अनंत यशवंत खरे

(नंदा खरे या पानावरून पुनर्निर्देशित)

अनंत यशवंत खरे ऊर्फ नंदा खरे (१९४६ -) हे मराठी भाषेतील एक कादंबरीकार आहेत. त्यांच्या स्वतंत्र (व भाषांतरित) लेखनामध्ये समाजशास्त्रीय, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक विषयांना मध्यवर्ती स्थान दिलेले आढळते. ‘अंताजीची बखर’, ‘बखर अंतकाळाची’ आणि ‘उद्या’ ह्या त्यांच्या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. विवेकवादी आणि विज्ञानाधारित भूमिकेचा सातत्याने पुरस्कार हा गुणविशेष त्यांच्या लेखनात ठळकपणे दिसून येतो.

अनंत यशवंत खरे
Nanda khare.jpg
जन्म नाव अनंत यशवंत खरे
टोपणनाव नंदा खरे
जन्म २ ऑक्टोबर, १९४६
नागपुर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र सिव्हिल अभियांत्रिकी, मराठी साहित्य
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती अंताजीची बखर, बखर अंतकाळाची, उद्या
स्वाक्षरी अनंत यशवंत खरे ह्यांची स्वाक्षरी

शैक्षणिक व व्यावसायिक कारकीर्दसंपादन करा

खऱ्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नागपुरात झाले. मॅट्रिकची परीक्षा १९६१ साली उत्तीर्ण झाल्यानंतर १९६२-६७ ह्या काळात त्यांनी मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या संस्थेत सिव्हिल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले. तेथून B.Tech. (Honours, Civil) ही पदवी घेतल्यानंतर २००१ सालापर्यंत एका खाजगी कंपनीत ते सिव्हिल इंजीनियर होते. भीमा नदीवरील उजनी धरणाच्या बांधकामात त्यांचा मोठा वाटा आहे.

अंताजीची बखरसंपादन करा

शैली आणि आशयाच्या दृष्टीने अंताजीची बखर ही त्यांची कादंबरी लक्षणीय ठरते. अठराव्या शतकात राहणाऱ्या ‘अंताजी खरे’ नावाच्या एक पुणेरी ब्राह्मणाने आपल्या आयुष्यातील काही निवडक प्रसंग ‘बखरी’च्या स्वरूपात लिहून ठेवले होते, आणि दोन शतकांनंतर हे जीर्णावस्थेतले कागद त्याच्या वंशजांच्या हाती लागतात अशी कल्पना करून ही कादंबरी लिहिलेली आहे. तिच्यात वर्णन केलेला काळ १७४० ते १७५७ दरम्यानचा आहे, आणि तिची भाषिक शैली अठराव्या शतकातल्या बखरवाङ्मयाशी मिळतीजुळती आहे. नागपूरकर भोसल्यांच्या बंगालमधल्या स्वाऱ्या आणि मराठा बारगीरांनी त्यावेळी केलेले अत्याचार, एका सतीचा प्रसंग, १७५६ साली कलकत्त्याच्या फोर्ट विल्यममध्ये घडलेला काळकोठडीचा प्रसंग, प्लासीची लढाई अशा अनेक ठिकाणी अंताजी जातीने हजर असतो, व आपल्या हिशेबी आणि कातडीबचावू स्वभावाला अनुसरून हरप्रसंगी नेमके भाष्य करीत जातो, अशी कादंबरीची रूपरेषा आहे.

अंतकाळाची बखर हा अंताजीची बखर या कादंबरीचा ‘पुढला भाग’ म्हणता येईल. नारायणराव पेशव्यांचा खून आणि मराठेशाहीचा शेवट हा कथाभाग त्यात आलेला आहे.

उद्यासंपादन करा

उद्या ह्या कादंबरीची गणना dystopian fiction ह्या साहित्यप्रकारात करता येईल. कथानक नजीकच्या भविष्यकाळातलं आहे. ह्या जगात जागोजागी माणसांवर पाळत ठेवणारे कॅमेरे लावलेले आहेत, तसेच चेहऱ्यावरचे हावभाव टिपणारे संगणक आहेत. सरकारी यंत्रणा आणि (‘भरोसा’, ‘विकास’ अशी नावं मिरवणाऱ्या) जगड्व्याळ खाजगी कंपन्या यांच्यात अनेक पातळ्यांवर साटंलोटं आहे. समाजातलं स्त्रियांचं प्रमाण घटलेलं असल्यामुळे त्यांची ‘शिकार’ करून त्या श्रीमंत वर्गाला पुरवण्याच्या कामी अनेक राजकीय दलं गुंतलेली आहेत. खेड्यांपासून महानगरांपर्यंत अनेक पातळ्यांवर सगळेच समाजघटक ह्या जाळ्यात कसे अडकले आहेत याचं तपशीलवार चित्रण कादंबरीत आलेलं आहे. ह्याला पर्याय म्हणून अहिंसेच्या मार्गाने जाणारं, निसर्गाशी आपुलकीचं नातं राखून जगण्याचा प्रयत्न करणारं ‘चारगाव’ नावाचं एक खेडं (कम्यून) तग धरून आहे. ह्या दोन जगांतील संघर्ष कादंबरीत प्रभावीपणे चित्रित झाला आहे.

