'पूर्णगंगा' ही निरानदीची एक उपनदी आहे. ती पुणे जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध अशा पुरंदर तालुक्यातील किल्ले पुरंदर वर उगम पावते. पुरंदर किल्ल्याच्या दक्षिण बाजूने बांदलवाडी, बहिरवाडी, शेलारवाडी, निकमवाडी भागातील अनेक ओढे-नाले काळदरी या गावात एकत्रित येतात.

काळदरीपासुन धनकवडी, मांढर, गावातून वाहते. याच नदीवर मांढर गावाच्या पूर्वेकडे व माहूर गावाच्या जवळ एक छोटेसे धरण आहे. माहूर मधून पुढे आल्यावर या नदीची पांगारखिंड-शिवरखिंड भागात उगम पावणारी रूद्रगंगा नावाची एक उपनदी पांगारे, पिलाणवाडी, हरगुडे, यादववाडी, परिंचे, नवलेवाडी, राऊतवाडी अशी वाहत पूर्वेकडुन येऊन मिळते.

पूर्णगंगा व रूद्रगंगा या दोन नद्यांचा संगम वीर या प्रसिद्ध गावच्या वायव्य सीमेवर होतो. याच ठिकाणी लघुपाटबंधारे विभागाचे एक नाला धरण बांधण्यात आले आहे. या धरणाला संगम धरण अथवा वीर नाला धरण असे म्हणतात. येथून पूर्णगंगेचे पात्र बरेचसे मोठे होत जाते. नंतर पूर्णगंगा आधी पश्चिमाभिमुखी, दक्षिणामुखी, पूर्वामुखी वाहते वीर गावाच्या मध्यवर्ती भागात नदीच्या उत्तरघाटावर काशीखंड काळभैरवनाथ व श्री जोगेश्वरी माता यांचे 'श्रीनाथ म्हस्कोबा' या नावाने प्रसिद्ध असे देवस्थान आहे. नंतर येथून पुढे पूर्णगंगा पुन्हा दक्षिणाभिमुखी वाहते. जवळच असणाऱ्या 'श्री विरेश्वर' या पांडवकालीन पुरातन शिवमंदिराच्या मागे निरानदी वरील प्रसिद्ध अशा वीर धरणात मिळून जाते.