पंढरीनाथ कोल्हापुरे
पंडित पंढरीनाथ कृष्णराव कोल्हापुरे (१६ फेब्रुवारी, इ.स. १९३० - १५ ऑगस्ट, इ.स. २०१५:मुंबई, महाराष्ट्र) हे एक शास्त्रीय संगीत शिकविणारे गुरू होते.
पंढरीनाथ यांचे वडील कृष्णराव कोल्हापुरे हे नामांकित गायक आणि पट्टीचे बीनवादक होते. ते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासमवेत बलवंत संगीत मंडळी या नाटक कंपनीचे भागीदार होते.
पंढरीनाथ यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वीणा वरदायिनी ही संस्था सुरू केली होती.
पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे संगीत शिक्षण
संपादनवडिलांकडून प्राथमिक पाठ गिरवल्यावर, पंढरीनाथांनी मधुसूदन जोशी आणि खां साहेब अता हुसेन या आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायकांकडून तालीम घेतली. बडोद्यातल्या ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षी ते पहिल्यांदा रेडिओवर गायले. बी.आर. देवधर मास्तरांकडे शिक्षण सुरू झाल्यावर पंढरीनाथांना कुमार गंधर्व भेटले. आधी गुरुबंधू असणारे कुमार नंतर गुरूही झाले. कुमाराच्या स्मरणार्थ पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी फलटण गावात फलटणमध्ये संगीत महोत्सव सुरू केला.
कुटुंब
संपादनशिवांगी, पद्मिनी आणि तेजस्विनी या पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या तीन मुली आहेत. त्यांपैकी पद्मिनी कोल्हापुरे आणि तेजस्विनी कोल्हापुरे यांनी अनेक हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. शिवांगी कोल्हापुरे या गायिका असून हिंदी चित्रपट अभिनेते शक्ती कपूर हे त्यांचे पती होत.
पंढरीनाथांनी काही वर्षे थांबवलेले लेखन, गायन, रुदवीणावादन आणि अध्यापन आपल्या मुली मोठ्या झाल्यावर पुन्हा सुरू केले.
पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे ग्रंथलेखन
संपादन- पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी भारतीय ख्याल गायकीचे मध्ययुगीन अध्वर्यू नियामतखान-सदारंग यांचे चरित्र लिहिले आहे.
- गानयोगी शिवपुत्र (कुमार गंधर्वांवरचे पुस्तक)
सन्मान
संपादन- मुंबई-अंधेरीतील के-पश्चिम विभागात गुलमोहर क्रॉस रोड नं. १२ या मार्गास पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे नाव दिले आहे.