दादासाहेब बेलसरे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
दादासाहेब बेलसरे
संपादनस्वातंत्र्य संग्राम सैनिक, राष्ट्रवीर, दलितमित्र, , माजी आमदार, संसद सचिव, पूजनीय स्व.श्री. रामकृष्ण आत्माराम बेलसरे (जन्म:- ९ ऑक्टोबर १९१४ मृत्यू २३ ऑक्टोबर १९९५) हे भारतीय क्रांतिकारक, राजकारणी, वकील, समाजसुधारक तसेच गांधीवादी व पुरोगामी विचारांचे होते. दादासाहेब बेलसरे या नावाने ते ओळखले जातात. यांचा जन्म आज रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात येत असलेल्या वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट या गावी झाला. बी.ए., एल.एल.बी. पर्यंत यांचे शिक्षण झाले. हायस्कूल व महाविद्यालयात शिकत असतांनाच संघटनात्मक कामे करून चळवळी उभारल्या. भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपल्या ऐन उमेदीच्या काळात ब्रिटिश साम्राज्य विरुद्धच्या लढ्यात उडी घेतली व कुठल्याही संकटाची तमा न बाळगता धैर्याने व शौर्याने लढले. हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात विदर्भातील मोर्शी, वरुड भागातील प्रमुख नेते होते. तसेच आर्वी तालुक्यात झालेल्या सत्याग्रहात सुद्धा सहभागी होते. दि.१४ ऑगष्ट १९४० रोजी चंद्रपूर येथील जटपूरा गेट वरून रात्री १२ वाजता इंग्रजांचे युनियन जॅक उतरवून त्यावेळी असलेले काँग्रेसचे तिरंगी निशाण चढवून त्यांनी स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात केली. महात्मा गांधी यांनी त्यांना सन १९४० मध्ये व्यक्तिगत सत्याग्रहा साठी नियुक्त केले होते. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलना मध्ये दीड वर्ष तुरुंगात होते. अखिल भारतीय स्वतंत्रता संग्राम सेनानी समितिचे सचिव होते. विशेषतः स्पृश-अस्पृश यातील दरी नष्ट करून समता प्रस्थापित करण्या साठी त्यांनी अस्पृशता निर्मुलनाचे कार्य केले. महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे उपाध्यक्ष होते. दलित स्त्रीवादी चळवळीच्या नेत्या जाईबाई चौधरी यांनी नागपूर येथे स्थापन केलेल्या जाईबाई चौधरी ज्ञानपीठ व जुनियर कॉलेजचे अध्यक्ष होते. हरिजन सेवकसंघा मार्फत त्यांच्या नेतृत्वात शेंदूरजनाघाट, काटोल, करजगाव गांधीघर, करजगाव बहीरम येथे बालवाडया व पाळणाघरे स्थापन केली होती. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित विनोबा भावे, सेनापती बापट, महाराष्ट्र गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या सोबत राहून पदयात्रा घानसफाईचे कामे केलीत. विनोबा भावे यांचे सर्वोदय संमेलन व भूदान चळवळी मध्ये सहभागी होते. सन १९३६ पासून राष्ट्रीय काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. तालुका व जिल्हा काँग्रेस कमेटीत अनेक पदे भूषवली. त्यांच्या लोकप्रियतेमुळे मध्यप्रांत विधानसभा मोर्शी व जरुड येथून सन १९४६ व सन १९५१ असे दोन वेळेस आमदार म्हणून निवडून आले. सन १९४६ ते १९४७ मध्ये