पार्वती बाऊल

भारतीय गायिका

पार्वती बाऊल (जन्म: २५ ऑक्टोबर १९७६) या बाऊल लोकसंगीत गाणाऱ्या गायिका, संगीतकार आणि पश्चिम बंगालमधील कथाकथनकार आणि भारतातील प्रमुख बाऊल संगीतकारांपैकी एक आहेत. बंगालमधील सनातनदास बाऊल, शशांक गोशाई बाऊल यांच्या मार्गदर्शनात १९९५ पासून त्या भारत आणि इतर देशांमध्ये आपली कला सादर करत आहेत. त्यांचे पावा कथकलीतील प्रख्यात कलावंत रवी गोपालन नायर यांच्याशी लग्न झाले आहे. त्या १९९७ पासून केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये राहतात. तेथे त्या "एकतारा बाऊल संगीत कलरी" हे बाऊल संगीताचे एक विद्यालय चालवतात.

पार्वती बाऊल

पार्वती बाऊल
आयुष्य
जन्म २५ ऑक्टोबर १९७६
संगीत कारकीर्द
कार्य बाऊल गायन
पेशा बाऊल गायक
कार्य संस्था एकतारा बाऊल संगीत कलरी, तिरुअनंतपुरम
गौरव
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार – २०१७

पूर्वायुष्य

संपादन

पार्वती बाऊल यांचा जन्म पश्चिम बंगालमधील पारंपारिक बंगाली ब्राह्मण कुटुंबात मौसुमी पॅरीयल या नावाने झाला.[] त्यांचे कुटुंबीय मूळचे पूर्व बंगालचे होते आणि भारताच्या फाळणीनंतर ते पश्चिम बंगालमध्ये आले. त्यांचे वडील, भारतीय रेल्वेमध्ये अभियंता होते. ते भारतीय शास्त्रीय संगीताचे चहाते होते. ते बहुतेक वेळा मुलीला मैफिलीत घेऊन जात असत. त्यांची आई, गृहिणी होती आणि रामकृष्ण परमहंसांची भक्त होती. या भागात वडिलांची अनेक ठिकाणी बदली होत असल्यामुळे त्यांचे आसाम, कूचबिहार आणि पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात वास्तव्य झाले. त्या सुनील ॲ,कॅडमी, कूचबिहार येथून उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

बाऊल संगीताचे शिक्षण

संपादन

त्यांच्या लहानपणी त्या श्रीलेखा मुखर्जींकडून कथक हे शास्त्रीय नृत्य शिकल्या. तसेच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षणही घेतले. []त्यांनी ‘कलाभवन’ या शांतीनिकेतन येथील विश्वभारती विद्यापीठामधील कलाविद्यालयात ‘दृश्य कलाकार’ म्हणून प्रशिक्षण घेतले. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे प्रारंभिक संगीताचे प्रशिक्षण घेतले असले तरी शांतिनिकेतन कॅम्पसकडे जाणाऱ्या आगगाडीत त्यांनी पहिल्यांदाच एका अंध बाऊल गायकाकडून बंगालमधील गूढ पारंपारिक संगीत ऐकले. []यानंतर कॅम्पसमध्ये वारंवार येत असलेल्या बाऊल गायक फूलमाला दशीला त्या भेटल्या. लवकरच, त्यांनी फूलमाला यांच्याकडे तसेच भिपद तरण दास बाऊल यांच्याकडे संगीत शिकणे सुरू केले[] आणि अनेक बाऊल आश्रमांनादेखील भेट दिली. काही काळानंतर फूलमाला यांनी त्यांना दुसरा शिक्षक शोधण्याचा सल्ला दिला.

या काळात पार्वती यांनी पश्चिम बंगालमधील बांकुरा येथील ८० वर्षीय बाऊल गायक सनातनदास बाऊल यांचे सादरीकरण पाहिले. त्यांच्याकडून शिकण्याचा निर्णय घेत, पार्वती यांनी बांकुरा जिल्ह्यातील सोनमुखी येथील त्यांच्या आश्रमाला भेट दिली.[] १५ दिवसानंतर त्यांच्याकडून दीक्षा घेतली आणि ते त्यांचे पहिले गुरू झाले. पुढील सात वर्षे, त्यांनी आपल्या गुरूबरोबर प्रवास केला, गुरूंना सादरीकरणाच्या वेळी स्वरसाथ केली, त्यांच्याकडून बाऊल गाणी, बाऊल नृत्य शिकल्या. एकतारा आणि डुग्गी वाजवली. शेवटी, गुरूंनी त्यांना स्वतः गाण्याची परवानगी दिली आणि लवकरच त्यांना त्यांचे पुढचे गुरू शशांक गोशाई बाऊल यांच्याकडे नेण्यात आले. []गोशाई, त्यावेळी ९७ वर्षांचे होते आणि  ते बांकुरा जिल्ह्यातील खोईरबोनी या छोट्या गावात राहत होते. सुरुवातीला एका स्त्री शिष्याला शिकवण्यास त्यांना संकोच वाटत होता. त्यामुळे त्यांनी काही दिवस पार्वतींच्या  समर्पणाची परीक्षा घेतली. आयुष्याच्या उर्वरित तीन वर्षांत, त्यांनी पार्वती यांना बाऊल परंपरेची असंख्य गाणी आणि त्यातील बारकावे शिकवले.[]

