प्लेक बिपुलसोंग्राम

फील्डमार्शल प्लेक बिपुलसोंग्राम (देवनागरी लेखनभेद: प्लेक भिपुलसोंग्राम ; थाई: แปลก พิบูลสงคราม ; थाई रोमनीकरण: Plaek Phibunsongkhram ; रोमन लिपी: Plaek Pibulsonggram ) (जुलै १४, इ.स. १८९७ - जून ११, इ.स. १९६४) हा थायलंडाच्या पंतप्रधानपदी दोनदा अधिकारारूढ झालेला लष्करशहा होता. भिपुलसोंग्राम १६ डिसेंबर, इ.स. १९३८ ते १ ऑगस्ट, इ.स. १९४४ आणि ८ एप्रिल, इ.स. १९४८ ते १६ सप्टेंबर, इ.स. १९५७ या कालखंडांदरम्यान दोनदा पंतप्रधानपदावर आरूढ होता.

प्लेक बिपुलसोंग्राम (इ.स. १९५५)

कारकीर्द संपादन

इ.स. १९३२ साली अनियंत्रित राजसत्ताक पद्धतीविरुद्ध बंड पुकारणाऱ्या गनराच्चातोन या बंडखोर संघटनेच्या सैनिकी शाखेच्या म्होरक्यांमध्ये बिपुलसोंग्रामाचा समावेश होता. पुढच्याच वर्षी, म्हणजे इ.स. १९३३ साली, राजनिष्ठ मंडळींनी उभारलेल्या भूदेवरात उठावास शमवण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. फ्रया बाहोल याच्या पंतप्रधान काळानंतर इ.स. १९३८साली बिपुलसोंग्राम पंतप्रधानपदी आला. पंतप्रधानपदी बसल्यावर त्याने आपल्या मर्जीतल्या सेनाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या शासकीय पदांवर नेमत शासनयंत्रणेवर घट्ट पकड मिळवली.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान विस्तारवादी जपानाच्या वाढत्या दबावामुळे डिसेंबर, इ.स. १९४१मध्ये बिपुलसोंग्राम राजवटीने जपानाशी अनाक्रमण करार केला आणि बर्मा, तसेच मलायातील मोहिमांसाठी जपानी सैन्याला थाई भूमीवरून कूच करण्याची परवानगी दिली. थायलंडाच्या या निर्णयामागे बर्म्यात व मलायात ब्रिटिशांविरुद्ध गमावलेल्या आणि फ्रेंच इंडोचायन्यात फ्रेंचांविरुद्ध गमावलेल्या थाई प्रदेशांस पुन्हा हस्तगत करण्याचाही मनसुबा होता. काही आठवड्यांतच बिपुलसोंग्राम शासनाने जपानाच्या युद्धमोहिमेत सहभागी होण्याचे ठरवले आणि २५ जानेवारी, इ.स. १९४२ रोजी ब्रिटन व अमेरिका यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले.

महायुद्धाच्या नंतरच्या टप्प्यात मात्र जपानाची पिछेहाट होऊ लागली. तसेच खुद्ध थायलंडात जपानविरोधी "स्री थाय" या चळवळीचा जोर वाढू लागला होता. स्री थाय चळवळीच्या समर्थकांचे प्राबल्य असलेल्या संसदेने बिपुलसोंग्रामास पद सोडण्यास भाग पाडले. त्याच्या जागी खुआंग अभयवोंग्शे नवा पंतप्रधान झाला.