मध्य प्रांत वऱ्हाड मंत्रिमंडळातील रविशंकर शुक्ला मंत्रिमंडळात पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून काम पाहिले. सार्क परिषद निमित्य नेपाल, भूतान येथे उपस्थित होते. सन १९५५ मध्ये मोर्शी येथे स्थापन केलेल्या हरिजन वसतीगृहाचे अध्यक्ष तसेच शें दूरजनाघाट येथील जनता शिक्षण संस्थेचे आध प्रवर्तक व संस्थापक सदस्य होते. ते बरेच वर्ष अमरावती जेलचे व्हिजीटर असून सोशल अॅण्ड मॉरल एज्युकेशन लेक्चरर म्हणून अमरावती येथील जेलला जात होते. आयुष्यभर समाजसेवेसाठी जगलेले दादासाहेब यांनी दिनांक १२ जुलै १९७९ रोजी देहदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या इच्छे नुसार शरीररचनाशास्त्र विभाग, शासकीय वैधकीय महाविद्यालय नागपूर येथे त्यांचा देह त्यांचे मानसपुत्र श्री. केशव रामफल मधुमटके नागपूर यांच्या हस्ते दिनांक २३ ऑक्टोबर १९९५ रोजी दिवाळीच्या दिवशी अर्पण करण्यात आला. आयुष्यभर समाजऋण फेडणारे दादासाहेब मृत्यू नंतरही समाजाच्या उपयोगी पडले. त्यांना महाराष्ट्र शासना कडून ४ मार्च १९७७ रोजी दलित मित्र पुरस्कार मिळाला असून श्री एन. डी. तिवारी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय स्वातंत्रता संग्राम सेनानी समिती कडून सारनाथ वाराणसी येथे सन १९८९ला झालेल्या तेराव्या अधिवेशनामध्ये राष्ट्रवीर पदवी बहाल केली आहे.
जन्म
संपादनपूज्यनीय दादासाहेब बेलसरे यांचा जन्म पूर्वी मध्यप्रांतात येत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येत असलेल्या शेंदूरजनाघाट या गावी माळी समाजातील बेलसरे कुटुंबात दिनांक ९ ऑक्टोबर १९१४ रोजी रात्री ८ वाजता झाला. यांचे नाव धनराज ठेवण्यात आले होते. यांना आठ बहिण भावंडे होती. दादासाहेब यांचे जन्मदाते वडील शिवाजी चिमणाजी बेलसरे असून आईचे नाव मैनाबाई होते. शिवाजी व मैनाबाई यांचे सातवे अपत्य धनराज म्हणजेच दादासाहेब होय. दादासाहेब यांच्या बालवयातच आई मैनाबाईचा मृत्यू झाला होता. शिवाजी बेलसरे यांचा शेती व्यवसाय असून शेंदूरजनाघाट नगरीतील त्या वेळी महत्त्वपूर्ण असलेले महाजन पद त्यांच्या कडे होते. दिनांक १२ डिसेंबर १९११ रोजी दिल्ली मध्ये जॉर्ज पंचम यांच्या उपस्थितीत भरलेल्या दिल्ली दरबार मध्ये शेंदूरजनाघाट येथील कन्हैय्यालालजी तांबी, रघुनाथराव तराळ सह दादासाहेब यांचे वडील श्री शिवाजी बेलसरे हे सरकारी पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दत्तक विधान
संपादनदादासाहेब यांचे जन्मदाते वडील शिवाजी चिमणाजी बेलसरे यांचे चुलत बंधू आत्माराम आण्याजी बेलसरे यांची पत्नी गुणाबाई यांच्या पोटी पुत्ररत्न जन्माला न आल्या कारणाने आत्मारामजी बेलसरे यांनी दादासाहेब पंधरा वर्षाचे असतांना दिनांक २७ फेब्रुवारी १९२९ रोजी दत्तक विधानानुसार शिवाजी बेलसरे यांचे कडून दत्तक घेतले त्यावेळी दादासाहेब यांचे धनराज शिवाजी बेलसरे हे नाव बदलून रामकृष्ण आत्मारामजी बेलसरे असे ठेवण्यात आले.
