डेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV)विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसांनंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग दोन प्रकारे होतोः डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो.

भारतात इ.स. १९६३ साली कलकत्त्यात याची पहिली मोठी साथ निर्माण झाली. त्यानंतर बहुतांश महानगरे आणि शहरांमधे व ग्रामीण भागांमधेही डेंग्यूचा उद्रेक झाल्याचे वृत्त आहे.

प्रसार

आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू ‘एडीस इजिप्ती’ जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. याच्या साथी वेगाने पसरू शकतात. एडीस इजिप्ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो.