पिझ्झा

(पिझा या पानावरून पुनर्निर्देशित)

पिझ्झा हा एक इटालियन पदार्थ आहे. यात मैद्याच्या गोल पोळी/चपातीवर चीज आणि अनेक प्रकारच्या भाज्यांचे/मांसाचे तुकडे घालून तो ओव्हन मध्ये बेक केला जातो अर्थात भाजला जातो आणि त्यानंतर खाल्ला जातो. पिझ्झा हा इटालियन शब्द असून इटालियन भाषेत 'झ' चा उच्चार 'त्झ' किंवा 'ट्झ' असा होत असल्याने पिझ्झा या शब्दाचा अचूक उच्चार 'पित्झा' किंवा 'पिट्झा' असा आहे.


इतिहास :

पिझ्झाचा पहिला उल्लेख दक्षिण इटलीच्या गाएता शहरात दहाव्या शतकात सुमारे ९९७ सालच्या आसपास आढळतो. तर आधुनिक पिझ्झाचा वापर सर्वप्रथम इटलीच्या नेपल्स शहरात केला गेला. या मूळच्या पिझ्झात कालांतराने अनेक बदल होत गेले. मैद्याची पोळीच्या जाडी नुसार ठरलेले प्रकार, वर घातल्या जाणाऱ्या भाज्या/चीज/मांसाहारी पदार्थांचे प्रकार यावरून पिझ्झा या पदार्थाची विविध स्वरूपात विभागणी केली जाते. पिझ्झात वापरल्या जाणाऱ्या मैद्याच्या पोळी/चपातीला पिझ्झा बेस असे म्हणतात आणि त्यावर घातल्या जाणाऱ्या भाज्या/मांसाचे तुकडे यांना टॉपिंग्ज असे म्हटले जाते.


प्रकार :

पिझ्झा हा इटालियन पदार्थ असला तरी कालांतराने जगभर आणि विशेषतः अमेरिकेत तो उत्तरोत्तर अधिकाधिक लोकप्रिय होत गेला. पिझ्झाचा बेस, त्यावर वापरण्यात येणारी टॉपिंग्ज आणि पिझ्झा बनवण्याच्या पद्धती यामध्ये जगभरातल्या अनेक देश आणि शहरांमध्ये विविधता आढळून येते आणि या विविधतेवर आधारित असणारे पिझ्झाचे वेगवेगळे प्रकार आढळतात. हे प्रकार अर्थात त्या त्या शहरातल्या लोकांच्या पिझ्झाच्या आवडीनिवडींवरून  आणि खाण्याच्या पद्धतीवरून पडलेले आहेत.


शिकागो पद्धतीचा पिझ्झा : मैद्याची पोळी अर्थात पिझ्झा बेस खूप जाड असून त्यावर अगदी थोड्या भाज्या/चिकन/पोर्कचे टॉपिंग्ज असल्यास तो 'शिकागो पद्धतीचा पिझ्झा' म्हणून ओळखला जातो.

न्यूयॉर्क पद्धतीचा पिझ्झा : याउलट पिझ्झा बेस पातळ असून त्यावर खूप भाज्या/चिकन/पोर्कचे टॉपिंग्ज असल्यास तो न्यूयॉर्क पद्धतीचा पिझ्झा म्हणून ओळखला जातो.

सिसिलियन पद्धतीचा पिझ्झा : सहसा गोलाकारात असणारा पिझ्झा काही वेळा चौकोनी आकारातही बनवला जातो. त्याला सिसिलियन पद्धतीचा पिझ्झा असे म्हणतात कारण इटलीच्या सिसिली विभागात असा चौकोनी पिझ्झा आवडीने खाल्ला जातो. सिसिलियन पिझ्झाचा बेस हा सामान्य पिझ्झापेक्षा खूप जाड असतो.

कॅलिफोर्निया पिझ्झा : हा प्रचलित टॉपिंग्ज पेक्षा वेगळ्या प्रकारच्या टॉपिंग्जसाठी प्रसिद्ध आहे.

डेट्रॉईट पिझ्झा : डेट्रॉईट पिझ्झा हा देखील सिसिलियन पिझ्झाप्रमाणे चौकोनीच असतो परंतु यात प्रामुख्याने पेपरोनीचा वापर केला जातो.

सेंट लुईस पिझ्झा : सेंट लुईस पिझ्झा हा देखील चौकोनीच असतो परंतु सिसिलियन पद्धतीच्या जाड पिझ्झाबेस ऐवजी यात पिझ्झा बेस पातळ असतो.


टॉपिंग्ज :

पिझ्झावर घातल्या जाणाऱ्या जाणारे शाकाहारी टॉपिंग्जमध्ये प्रामुख्याने कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, मका, बेबी कॉर्न, मशरूम (अळंबी), अननस, काळे ऑलिव्ह, पालक, बेझिल (तुळशीच्या गुणधर्मांचा एक पदार्थ) यांचा समावेश होतो तर मांसाहारी टॉपिंग्जमध्ये कोंबडी, डुक्कर, पेपरॉनी, सलामी अशा विविध प्रकारांचा समावेश होतो.


चीज :

पिझ्झात प्रामुख्याने मोझरेला, चेद्दार (केशरी रंगाचे) चीज, पार्मेशन चीज हे चीजचे प्रकार वापरले जातात.


टीप : ही माहिती ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी, डोंबिवली या संस्थेच्या ज्ञानबोली प्रकल्पांतर्गत हेरंब ओक यांनी प्रकाशित केली आहे.


संदर्भ :[१][२]

  1. ^ "Pizza". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-05-27.
  2. ^ "Types of Pizza". WebstaurantStore (इंग्रजी भाषेत). 2020-05-30 रोजी पाहिले.