दत्तकवी

(दत्तात्रेय कोंडो घाटे या पानावरून पुनर्निर्देशित)

दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ दत्त (२७ जून, इ.स. १८७५; अहमदनगर, महाराष्ट्र; - १३ मार्च, इ.स. १८९९; बडोदे) हे मराठी भाषेतील कवी होते.

त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगर येथील मिशन हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण विल्सन कॉलेज, मुंबई आणि ख्रिश्चन कॉलेज, इंदूर येथे झाले. कलकत्ता विद्यापीठातून बी.ए. ही पदवी मिळाल्यावर पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. कवी दत्त यांच्या बहुसंख्य कविता इ.स. १८९७ व इ.स. १८९८ या काळातील आहेत. त्या काव्यरत्नावली, मनोरंजन, सुविचार समागम, बालबोध मेवा, करमणूक इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. एकूण एक्कावन कविता आज उपलब्ध आहेत. त्यांपैकी ४८ कवितांचा संग्रह त्याचे शिक्षणतज्ज्ञ चिरंजीव कवी वि.द. घाटे यांनी इ.स. १९२२ साली दत्तांची कविता या नावाने प्रसिद्ध केला. ’नवे पान’ या डॉ. मा.गो. देशमुख संपादित संग्रहात मात्र त्यांच्या सर्व कविता आहेत.

१३ मार्च, इ.स. १८९९ रोजी बडोद्यात, म्हणजे वयाच्या २४व्या वर्षी त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांनी वयाच्या २३व्या वर्षी लिहिलेली ही कविता :-

जन्मापासून पाहिली वरवरी तेवीस पानें पुरीं 
कोणा माहित आणखी कितितरी पाहिन या भूवरीं

दत्तकवींचे घराणे

संपादन

दत्तात्रेय कोंडो घाटे यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव विठ्ठल दत्तात्रेय घाटे, नात डॉ. अनुराधा पोतदार, पणतू डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि आणि पणती यशोधरा पोतदार-साठे हे सर्वच कवी झाले. डॉ. अनुराधा पोतदार यांचे दत्त कवींचे चरित्र लिहिले आहे.

सुप्रसिद्ध कविता

संपादन
  1. बा नीज गडे नीज गडे लडिवाळा
  2. बोलत कां नाहीं झालें काय तुला बाई
  3. प्रातःकाली कुणी कोकिळा तरु-शिखरीं बैसुनी । उंच स्वराने सांगुं लागली जगतालागोनी;
  4. प्रभात झाला रवी उदेला ऊठ उशिर झाला
  5. या बाई या, बघा बघा कशि माझि बसलि बया
  6. अमर्याद हा व्योमसिंधू गभीर । मधें चालली घार ही नाव धीर
  7. मोत्या शीक रे अ आ ई! सांगुं कितितरी बाई !