शिक्षण
संपादनदादासाहेब यांचे इंग्रजी पहिल्या वर्गाचे शिक्षण शेंदूरजनाघाट येथील प्रायमरी शाळे मध्ये असलेल्या टिळक राष्ट्रीय विद्यालयात झाले. इंग्रजी दुसरा वर्ग ते आठवा वर्ग वरुड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. वर्ग ९ ते ११ पर्यंतचे हायस्कूलचे शिक्षण मोर्शी येथील शासकीय विद्यालयात झाले. सन १९३२ ते १९३४ मध्ये वाराणशी येथील बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मधून इंटर झाले. त्यावेळी हिंदू युनिव्हर्सिटीच्या स्वतंत्र बोर्डर्स युनियनमध्ये ते वाड्मय सचिव होते. सन १९३४ ते १९३६ मध्ये किंग एडवर्ड कॉलेज अमरावती येथून बी.ए. झाले. त्यावेळी ते किंग एडवर्ड कॉलेजच्या डिबेटींग सोसायटीचे उपाध्यक्ष होते. सन १९३७ ते १९३९ मध्ये नागपूर येथील लॉ कॉलेज मधून एल.एल.बी. झाले.
भारत स्वातंत्र्य लढा
संपादनइंग्रजी जुलमी राजवटी विरुद्ध झालेल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दादासाहेब यांचा सक्रीय सहभाग होता. राष्ट्रीय काँग्रेसचे सन १९३६ पासून निष्ठावंत कार्यकर्ते होते. दिनांक ५ व ६ फेब्रुवारी १९३८ रोजी विदर्भ प्रांतिक काँग्रेसचे तिसरे अधिवेशन कर्नाटकचे श्री. गंगाधरराव देशपांडे यांचे अध्यक्षतेखाली व सुभाषचंद्र बोस यांचे जेष्ठ बंधू शरदचंद्र बोस यांच्या हस्ते शेंदूरजनाघाट येथे भरले होते. समारोपाकरिता स्व. श्री पंडीत जवाहरलाल नेहरू हे आले होते. त्या वेळी वीर वामनराव जोशी यांच्या माध्यमातून पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी दादासाहेब यांची ओळख करून घेतली होती. सन १९३९ मध्ये सालबर्डी येथील यात्रेत जाहीर सभा घेऊन त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाविषयी जनजागरण करण्याचा प्रयत्न केला. भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपल्या ऐन उमेदीच्या काळात ब्रिटिश साम्राज्या विरुद्धच्या लढ्यात उडी घेतली व कुठल्याही संकटाची तमा न बाळगता धैर्याने व शौर्याने लढले. विशेषतः दिनांक १४ ऑगस्ट १९४० रोजी रात्री १२ वाजता चंद्रपूर येथील जटपूरा गेट वरून इंग्रजांचा युनियन जॅक उतरून भारताचे तिरंगी निशाण चढवून स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात केली. तसेच महात्मा गांधी यांनी दादासाहेब यांची वैयक्तिक सत्याग्रहासाठी साठी नियुक्ती केली होती तो सत्याग्रह दादासाहेब यांनी २२ डिसेंबर १९४० रोजी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे सकाळी ९ वाजता केला होता. त्या मध्ये इंग्रज सरकार कडून कोर्ट उठे पर्यंत शिक्षा व १०० रुपये दंड झाला होता. परंतु दंडाची रक्कम न भरल्या मुळे दादासाहेब यांच्या घरचे फर्निचर जप्त करण्यात आले होते. त्यावेळी दादासाहेब हे घरी परत न जाता जिल्हा काँग्रेस कमेटी कडे गेले होते. व जिल्हा काँग्रेस कमेटीने त्यांना विद्यार्थी व तरुणांन मध्ये देशभक्ती रुजवण्याकरिता गावो गावी जाण्याचा सल्ला दिला. त्या नुसार दादासाहेब हे तीन महिने गावो गावी फिरून त्यांनी मोर्शी तालुक्यातील शेंदूरजनाघाट, पुसला, बेनोडा, लोणी, मोर्शी, खानापूर, नेर येथे तरुणांच्या व विध्यार्थ्यांच्या संघटना तयार करून या सर्व संघटनांचा स्वातंत्र्य लढया साठी दादासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली “ मोर्शी तालुका मध्यवर्ती ” संघ स्थापन करण्यात आला होता. त्याच तरुणांच्या सहभागाने सन १९४१ मध्ये आर्वी तालुक्यासह मोर्शी येथे त्यांनी विधायक कार्यकर्ता व सत्याग्रही संमेलन घेतले त्यावेळी गोंदियाचे चतुर्भुज भाई जसानी, पं. दिनकर शा. कानडे सह विदर्भातील तुरुंगा बाहेर असलेले सर्व देशभक्त संमेलनाला हजर होते. तसेच शेंदूरजनाघाट येथे काकासाहेब कालेलकर यांचे अध्यक्षतेखाली मोर्शी तालुका विधार्थी परिषद झाली होती. त्या मोर्शी तालुका विधार्थी परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री दादासाहेब बेलसरे होते. या सर्व चळवळी मधून तयार झालेले तरुण सन १९४२ च्या मोर्शी तालुक्यात झालेल्या चळवळीत सहभागी होते तसेच शहीद बेनोडा, आष्टी येथील स्वातंत्र्य लढ्यात तेच तरुण प्रमुख होते. मोर्शी तालुका मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष दादासाहेब बेलसरे यांनी मोर्शी व आर्वी तालुक्यात झालेल्या सत्याग्रहात भाग घेतला होता तसेच भारत छोडो आंदोलना मध्ये महात्मा गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिनांक ९ ऑगस्ट १९४२ रोजी मोर्शी येथे सभा घेऊन भाषण दिल्या बद्दल त्यांना अटक होऊन १० ऑगस्ट १९४२ ते ११ जानेवारी १९४४ पर्यंत अमरावती, अकोला, नागूपर येथील कारागृहात प्रथम व द्वितीय श्रेणी नजरबंद तुरुंगवासाची शिक्षा भोगली आहे. भारत स्वातंत्र्य लढ्यात हाल अपेष्टा भोगलेले स्वातंत्र्य संग्राम सैनिक व तत्कालीन आमदार दादासाहेब बेलसरे यांच्या हस्ते दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी चंद्रपूर (चांदा) येथे पहिले ध्वजारोहण संपन्न झाले. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सहीनिशी दिनांक २७ जुलै १९६८ रोजी सन्मान पत्र देण्यात आले. तसेच स्वातंत्र्य संग्रामात संस्मरणीय भाग घेतल्या बद्दल राष्ट्राच्या वतीने पंतप्रधान श्रीमती इंदीरा गांधी यांनी दिनांक १५ ऑगस्ट १९७२ रोजी ताम्रपट भेट दिला आहे. तसेच देश सेवे बद्दल देशात ठिकठिकाणी त्यांचे सन्मान व गौरवपत्र देऊन सत्कार झाले आहे. तसेच सन १९७२-७३ मध्ये भारत सरकार द्वारा मोर्शी येथे स्थापित करण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकावरील शिलालेखावर त्यांचे नाव कोरण्यात आले आहे.
राजकीय क्षेत्र
संपादनसन १९४६ साली मध्यप्रांत विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी दादासाहेब यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना वऱ्हाड मोर्शी मतदार संघातून काँग्रेस कडून उमेदवारी मिळाली व ते बहुमताने निवडून आले त्यावेळी स्थापन झालेल्या रविशंकर शुक्ल मंत्री मंडळात सन १९४६ ते १९४७ पर्यंत पार्लमेंटरी सेक्रेटरी होते. तसेच सन १९४८ ते १९५२ या कालावधीत विदर्भ प्रदेश काँग्रेस अन्नधान्य समितिचे अध्यक्ष होते. स्वतंत्र भारतात सन १९५१ मध्ये मध्यप्रदेश विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी पुन्हा दादासाहेब त्यावेळी असलेल्या जरुड मध्यप्रांत मतदार संघ क्रमांक १५० मधून इंडियन नॅशनल काँग्रेस कडून उभे होते. त्यावेळी ते पुन्हा निवडून आले असून त्यांना १२१४१ मत मिळाली होती. राजकारणातून त्यांनी कुटुंबासाठी कुठलाही लाभ करून न घेता निस्पृह भावनेने आमदार म्हणून ११ वर्ष समाजाची सेवा केली.
