मुख्य मेनू उघडा

दत्ताजी ताम्हणे (जन्म : रत्नागिरी, १३ एप्रिल, १९१३; मृत्यू : मुलुंड (मुंबई), ६ एप्रिल २०१४) हे एक थोर देशभक्त स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे वडील पोस्ट मास्टर होते. त्यांच्या जन्मदिनीच म्हणजे १३ एप्रिल १९१९ या दिवशी जालियनवाला हत्याकांड झाले. त्यामुळे पुढे देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत दत्ताजींनी आपला वाढदिवस साजरा केला नाही.

शालेय वयात असताना दत्ताजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तिपर कविता म्हणत. अशी एक कविता ऐकून एका पोलीस अधिकाऱ्याने पोस्ट मास्टरची मुले देशद्रोही आहेत, असा रिपोर्ट दिला. तेव्हा एका रात्रीत त्या कवितेच्याच चालीवर राजा पंचम जॉर्जची स्तुती करणारी कविता रचून दत्ताजींच्या वडिलांनी कुटुंबावरील संकट टाळले.

विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्यप्रेम उफाळून आल्यामुळे १९२८ साली सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याच्या घटनेने त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी १९३० साली सविनय कायदेभंगाच्या चळवळीत मिठाच्या सत्याग्रहासाठी आंदोलन केले.

१९३२मध्ये दत्ताजींनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी कॉलेजात प्रवेश घेतला. पण कॉलेजला रामराम ठोकून त्यांनी १९३४ सालापासून काँग्रेसचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्य करण्यास प्रारंभ केला. १९३६मध्ये फैजपूर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनास दत्ताजींची उपस्थिती होती.

त्यानंतर, स्वामी आनंद यांच्या आश्रमात जवळ जवळ दोन वर्षे दत्ताजींचे वास्तव्य होते. १९४०साली ठाणे जिल्‍ह्यामध्ये वैयक्तिक सत्याग्रह करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.

छोडो भारत आंदोलनात सहभागी झाल्यामुळे १९४२ साली दत्ताजींना सव्वा दोन वर्षांचा कारावास भोगावा लागला. या आंदोलनात ठाण्याच्या तुरुंगात आणले गेलेले ते पहिले राजबंदी होते.

स्वातंत्र्यानंतर सन १९४८मध्ये दत्ताजींनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. १९५० ते १९५३पर्यंत समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र कार्यालयाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले.

१९५२साली दत्ताजी ताम्हणे यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. परंतु ते निवडणूक जिंकू शकले नाहीत. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे १९५७साली विधानसभेवर त्यांची निवड झाली. 1968 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले.

पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीच्या काळात, १९७५मध्ये १८ महिनेे तुरुंगात राहण्याची पाळी दत्ताजींवर आली.

दत्ताजी ताम्हणे यांनी `लोकमित्र' हे साप्ताहिक संपादित केले. कुळकायद्यावर त्यांनी `कळीचा घोडा' हे पुस्तक लिहिले. त्यास महाराष्ट्र शासनाचा १५०० रुपयांचा पुरस्कार मिळाला. १९६८ साली ताम्हणे लोकसभेसाठी उभे राहिले परंतु त्यांचा पराभव झाला.

१९७६मध्ये दत्ताजी ताम्हणे यांनी ठाणे जिह्यामध्ये जनता पक्षाची स्थापना केली. १९८३साली त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. यानंतर त्यांनी त्यांचा लेखन वाचन व चिंतन हा छंद आणि समाजकारण व मार्गदर्शन हेच व्रत सांभाळले. ते १०० वर्षांचे झाले तरी त्यांच्या घरी सकाळी १०-१५ माणसे केवळ विविध पुस्तकांचे वाचन करण्यासाठी नित्यनेमाने जमत असत.

दत्ताजी ताम्हणे यांनी लग्न न करता आयुष्यभर देशकारण आणि समाजकारण केले. वयाच्या १०१व्या वर्षी दीड महिन्याच्या आजारपणानंतर त्यांचे मुंबईतील मुलुंडच्या रुग्णालयात निधन झाले.