कारकीर्द

संपादन

पार्वती बाऊल यांनी १९९५ मध्ये सादरीकरणाला सुरुवात केली. १९९७ मध्ये त्या केरळमधील तिरुवनंतपुरम येथे स्थानिक आध्यात्मिक आणि नाट्य परंपरा जाणून घेण्यासाठी आल्या. येथे त्यांची भेट रवी गोपालन नायर या केरळमधील पारंपरिक कठपुतळी कलाकाराशी झाली. []त्यांच्यासाठी पार्वती नाटकामध्ये वापरलेले जाणारे ग्रोटोव्हस्की तंत्र शिकल्या  आणि २००० मध्ये त्यांच्याबरोबर अमेरिकेच्या व्हर्मॉंटमधील ब्रेड आणि पपेट थिएटरमध्ये निर्माते पीटर शुमॅन यांच्याकडे अभ्यास करण्यासाठी गेल्या. पीटर शुमॅन नाटकांच्या सादरीकरणामध्ये कठपुतळया, प्रत्याक्ष-कला यांचा समावेश करत.

त्यानंतर, २००१ मध्ये, त्यांनी बाऊल परंपरेसाठी पूर्णवेळ समर्पितपणे काम करण्याचा निर्णय घेतला आणि बाऊल संगीत सादर करण्यास सुरुवात केली, तसेच संगीत वाद्ये म्हणून एकतारा आणि डुग्गी वाजवणे सुरू केले. त्या  पारंपरिक बाऊल काव्ये आणि स्वतःचे दोहे याद्वारे गाणी सादर करतात.

१९९० च्या उत्तरार्धात, त्यांनी त्यांचे शिक्षक रवी गोपालन नायर यांच्याशी लग्न केले आणि त्या गेल्या १५  वर्षांपासून तिरुअनंतपुरममध्ये राहत आहेत. तिरुअनंतपुरमजवळील नेडूमानगड येथे त्या एक एकल बाऊल संगीत कलरी नावाची बाऊल संगीत गुरुकुल (शाळा) चालवतात. तरीही, बंगालच्या पारंपारिक बाऊल गायकांप्रमाणेच, त्या  केरळच्या दुर्गम खेड्यात, स्थानिक ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आणि बंगालमध्ये जाऊन कार्यक्रम सादर करतात. वर्षातून एकदा, त्या इंटरनॅशनल स्कूल ऑफ थिएटर ॲंथ्रोपोलॉजी (आयएसटीए) येथे बाऊल संगीत शिकविण्यासाठी जातात. २००५ मध्ये, त्यांनी बाऊल परंपरेतील आपल्या प्रवासाविषयीचे पुस्तक, सॉन्ग्ज ऑफ द ग्रेट सोल प्रकाशित केले, यामध्ये केवळ पुरुष गायकांची परंपरा असलेल्या आणि बहुतेक ग्रामीण भागातच भरभराट झालेल्या बाऊल परंपरेतील एका शिक्षित महिलेचा प्रवास शब्दबद्ध केला आहे.[]

पुरस्कार

संपादन

पार्वती बाऊल यांना २०१७ मध्ये भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांनी लोकसंगीतामध्ये केलेल्या कामगिरीसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ a b Duttagupta, Ishani (2017-02-26). "Minstrel in the gallery: Parvathy Baul is on a mission to bridge the gap between esoteric Baul akharas and world music". The Economic Times. 2020-03-27 रोजी पाहिले.
  2. ^ a b Mehta, Jubin. "Parvathy Baul: a singing, dancing, swirling Baul mystic". YourStory.com (इंग्रजी भाषेत). 2020-03-27 रोजी पाहिले.
  3. ^ "Parvathy Baul" (इंग्रजी भाषेत). 2020-03-27 रोजी पाहिले.
  4. ^ "Parvathy Baul" (इंग्रजी भाषेत). 2020-03-27 रोजी पाहिले.
  5. ^ "Parvathy Baul" (इंग्रजी भाषेत). 2020-03-27 रोजी पाहिले.
  6. ^ Duttagupta, Ishani (2017-02-26). "Minstrel in the gallery: Parvathy Baul is on a mission to bridge the gap between esoteric Baul akharas and world music". The Economic Times. 2020-03-27 रोजी पाहिले.
  7. ^ Baul, Parvathy (2005). Song of the Great Soul: An Introduction to the Baul Path (इंग्रजी भाषेत). Ekatara Baul Sangeetha Kalari.
  8. ^ "Sangeet Natak Akademi Awards: President Kovind Honours the Achievers". News18. 2020-03-27 रोजी पाहिले.