बाभूळ

(बाभळी या पानावरून पुनर्निर्देशित)


बाभूळ (Acacia) हा उष्ण कटिबंधीय प्रदेशातला एक विशाल वाढणारा वृक्ष आहे. बाभळीचे लाकूड कठीण असते. बाभळीच्या खोडाला छेद केल्यास त्यातून डिंक स्रवतो. हा उत्तम प्रकारचा डिंक पाैष्टिक असल्याने त्याचा कूट करून त्यापासून बनवलेले लाडू बाळंतिणीला खायला घालतात. घरांना-शेतांना वेड्या बाभळीच्या काटेरी झुडपांचे कुंपण घालतात.

बाभूळ
बाभळीची पिवळी फुले

वेडी बाभळ हा बाभळीचा एक प्रकार आहे.या वनस्पतीची पाने शमीसारखे दिसतात. अमेरिकेतील काही उष्ण कटिबंधातील भागातून खूप वर्षांपूर्वी भारतात आली अन्‌ येथील मातीत रुजली. साध्या बाभळीपेक्षा ही अधिक गतीने वाढते.

बाभळीवी अन्य नावे : बब्बूळ, बब्बूल, बर्बुर (संस्कृत), कीकर, बाबुल (हिंदी), बावळ (गुजराती), शमीरूकु (कोंकणी), कुरूवेलम (मल्याळम), करूवेल (तेलुगू) वगैरे

बाभळीच्या जाती

संपादन

उपयोग

संपादन

बाभळीच्या कोवळ्या फांद्यांचा (काड्यांचा) उपयोग दात घासण्यासाठी करतात. या वृक्षास श्रावण महिन्यात सुंदर पिवळी फुले येतात. याचा पाला बकऱ्यांचे व मेंढ्यांचे एक आवडते खाद्य आहे. बाभळीच्या काही उपजातींचा लाकडी सामान बनवण्यासही उपयोग होतो.

बाभूळ हे झाड शेतकरी व शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे.

मराठी साहित्यात बाभूळ

संपादन

अनेक मराठी लेखक-कवींच्या साहित्यात बाभूळ येते. उदा०

लवलव हिरवीगार पालवी - काटयांची वर मोहक जाळी
घमघम करती लोलक पिवळे - फांदी तर काळोखी काळी
झिरमिळ करती शेंगा नाजूक - वेलांटीची वळणे वळणे,
या साऱ्यातुनि झिरमिर झरती - रंग नभाचे लोभसवाणे
कुसर कलाकृति अशी बाभळी - तिला न ठावी नागर रीती
दूर कुठेतरी बांधावरती - झुकून जराशी उभी एकटी (अपूर्ण)

- इंदिरा संत

अस्सल लाकूड भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभूळझाड उभेच आहे -
देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसुन बोटे
बाभूळझाड उभेच आहे
अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली
बाभूळझाड उभेच आहे (अपूर्ण)

--वसंत बापट

कांट्यांनी भरलें शरीर अवघें, छाया नसे दाटही
नाहीं वास फुलांस, भूक न निवे ज्याच्या फळें अल्पही
नाहीं एकही पांथ येत जवळीं, तूझ्या असो गोष्ट ही
अन्याचीं न फळेंं मिळोत म्हणुनी होशी तयांतें वही

--कृष्णशास्त्री चिपळूणकर



पर्यावरणीय उपयोग: बाभळाचे झाड अनेक पक्षी आणि प्राण्यांसाठी एका वसाहतीची भूमिका निभावते. या झाडावर,विविध प्रकारच्या मुंग्या, मुंगळे, पाच ते सहा प्रकारचे कीटक, रातकिडे, सरडे, खारी अशा प्राण्यांचे ते महत्वाचे वसाहतीचे ठिकाण असते. या झाडाची साल खवल्यांची बनलेली असल्याने अनेक किड्यांचे ज्यांचे पर्यावरणात अनन्यसाधारण महत्व आहे अशा कीटकांचे ते आश्रयस्थान असते. या झाडांच्या सालीच्या खवल्यात ते निर्भयपणे वास्तव्य करतात कारण त्यात त्यांना वारा, ऊन, पाऊस आणि थंडीपासून संरक्षण प्राप्त होते. या झाडाची मुळे खोलवर जात असल्याने त्या मुळांच्या आधाराने अनेक मुंग्यांची बिळे त्यांच्या आश्रयात निर्माण होतात आणि त्यामुळे जमिनीतील खोल भागात हवा खेळती राहण्यास मदत होते. या मुंग्यांना या झाडांचा डिंक खाद्य म्हणून उपयुक्त ठरतो. त्याचबरोबर त्यांना अभेद्य असे आश्रयस्थान प्राप्त होते. या झाडावर साधारणपणे चार ते पाच प्रकारच्या मुंग्या आणि मुंगळे यांचे वास्तव्य असते.