नेहरू युवा केंद्र संघटन


नेहरू युवा केंद्र संघटना हे भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत असलेली स्वायत्त संस्था आहे. हिची स्थापना १९७२ साली झाली. या संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. ही संघटना युवकांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात राष्ट्रनिर्मिती व देशभक्तीच्या भावनेला जागृत करण्याचे कार्य करते. हिचे घोषवाक्य भविष्याचे सहप्रवासी असे केंद्राचे घोषवाक्य आहे. वर्षभरात २.२५ लाख कृती आयोजित करून संघटन एक कोटीहून जास्त युवकांपर्यंत पोहोचते. संघटनेने ८०,०००हून जास्त सक्रिय युवक मंडळांचे (युथ क्लब) जाळे विणले असून देशाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये लाखो कार्यकर्ते कार्यरत आहेत. प्रत्येक वर्षी १२००० कार्यकर्ते निवडून, प्रशिक्षण देऊन, रुजू करून घेतले जातात व देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात २० ते ३० कार्यकर्ते विखरून ठेवले जातात.

जालना जिल्ह्याच्या नेहरू युवा केंद्र संघटनाद्वारे राबवण्यात आलेले ‘स्वच्छता अभियान’, इ.स. २०१६

कार्यविस्तार

संपादन

साडेनऊ हजार युवकांची संसद भरवून त्यात ग्रामीण विकासाचे मुद्दे आणि सरकारचे आघाडीचे कार्यक्रम यांवर चर्चा होते. त्याशिवाय स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छतागृहांची उभारणी, रक्तदान शिबिरे, एकीसाठी धावण्याचा कार्यक्रम व खेळ आयोजित केले जातात. देशातल्या अगदी दुर्गम भागापर्यंत पोहोचून आपत्ती आल्यास (उदा. भूकंप किंवा पूर) संघटना तिथे पोहोचून मदतकार्य करते. राष्ट्रव्यापी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून वक्ते घडवले जातात. नेहरू युवा संदेश नावाचे एक त्रैमासिकही चालविले जाते.

संधीचे आगर

संपादन

नेहरू युवा केंद्राशी पुढीलप्रकारे जोडून घेता येते. संघटन कार्यकर्ता, इंटर्न, युवा कार्यक्रम सल्लागार, युवक मंडळे, सक्रिय गटांची उभारणी, युवकांची प्रेरणा व युवकांचे पुढारी, थॉट लीडर्स, प्रेरणादायी वक्ते, कौशल्य विकास तज्ज्ञ, नेतृत्व प्रशिक्षक, साहस प्रशिक्षक, मीडिया भागीदार, सामाजिक मीडिया विशेषज्ञ, आय. टी. सोल्युशन प्रोव्हायडर, युवा कार्यक्रम व्यवस्थापक, युवा घडामोडी आणि सक्षमीकरण विशेषज्ञ इत्यादी. थोडक्यात सांगायचे तर प्रत्येक तरुण/तरुणीला नेहरू युवा केंद्र संघटनेत काम करायला वाव आहे. प्रत्येकाला स्वतःच्या क्षमतेनुसार व गुणांनुसार योगदान देता येते. संघटन ही स्थितिस्थापक सरकारी संस्था नसून एक गतिशील चळवळ आहे.

युवक मंडळे

संपादन

आपापल्या भागामध्ये युवक मंडळे स्थापन करून त्यांची नेहरू युवा संघटनेकडे नोंदणी करता येते. या नोंदणीची सगळी प्रक्रिया केंद्राच्या वेबसाईटवर दिली आहे. यातूनच नेतृत्वक्षमता विकसित होऊन तिला खतपाणी मिळत जाते. ही युवा मंडळे जनसामान्यांच्या व्यापक स्वरूपाच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर काम करतात. त्यासाठी संघटन त्यांना मार्गदर्शन करते.

कार्यकर्ते होण्यासाठी पात्रता

संपादन

कमीत कमी दहावी पास ही शैक्षणिक गुणवत्ता लागते. जर उच्चशिक्षण घेतले असेल व कम्प्युटर हाताळता येत असेल तर प्राधान्य दिले जाते. संघटनेशी जोडलेल्या युवक मंडळांच्या सभासदांना प्राधान्य दिले जाते. वय १८ ते २५ च्या मध्ये हवे. लोकसंख्येतील दुर्बल घटक जसे अनुसूचित जाती/जमाती यांना सदस्य होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. युवतींचा सहभाग पुरेशा प्रमाणात राहील याची काळजी घेण्यात येते. ज्यांनी अर्ज केला आहे, त्यांना मुलाखतीसाठी पाचारण करून मग अंतिम निवड केली जाते.