प्राचीन तेलुगू महाकवी. अल्लसानी पेद्दना हा कडप्पा जिल्ह्यातील पेद्दनापाडूचा राहणारा. चोक्कनामात्य हे त्याच्या पित्याचे आणि शठकोपस्वामी हे त्याच्या गुरूचे नाव. शठकोपस्वामीच्या हाताखाली संस्कृत आणि तेलुगूचा अभ्यास केल्यावर पेद्दनाला उदरनिर्वाहासाठी राजाश्रय शोधावा लागला.⇨कृष्णदेवराय (सु. १४८९-१५२९) याचे औदार्य आणि कलाप्रेम त्याला ऐकून ठाऊक होते. त्याने कृष्णदेवरायाचा महामंत्री तिम याची भेट घेतली आणि त्याच्या साहाय्याने कृष्णदेवरायाच्या विद्वत्‌सभेत स्थान मिळविले. पेद्दनाचे शीघ्रकवित्व आणि युद्धकौशल्य यांमुळे त्याच्यावर कृष्णदेवरायाची विशेष मर्जी होती. राजसभेत येणाऱ्या नवनव्या पंडितांची परीक्षा घेण्याचे कामही पेद्दनाकडे असे. कृष्णदेवरायाच्या मृत्यूनंतर पेद्दनाला गुणग्राहक आश्रयदात्याची उणीव प्रकर्षाने जाणवत होती, असे त्याच्या काही काव्योद्‍गारांवरून दिसून येते.


स्वारोचिष मनुसंमवमु (मनुचरित्रमु), हरिकथासारमु आणि गुरूस्तुति या पेद्दनाच्या काव्यरचना होत. यांपैकी दुसरे काव्य अद्यापि अप्रकाशित आणि तिसरे अनुपलब्ध आहे.⇨मनुचरित्र वा मनुचरित्रमु हे त्यांचे प्रबंधकाव्य तेलुगू पंचमहाकाव्यांत गणले जाते.

मनुचरित्रची कथा पेद्दनाने मार्कंडेयपुराणातून घेतली असून चौदा मनूंतील दुसरा जो स्वारोचिष मनू त्याच्या जन्माशी ती निगडित आहे. मनुचरित्रचे कथानकही मानवसृष्टीच्या प्रारंभकाळाशी संबंधित आहे. पेद्दनाने मूळ कथेचा विस्तार सहा आश्वासांत (सर्गांत) विभागलेल्या सहाशे पद्यांतून केलेला आहे. प्रबंधकाव्याची सर्व वैशिष्ट्ये त्यात प्रकट झाली आहेत. शृंगार व शांत रसांचा त्यात मनोज्ञ संगम आढळतो. संस्कृत साहित्यात शुक-रंभा यांना जे स्थान आहे, तेच तेलुगु साहित्यात मनुचरित्रमधील प्रवर आणि वरूथिनी यांना कवीने प्राप्त करून दिले आहे. रम्य कल्पना, रचनाकौशल्य, जिवंत व्यक्तिरेखा व नाट्यपूर्ण संवाद यांमुळे या काव्याला महाकाव्याची भव्यता प्राप्त झाली आहे. यातील वरूथिनीचे वासनामय प्रेम आणि प्रवराचे विरक्त पावित्र्य यांच्यामधील सूक्ष्म संघर्षाचे चित्रण प्रभावी असून ते विदग्ध शैलीत आहे. त्याच्या काव्यरचनेवर प्रसन्न होऊन कृष्णदेवरायाने त्याला ‘आंध्रकविता-पितामह’ ही पदवी आणि ‘गंगेपंडेरम’ म्हणजे सोन्याचे पादभूषण देऊन गौरविले.

पेद्दनाचे अनुकरण अनेकांनी केले, पण त्याची मौलिकता आणि सुश्लिष्ट काव्यशैली कोणालाच साधली नाही. तेलुगू महाभारत व भागवताच्या खालोखाल आंध्र प्रदेशात मनुचरित्रला लोकप्रियता लाभली.