अस्पृश्यता निर्मूलन
संपादनपूर्वीच्या समाज व्यवस्थेनुसार बहुजनांना स्पर्श करणे सुद्धा पाप होते. स्पर्श केल्यास त्या व्यक्तीस समाजात मान राहत नव्हता. त्यावेळी दादासाहेब यांनी मान अपमानाचा विचार न करता दलितांच्या मुलांच्या आंघोळी घालून देऊन त्यांना कपडे देण्याचा उपक्रम राबविला. त्या कारणाने चिडून जाऊन त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढून दिले होते. तरी सुद्धा ते आपल्या ध्येयापासून कधीही परावृत्त झाले नाही. माळी समाजात महाजनांनच्या घरात जन्माला आलेले दादासाहेब हे पेशाने वकील होते तसेच स्वातंत्र्य लढा व राजकीय क्षेत्रातील नेते होते. तरी त्या काळी दलितांवर होत असलेले अत्याचार व सामाजिक असमानता पाहून स्पृश-अस्पृश यातील दरी नष्ट करून समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी घरा दाराची चिंता न करता अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यात स्वताला झोकून दिले. महात्मा जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव असलेले दादासाहेब स्वतः सन १९५५ पूर्वी पासून विदर्भ हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष होते. तसेच श्री एल.एम. श्रीकांत यांनी सन १९५७-५८ चे दाखल केलेल्या (ईशान्य महाराष्टाचे) आयुक्त अहवाला नुसार दादासाहेब हे अस्पृश्यता निर्मूलनासाठी तयार केलेल्या वऱ्हाड व मध्यप्रांत येथील दोन्ही शाखेचे प्रमुख होते त्यावेळी हरिजनांन करिता पुष्कळ विहिरी व मंदिर खुले केल्याची नोंद मिळते. तसेच सन १९६८-६९ पासून महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी अध्यक्ष हे श्री बाळासाहेब भारदे होते. व निमंत्रित सदस्य श्री अण्णा हजारे होते. त्या महाराष्ट्र हरिजन सेवक संघाच्या कार्यकारणी मध्ये १५ पैकी दोनच व्यक्ती विदर्भातील होते. त्यामध्ये उपाध्यक्ष दादासाहेब बेलसरे व सदस्य श्री गीताचार्य तुकारामदादा हे होते. त्यावेळी अस्पृश्यता निर्मूलन कार्य अंतर्गत पुष्कळ गावातील हरिजनांना धोबी सेवा,नाव्ही सेवा,तसेच विहिरी खुल्या करून मंदिर व हॉटेल मध्ये प्रवेश मिळून दिला. तसेच महाराष्ट्र हरिजन सेवक संघ,पुणे, अहवाल सन १९८८-८९ नुसार संपूर्ण महाराष्ट्रासह विशेषतः नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली,वर्धा, भंडारा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ या प्रत्येक जिल्ह्यात दौरा करून ठीक ठिकाणी अस्पृश्यता निवारण,व्यसनमुक्ती,राष्ट्रीय एकात्मता यासाठी सभा संमेलन घेऊन तसेच यात्रेतून प्रचार प्रसार केला होता. बहुजनांच्या मुलांसाठी हरिजन सेवकसंघा मार्फत त्यांच्या नेतृत्वात शेंदूरजनाघाट, काटोल, करजगाव गांधीघर, करजगाव बहीरम येथे पाळणाघरे व बालवाडया स्थापन केल्या होत्या तसेच मोर्शी येथे सन १९५५-५६ मध्ये हरिजन वसतीगृह स्थापन केले होते.
