डॉ. दिलबागसिंग अठवाल (१२ ऑक्टोबर, इ.स. १९२८:कल्याण, पंजाब, भारत - १४ मे, इ.स. २०१७:न्यू जर्सी, अमेरिका)) हे एक भारतीय कृषिशास्त्रज्ञ होते.

दिलबागसिंग पंजाब कृषी विद्यापीठात प्राध्यापक आणि संकरित वाण विभागाचे प्रमुख म्हणून होते. नॉर्मन बोरलॉग यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. भारतातील हरित क्रांतीनंतर संकरित वाण क्षेत्रातील जादूगार अशी अठवाल यांची ओळख निर्माण झाली.

गव्हाचा रंग बदलला

संपादन

१९७० च्या दशकात भारताने मेक्सिकोवरून ‘लेरमा रोजो ६४’ आणि ‘पीव्ही १८’ या गव्हाच्या वाणांची आयात केली. या वाणांचे उत्पादन भरघोस येत असले तरी पोळ्यांचा रंग लाल असल्यामुळे त्यात बदलाची गरज निर्माण झाली. अठवाल यांनी प्रदीर्घ संशोधन करून या वाणांचा रंग बदलण्यात यश मिळविले. गव्हाचा बदललेला रंग म्हणजे अठवाल यांनी भारताला दिलेली अनोखी भेटच ठरली. बदललेल्या या वाणाला त्यांनी आपल्या गावाच्या नावावरून ‘कल्याण’ असे नाव दिले. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेने ‘सोना’ या गव्हाच्या वाणाचा शोध लावला होता. त्यानंतर अठवाल यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेतील संशोधकांसह ‘कल्याण’ आणि ‘सोना’ या दोन्ही वाणांचे एकत्रीकरण करून ‘कल्याणसोना’ हे नवीन वाण विकसित केले. १९६०-६१ मध्ये भारतातील गहू उत्पादन प्रतिहेक्टर १२.४४ क्विंटल होते, ‘कल्याण’ वाणामुळे १९७०-७१ मध्ये ते २२.३७ क्विंटलपर्यंत वाढले. या वाणांमुळे भारत गहू उत्पादनात स्वयंपूर्ण झाला.

बाजरी, हरबरा इत्यादी

संपादन

डॉ. अठवाल यानी संकरित बाजरीचा शोध आवला. त्यांनी विकसित केलेल्या बाजरीच्या बाजरा-१ या संकरित वाणामुळे देशातील बाजरीचे उत्पादन दुपटीने वाढले, व भारतातील अन्नधान्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. पंजाब कृषी विद्यापीठाच्या वनस्पती प्रजनन विभागाचे संस्थापक विभागप्रमुख असलेल्या डॉ. अठवाल यांनी याशिवाय हरभरा आणि तंबाखू या पिकांच्या वाणांच्या निर्मितीत बहुमूल्य योगदान दिले आहे.

फिलिपाईन्स

संपादन

१९६७ मध्ये अठवाल फिलिपाइन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत उपमहासंचालक म्हणून रुजू झाले. तेथेही त्यांनी भाताच्या नव्या वाणाच्या संशोधनासाठी नवनवीन कल्पना सादर केल्या.

पुरस्कार आणि सन्मान

संपादन
  • सिडनी विद्यापीठाने १९५५ मध्ये डॉ. अठवाल यांना मानद डॉक्टरेट दिली.
  • १९६४ मध्ये भारत सरकारकडून शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार
  • १९७५ मध्ये अठवाल यांना भारत सरकारने पद्मभूषण या नागरी पुरस्काराने गौरविले.