नलिनी मालानी
नलिनी मालानी या महाराष्ट्रातील चित्रकार आहेत.[१]
जन्म
संपादननलिनी मालानी यांचा जन्म फाळणीपूर्व भारतात कराची येथे इ.स. १९४६ साली झाला.[२]
बालपण
संपादनफाळणीनंतर नलिनी मालानी या एक वर्षाच्या असताना त्यांचे आई-वडील त्यांना घेऊन भारतात आले आणि त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. बालवयात निर्वासित म्हणून त्यांना जे अनुभवावे लागले त्याचा प्रभाव त्यांच्या कलानिर्मितीत कायम राहिला.
शिक्षण
संपादननलिनी मालानी यांचे शालेय शिक्षण दक्षिण मुंबईतील व्हिला थेरेसा आणि वाल्सिंगहॅम स्कूलमध्ये झाले. त्यांनी इ.स. १९६४ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि इ.स. १९६९ मध्ये फाईन आर्ट विषयातील पदविका प्राप्त केली.
कारकीर्द
संपादनजे.जे.मध्ये शिकत असताना १९६४ ते १९६७ या काळात त्यांचा भुलाभाई मेमोरियल इन्स्टिट्यूटमध्ये स्टुडिओ होता. १९८४ ते १९८९ या काळात त्यांना भारत सरकारतर्फे कला विषयातली आर्ट फेलोशिप मिळाली. अमेरिका, इटली, जपान, सिंगापूर या देशांमध्ये त्यांनी निवासी चित्रकार म्हणून वास्तव्य केले. भारतात आणि परदेशात त्यांची एकल प्रदर्शने झालेली आहेत. समूहप्रदर्शनांमध्ये ‘सिटी ऑफ डिझायर्स’ हे त्यांचे पहिले प्रदर्शन झाले. मुंबईमध्ये १९९९ साली ‘रिमेम्बरिंग टोबाटेक सिंग’ हे त्यांचे प्रदर्शन भरले. व्हिडिओ इन्स्टॉलेशन हा या प्रदर्शनाचा विषय होता. अमेरिकेतल्या पीबॉडीइसेक्स म्युझियममध्ये २००५-०६ मध्ये नलिनी मालानी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे ‘एक्स्पोजिंग द सोर्स’ हेरेस्ट्रो स्पेक्टिव्ह हे प्रदर्शन भरले होते. ‘लिव्हिंग इन एलिस टाइम’ (२००६), ‘लिसनिंग टू द शेड्स्’ (२००८), ‘कॅसान्ड्रा’ (२००९), ‘स्प्लिटिंग द अदर’ (२०१०) ही त्यांची महत्त्वपूर्ण प्रदर्शने आहेत. ५२ व्या व्हेनिस बिनाले आणि लॉसान येथे भरलेल्या १९९२-२००९ या कालखंडातील नलिनी मालानी यांच्या रेट्रोस्पेक्टिव्ह प्रदर्शन या दोन्ही प्रदर्शनांचे शीर्षक ‘स्प्लिटिंग द अदर’ हे होते. या निमित्ताने त्यांच्या कलानिर्मितीची समीक्षा करणारे पुस्तक इंग्रजीत प्रकाशित झाले. नलिनी मालानी यांनी मांडणशिल्प, मल्टीप्रोजेक्शन वर्क, व्हिडिओ शॅडो प्ले, नाटक या माध्यमांचा कलानिर्मितीसाठी सातत्याने वापर केला. जातीय दंगे, कामगारांचे जीवन, पर्यावरणाचा नाश, समाजात होणारी स्त्रियांची कुचंबणा अशा सामाजिक विषयांचे चित्रण त्यांच्या कलाकृतींमधून येते. त्यामुळे राजकीय चित्रकार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. नलिनी मालानी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगतात, ‘त्यांची इच्छा असो वा नसो, सर्व चित्रकार राजकीयच असतात. कलेसाठी कला यावर माझा विश्वास नाही. चित्रकार-प्रेक्षक-कलाकृती या त्रिकोणी नात्यामध्ये आपण कलाकृतीच्या माध्यमातून संवादाबद्दलच बोलत असतो.’ नलिनी मालानी यांनी आपल्या चित्रांमधून स्त्रीचे चित्रण करण्यासाठी सीता, मेडिआ, एलिसया सारखी भारतीय व ग्रीक पुराण कथा यांमधील मिथके अथवा एलिससारखी बालसाहित्यातील पात्रे वापरली आहेत. ‘कॅसान्ड्रा’ या त्यांच्या प्रदर्शनात त्यांनी कॅसान्ड्रा या ग्रीक मिथकाच्या आधारे स्त्रीच्या अद्याप पूर्णत्वाला न गेलेल्या क्रांतीबद्दल भाष्य केले आहे. ‘युनिटीइनडायव्हर्सिटी’ या व्हिडिओमध्ये राजा रविवर्मा यांच्या ‘गॅलॅक्सी ऑफ म्युझिशियन्स’ यांच्या चित्राचा वापर केलेला आहे. या चित्रात वेगवेगळ्या प्रांताच्या वेषभूषा असलेल्या अकरा स्त्रिया दाखवलेल्या आहेत. ‘स्प्लिटिंग द अदर’ प्रदर्शनात विभाजन ही मध्यवर्ती कल्पना आहे. चौदा पॅनेल्समध्ये विभागलेल्या या चित्रात नलिनी मालानी यांनी महाकाव्यात असतात तसे विविध संस्कृतींचे आणि विविध कालखंडामधले संदर्भ एकत्र आणले आहेत. मानवी आकृती, देवदूत आणि राक्षस, तरंगणारे मेंदू, नाळ आणि भ्रूण, हाडे, दृष्टिहीन डोळ्यांनी पाहणारे विचित्र जीव अशांनी बनलेले विश्व या चित्रात येते. या सृष्टीचा निर्माता असलेल्या एका स्त्रीची मोठी प्रतिमा या चित्रामध्ये आहे. त्या ‘क्युरेटर्स आर्टिस्ट’ म्हणूनच ओळखल्या जातात. अरुण खोपकर यांनी तीन चित्रकारांवर काढलेल्या माहितीपटामध्ये भूपेन खख्खर, विवान सुंदरम यांच्याबरोबर नलिनी मालानी यांचाही समावेश आहे. त्यांना २०१० मध्ये झालेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे अधिकृत भित्तिचित्र (पोस्टर) करण्याचा मान मिळाला होता.
संदर्भ
संपादन- ^ "Nalini Malani - Biography". www.nalinimalani.com. 2020-03-06 रोजी पाहिले.
- ^ "Nalini Malani". Saffronart. 2020-03-06 रोजी पाहिले.