अस्पृश्यता निर्मूलन संबंधी दादासाहेब यांच्या उपस्थितीत झालेले कार्यक्रम
संपादन१) महाकोशल,नागूपर व विदर्भ हरिजन सेवक संघ शिबिर, ठक्कर ग्राम जबलपूर दिनांक १०-२-१९५५ ते १७-२-१९५५
२) मुंबई राज्य मराठी विभाग अस्पृश्यता निर्मूलन कार्यकर्ता शिबीर, गुरुकुंज आश्रम {मोझरी} जिल्हा अमरावती सन १९५८-५९ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत)
३) अखिल भारतीय हरिजन सेवक संघ दिल्ली वार्षिक बैठक, कालबी दिनांक ५ व ६ नोव्हेंबर १९५९ (श्रीमती रामेश्वरी नेहरू यांच्या प्रमुख उपस्थितीत)
४) अखिल भारतीय हरिजन सेवक संघ ३५ वी वार्षिक बैठक, नागपूर दिनांक २५ व २६ नोव्हेंबर १९६७
५) विनोबा भावे यांचे उपस्थितीत कालडी केरळ प्रांत मध्ये झालेल्या सर्वोदय संमेलना मध्ये प्रमुख उपस्थिती.
६) महाराष्ट्र हरिजन सेवक संघ विधायक कार्यकर्त्यांचा युथ कॅम्प श्री अण्णा हजारे यांच्या गावी राळेगण सिद्धी येथे दिनांक ८/३/१९८७ ते १५/३/१९८७
७) प्रांतिक हरिजन सेवक संघ शिबीर रामटेक
दादासाहेब यांनी सामाजिक, राजकीय व शिक्षण क्षेत्रात भूषवलेली पदे
संपादन· उपाध्यक्ष - महाराष्ट्र हरिजन सेवक संघ
· अध्यक्ष - विदर्भ हरिजन सेवक संघ
· अध्यक्ष - स्वातंत्र्य लढ्यासाठी स्थापन केलेला मोर्शी तालुका मध्यवर्ती संघ इ.स. १९४१
· अध्यक्ष - इ.स. १९४५ पासून मोर्शी तालुका कस्तुरबा गांधी स्मारक निधी
· आमदार - मध्यप्रांत विधानसभा मोर्शी मतदार संघ इ.स. १९४६
· पार्लमेंटरी सेक्रेटरी - इ.स. १९४६ ते १९४७ मध्यप्रांत वऱ्हाड मंत्री मंडळ
· अध्यक्ष - इ.स. १९४८ ते १९५२ विदर्भ प्रदेश काँग्रेस अन्नधान्य समिती
· आमदार -मध्यप्रांत विधानसभा मोर्शी मतदार संघ इ.स. १९५१
· संस्थापक सदस्य - जनता शिक्षण संस्था शेंदूरजनाघाट इ.स. १९५६
· अध्यक्ष - अमरावती जिल्हा स्वातंत्र्य संग्राम समिती
· अध्यक्ष - पश्चिम विदर्भ स्वतंत्रता सैनिक समिती
· सचिव - अखिल भारतीय स्वातंत्र्य संग्राम समिती
· अध्यक्ष - जाईबाई चौधरी ज्ञानपीठ व जुनियर कॉलेज नागपूर
· सदस्य - टिळक राष्ट्रीय विद्यालय विश्वस्त मंडळ खामगाव
· सदस्य - जिल्हा स्व. सैनिक गौरव समिती
· सदस्य - मध्यप्रदेश सरकार द्वारा शेतीविषयक स्थापन झालेली कृषी धोरण समिती
· मानद संचालक - महारष्ट्र शासन सर्वोदय योजना अमरावती जिल्हा
· जनरल सेक्रेटरी - न्यू इंग्लिश स्कूल वरुड गॅदरिंग इ.स. १९२८-२९
· सचिव - हिंदू युनिव्हर्सिटी बनारस स्वातंत्र बोर्डस युनियनचे वाड्मय सचिव इ.स. १९३३-३४
. उपाध्यक्ष - डिबेटींग सोसायटी किंग एडवर्ड कॉलेज अमरावती इ.स. १९३४-३६
अल्प चरित्र व लेख
संपादन१) हुज हु इन इंडिया, आवृत्ती इ.स. १९८५,१९८६,१९८७, १९८९,१९९०
२) बायोग्रफीक इंटरनॅशनल नं १ व ३ छापलेले पुस्तक डाकूमेंट १ सन १९६९
३) बायोग्रफीक इंटरनॅशनल ३/४ बि के ५/२ मॉडल टाउन दिल्ली ११०००९ इंडिया
४) इंडियन जुनिअर चेम्बर्स
५) International directory of biographical drifting life leadership
