बाळ कुडतरकर (जन्म : सोनाळे-सिंधुदुर्ग, २१ ऑगस्ट, १९२१ मृत्यू: मुंबई ४ फेब्रुवारी २०२०) हे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात नोकरी करत. ते आवाजाचे जादुगार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी हजारो जाहिराती व माहितीपटांना आवाज दिला. विविध उत्पादनांच्या जाहिराती, चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी दाखविले जाणारे माहितीपट, शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या जाहिराती, आकाशवाणीवरील कार्यक्रम किंवा चित्रपटाचे डबिंग अशा अनेक ठिकाणी कुडतरकरांनी त्यांच्या भारदस्त आणि दमदार आवाजाच्या जोरावर आपला स्वतंत्र ठसा उमटविला.

पार्श्वनाथ आळतेकर हे कुडतरकर यांचे आवाजाच्या क्षेत्रातील गुरू व मार्गदर्शक. शब्दोच्चार आणि शुद्ध व प्रमाणित भाषा कशी बोलायची याबाबतीत ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना गुरू मानत. आळतेकर तसेच नानासाहेब फाटक यांच्या नावाने अनेक वर्षे कुडतरकरांनी एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले होते. ‘अभिनय’ या नावाची नाट्यसंस्थाही त्यांनी काही काळ चालविली. ‘संगीत अमृतमोहिनी’ हे त्या नाट्यसंस्थेतर्फे सादर झालेले शेवटचे नाटक होय.

बाळ कुडतरकर जेव्हा मुंबईत गिरगावातील ‘राममोहन इंग्लिश स्‍कूल’मध्‍ये शिकत होते, त्‍यावेळच्‍या एका प्रदशर्नात त्यांनी काढलेल्‍या चित्रास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्‍यामुळे त्यांच्या चित्रकलेच्‍या शिक्षकांनी त्यांना जे.जे. स्‍कूल ऑफ आर्टमध्‍ये जाण्‍याचा सल्‍ला दिला. मॅट्रिक पास झाल्‍यानंतर बाळ कुडतरकरांनी जे.जे.त प्रवेश घेतला. त्यांच्या शाळेतील शिक्षक मोहन नगरकर, यांना कुडतरकर हे शाळेत असताना नाटके-एकांकिका करत असत हे माहिती होते. त्यांच्या शिफारसीमुळे बाळ कुडतरकर यांना रेडिओवरील ‘सभापती’ नावाच्‍या श्रुतिकेत काम करण्‍याची संधी मिळाली.

पुढे मराठी अभिनेते झालेले विवेक हे कुडतरकरांचे जेजेमधील सहाध्यायी होते.

बाळ कुडतरकर हे आकाशवाणीवर ७ जून १९३९ रोजी नोकरीला लागले. ‘आर्टिस्ट’ म्हणून लागलेले कुडतरकर नोकरीच्या अंती ‘कार्यक्रम निर्माता’ म्हणून निवृत्त झाले.

‘प्रपंच’, ‘पुन्हा प्रपंच’, ‘वनिता मंडळ’, ‘कामगार सभा’, ‘गंमत जंमत’ हे बाळ कुडतरकरांची निर्मिती असलेले आणि रेडियोवरील गाजलेले कार्यक्रम होत. ‘कामगार सभा’ या कार्यक्रमासाठी मुंबईतील २८ कामगार कल्याण केंद्रांत ते स्वतः गेले. कामगार आणि संबंधितांशी बोलून कामगारांशी निगडित असे अनेक विषय त्यांनी या कार्यक्रमात हाताळले. प्रत्यक्ष कामगारांनाही कार्यक्रमात सहभागी करून घेतले. तेव्हा मुंबईत गिरणी कामगारांची संख्या खूप मोठी होती. कामगारांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न यात मांडले गेल्याने कामगारांमध्ये हा कार्यक्रम लोकप्रिय झाला.

दुसरे महायुद्ध सुरू झाले त्या काळात ‘युद्धवार्ता’ कार्यक्रम करायची कल्पना ब्रिटिश सरकारने मांडली. मुंबईतील माहिती केंद्राचे संचालक म्हणून क्लॉड स्कॉट्स हे तेव्हा काम पाहात होते. क्लॉड यांनी त्यांना इंग्रजी संहिता दिली आणि कुडतरकरांनी दहा मिनिटांच्या या माहितीपटाचे भाषांतर आणि निवेदन केले. आवाज देण्याचे मानधन म्हणून कुडतरकर यांना त्या काळात ३०० रुपये मिळाले होते. पुढे अनेक ‘युद्धवार्तां’सह फिल्म्स डिव्हिजनच्या अनेक माहितीपटांना बाळ कुडतरकर यांचाच ‘आवाज’ मिळाला.