नंदा खरे यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

पुस्तकाचे नाव लेखनप्रकार प्रकाशनसंस्था व वर्ष
अंताजीची बखर कादंबरी ग्रंथाली, १९९७; मनोविकास, २०११.
इंडिका भाषांतरित कादंबरी (मूळ शीर्षक व लेखकः 'Indica' by Pranay Lal) मधुश्री, २०१९.
उद्या कादंबरी मनोविकास, २०१५.
ऐवजी आत्मचरित्र मनोविकास, २०१८.
कहाणी मानवप्राण्याची समाजविज्ञानविषयक ग्रंथ मनोविकास २०१०, २०१९.
कापूसकोड्याची गोष्ट भाषांतरित (मूळ शीर्षक व लेखकः 'Ecology, Colonialism, and Cattle' by Laxman Satya) मनोविकास व संवेदना, २०१८.
जीवोत्पत्ती... आणि नंतर विज्ञानविषयक ग्रंथाली, १९९९.
डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य विज्ञानविषयक संपादित लेख (सहलेखकः रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ) मनोविकास, २०११.
दगडावर दगड, विटेवर वीट आत्मचरित्र ग्रंथाली, २००२; मनोविकास, २०१८.
नांगरल्याविण भुई कादंबरी ग्रंथाली, २००५.
बखर अंतकाळाची कादंबरी मनोविकास, २०१०.
वाचताना, पाहताना, जगताना ललित लोकवाङ्मय गृह, २०१४.
वारूळपुराण संक्षिप्त भाषांतर (मूळ शीर्षक व लेखकः 'Anthill' by E.O. Wilson) मनोविकास, २०१५.
वीसशे पन्नास विज्ञान कादंबरी ग्रंथाली, १९९३.
संप्रति कादंबरी ग्रंथाली, १९९८; मनोविकास, २०२०.
ज्ञाताच्या कुंपणावरून विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाची तोंडओळख ग्रंथाली, १९९०; मनोविकास, २०१३.
दगड-धोंडे पूर्व विदर्भाचे भूशास्त्र मनोविकास, २०२०.
गावगाडा: शतकानंतर अनिल सुर्डीकर-पाटील यांच्या लेखांचे संपादन मनोविकास, २०१२.
ऑन द बीच भाषांतरित कादंबरी (मूळ शीर्षक व लेखकः 'On the Beach' by Nevil Shute) मनोविकास, २०२०.

सामाजिक कार्यसंपादन करा

१९९३ ते २०१७ ह्या दरम्यान खऱ्यांनी ‘आजचा सुधारक’ ह्या विवेकवादी वैचारिक मासिकाच्या विश्वस्त मंडळावर काम केले. यापैकी २००० ते २०११ या काळात ते ‘कार्यकारी संपादक’ होते. त्याचप्रमाणे १९८४ ते १९९१ ह्या कालखंडात ते मराठी विज्ञान परिषदेशी संलग्न होते. विवेकवादी विज्ञानाचा प्रसार व्हावा ह्या हेतूने माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ते शैक्षणिक कार्यक्रम घेत असत.

पुरस्कारसंपादन करा

  • ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ ह्या त्यांच्या हस्तलिखितास १९८५ साली ग्रंथालीचा विज्ञान पुस्तके/हस्तलिखिते यांसाठीचा द्वितीय पुरस्कार मिळाला.
  • ‘वीसशे पन्नास’ ह्या विज्ञान कादंबरीस १९९५ साली विदर्भ साहित्य संघाचा गो.रा. दोडके स्मृती वाङ्मय पुरस्कार मिळाला.
  • ‘कहाणी मानवप्राण्याची’ ह्या मानवशास्त्रविषयक ग्रंथास २०१० साली महाराष्ट्र शासनाचा भाई माधवराव बागल पुरस्कार व प्रियदर्शन अकॅडमीचा वार्षिक साहित्य पुरस्कार मिळाला.
  • एकूण कादंबरीलेखनासाठी २०१४ साली ‘शब्द: द बुक गॅलरी’ ह्या संस्थेचा भाऊ पाध्ये पुरस्कार मिळाला.
  • ‘उद्या’ ह्या कादंबरीला २०१५ साली लोकमंगल साहित्य पुरस्कार मिळाला.

यापुढे कोणतेही पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय सुमारे २०१७ साली त्यांनी घेतल्यामुळे २०२० साली ‘उद्या’ ह्या कादंबरीला जाहीर झालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांनी नाकारला. ह्या नकारामागे कोणतेही राजकीय कारण नसल्याने त्यांनी स्पष्ट केले.

कौटुंबिकसंपादन करा

नंदा खऱ्यांचा विवाह १९६९ साली झाला. त्यांच्या पत्नी विद्यागौरी ह्यांनी इंग्रजी साहित्यात डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांच्या कन्या नर्मदा ह्यांनी पेशी-विकास शास्त्र व जनुकशास्त्रात डॉक्टरेट मिळवली असून पुत्र अमिताभ यांनी औद्योगिक अभियांत्रिकीत मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली आहे.