला आहे असे ग्रेग मारिनोविचचे मत होते. केन यांच्या मृत्यूला कोण कारणीभूत आहे हे शोधण्यासाठी दक्षिण आफ्रिकी सरकारने १९९५ मध्ये एक समिती बसवली, त्या समितीने पुढच्या १५ महिण्यांमध्ये केन यांच्या मृत्यूचा अहवाल न्यायालयासमोर मांडला. या अहवालामध्ये राष्ट्रीय शांती सेनेच्या विरुद्ध पुरावे असूनही न्यायाधिशांनी "कोणालाही दोष देता येणार नाही" असा निकाल दिला [८]. पुढे १९९९ मध्ये ग्रेग मारिनोविच आणि होआव सिल्वा यांची ब्रायन मखीजे नावाच्या राष्ट्रीय शांती सेनेच्या सैनिकाशी भेट झाली, ब्रायन यांच्या म्हणण्यानुसार केन यांचा मृत्यू राष्ट्रीय शांती सेनेच्या गोळीमुळेच झाला [३].
२७ जुलै १९९४ रोजी केविन कार्टन यांनी जोहान्सबर्ग शहराजवळ आत्महत्या केली.
२३ ऑक्टोबर २०१० रोजी अफगाणिस्तानमधल्या कंदहार शहरात झालेल्या भूसुरूंगाच्या स्फोटामध्ये सिल्वा यांनी आपले दोनही पाय गमावले. सिल्वा हे त्यावेळी अमेरिकेच्या सैन्य दलासोबत, अफगाणी युद्धाचे वार्तांकन करत होते. [९].
पुरस्कार
संपादनबॅंग-बॅंग क्लबच्या सदस्याना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. १९९० साली ग्रेग मारिनोविच यांनी लिंडसे त्शबालाला नावाच्या इंकाथा मुक्ती दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येचे छायाचित्र काढले [१०]. या छायाचित्रासाठी त्यांना १९९१ सालचा पुलित्झर पुरस्कार मिळाला [११]. त्याचप्रमाणे बॅंग-बॅंग क्लबचे आणखी एक सदस्य, केविन कार्टर यांनी, मार्च १९९३ मध्ये सुदानी दुष्काळाचे स्वरूप दाखवणारे एक छायाचित्र काढले, या छायाचित्रामध्ये "कुपोषणाने बाधीत झालेली एक सुदानी मुलगी व तीच्या मागावर असलेले एक गिधाड" असा प्रसंग छायांकित केला होता. या छायाचित्रासाठी केविन यांनाही १९९४ सालचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.
इतर सांस्कृतिक संदर्भ
संपादन- इ.स. २००० साली ग्रेग मारिनोविच आणि होआव सिल्वा यांनी बॅंग-बॅंग क्लबच्या अनुभवांवर आधारित "द बॅंग-बॅंग क्लब: स्नॅपशॉटस् फ्रॉम अ हिडन वॉर" नावाचे एक इंग्रजी पुस्तक लिहिले [३].
- स्टीव्हन सिल्व्हर या दिग्दर्शकाचा, २०१० साली प्रदर्शित झालेला द बॅंग-बॅंग क्लब (चित्रपट) हा इंग्रजी चित्रपट मारिनोविच आणि सिल्वा यांच्या पुस्तकावर आधारीत आहे [४].
- केविन कार्टर यांच्या आयुष्यावर आधारीत असलेला द लाईफ ऑफ केविन कार्टर: कॉजॅलिटी ऑफ द बॅंग-बॅंग क्लब या नावाचा माहितीपट २००४ साली प्रदर्शित झालेला आहे, ज्याला २००६ सालच्या ऑस्कर पुरस्कारांसाठीचे नामांकनही मिळाले होते [१२].
संदर्भ
संपादन- ^ दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान मताधिकाराच्या चळवळीचा कालक्रम, संदर्भ: बी.बी.सी. आफ्रिका: २०१० South Africa profile - Timeline
- ^ टाइम साप्ताहिक, दिनांक: २६ जानेवारी १९८७, खंड: १२९, अंक: ४, लेखक: जॉन ग्रीनवाल्ड South Africa The War of Blacks Against Blacks
- ^ a b c d द बॅंग-बॅंग क्लब (पुस्तक), लेखक: ग्रेग मारिनोविच आणि होआव सिल्वा, साल: २००० The Bang-Bang club
- ^ a b द बॅंग-बॅंग क्लब (चित्रपट), दिग्दर्शक:स्टीव्हन सिल्व्हर, साल: २०१० The Bang-Bang club
- ^ मॅरीयम-वेब्स्टर शब्दकोश, paparazzo
- ^ द न्यूयॉर्क टाईम्स, दिनांक: २० ऑगस्ट २००९, लेखिका: सॅंड्रा रोआ Showcase: The Bang Bang Club (Part 1 of 2)
- ^ अल-जझीरा, दिनांक: २४ जुलै २०१५, लेखक: ग्रेग मारिनोविच Magazine: Tales from The Bang Bang Club
- ^ जर्नल ऑफ मॉडर्न आफ्रिकन स्टडीज, दिनांक: मार्च १९९५, खंड: ३३, अंक: १, लेखक: डग्लस ॲंग्लीन, The Life and Death of South Africa's National Peacekeeping Force
- ^ संडे टाईम्स, लेखक: रोवान फिलिप, दिनांक: २४ ऑक्टोबर २०१० War photographer maimed in blast
- ^ सी.एन.एन. वृत्तसंस्था, लेखक: टॉम कोहेन, दिनांक: २१ एप्रिल २०११ Photographing the horrors of conflict Archived 2016-03-05 at the Wayback Machine.
- ^ पुलित्झर पुरस्कार, १९९१ सालच्या पुलित्झर पुरस्कार विजेत्यांची यादी 1991 Winners and Finalists
- ^ द लाईफ ऑफ केविन कार्टर: कॉजॅलिटी ऑफ द बॅंग-बॅंग क्लब (माहितीपट), दिग्दर्शक: डॅन क्राऊस [१]