5126 doc circle R.O.X. No.3126 Releasing north Carolina 27622 USA
६) राष्ट्रवीर,दलित मित्र रा.आ.बेलसरे यांचे जीवन–चरित्र व कार्य परिचय, पुस्तिका
(प्रा. वा.सी.काळे, अमरावती )
७) वऱ्हाड विकास मासिक पत्रिका, लेख (ऑक्टोबर २०१४)
८) राष्ट्रवीर,दलित मित्र रा.आ.उपाख्य दादासाहेब बेलसरे यांचे सामाजिक व राजकीय कार्य,पुस्तिका (हितेश हिरामनजी ढोरे मॉ बालासुंदरी परिवार प्रमुख शेंदूरजनाघाट) श्री माळीवैभव मासिक, नागपूर, लेख (जानेवारी २०१७)
प्रभाव
संपादनरस्कीन, लिवो स्टॉल स्टॉय, जोसेफ मॅझिनी, गैरीबॉल्डी, टेरेंस मॅकस्वीनी, इमॉन डी.व्हॅलेरा, छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखोबा, संत सावतामाळी, लोकमान्य टिळक, बॅ. तात्याराव सावरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपाल कृष्ण गोखले, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद, लालबहादूर शास्त्री, डॉ. खानखोजे, बॅ. आर. के. पाटील, डॉ. कोलते, श्री. व श्रीमती असरानी, व्ही.एस. देशमुख, ज. सि. अकर्ते, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, स्वामी रामतीर्थ, वीर वामनराव जोशी, दादा धर्माधिकारी, बॅ. बारलिंगे, गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अप्पासाहेब पटवर्धन, भाऊसाहेब कडू व शंकरराव राउत.
संदर्भ
संपादन(१)महाराष्ट्र शासन स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश (खंड २, पृष्ठ क्र. १३३)
(२) महाराष्ट्र हरिजन सेवक संघ, पुणे अहवाल पुस्तिका (सन १९८८-८९)
(३) धर्मादाय आयुक्त कार्यालय धुळे रजि.नं ए १९२ परिशिष्ट १ची प्रत
(४) स्व. सीतारामजी चौधरी स्मृतिगंध (१९८८ पृष्ठ क्र. ८२,८३)
(५)राष्ट्रवीर,दलित मित्र रा.आ.बेलसरे यांचे जीवन–चरित्र व कार्य परिचय, पुस्तिका(प्रा.वा.सी.काळे, अमरावती)
(६)जि.प.पूर्व माध्यमिक शाळा एकदरा, स्मरणिका सन २०१२ “सदाव्रती तीर्थाभिषेक” पृष्ठ क्र.३९ (वा. शा. देशमुख)
(७) वऱ्हाड विकास मासिक पत्रिका, लेख (ऑक्टोबर २०१४)
(८)राष्ट्रवीर,दलित मित्र रा.आ.उपाख्य दादासाहेब बेलसरे यांचे सामाजिक व राजकीय कार्य,पुस्तिका (हितेश हिरामनजी ढोरे)
(९) नगरपरिषद प्राथमिक विद्यामंदीर शेंदूरजनाघाट शताब्दी महोत्सव अहवाल पुस्तिका पृष्ठ क्र.६
(१०) वरुड तालुक्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक पृष्ठ क्र. ८१,८२(जी. टी. तायवाडे)
(११)वरुड विकासाच्या पाऊल खुणा पृष्ठ क्र. ४१ (गो.ल.रडके)
(१२) Report of the Commissioner for Scheduled Castes and Scheduled Tribes year 1957-58 Seventh Report Part II Page No.37,48 (by L.M.Shrikant)
(१३)Assembly Election Results of Madhya Pradesh in 1951
https://www.elections.in/madhya-pradesh/assembly-constituencies/1951-election-results.html
https://www.latestly.com/elections/assembly-elections/madhya-pradesh/1951/jarud/ramkrishna-atmaram-belsare/ Archived 2021-09-05 at the Wayback Machine.