ताहेरभाई पूनावाला
ताहेरभाई पूनावाला (२१ डिसेंबर, १९२२ - १ ऑगस्ट, २०१७) हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील व्यापारी आणि समाजसुधारक आहेत. त्यांचा जन्म दाऊदी बोहरा समाजातील कुटुंबामध्ये झाला. पुण्याच्या बोहरी आळीमध्ये स्टॅन्डर्ड हार्डवेर नावाचे त्यांचे दुकान आहे.[१]
पूनावाला यांनी सुधारणावादी चळवळीत काम केले आहे.[२] सैय्यदना साहेब यांचे दाउदी बोहरा समाजावर असलेले वर्चस्व त्यांनी झुगारून दिले. त्याचा परिणाम म्हणून समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. बोहरी आळीतील त्यांच्या दुकानातील नोकर काम सोडून गेले. व्यापाऱ्यांशी संबंध दुरावले. पूनावाला यांच्यासमवेत असलेल्या लोकांवरही बहिष्कार टाकण्यात आला होता. मात्र, काहींनी माफी मागून त्यातून मार्ग काढला. पूनावाला आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. हा बहिष्कार त्यांनी आनंदाने स्वीकारला.[३]
पूनावाला विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगणारे आणि धर्म-जातीपलीकडचा विचार करणारे होते. हे महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय एकात्मता समितीचे ते कार्यकर्ते होते. डॉ. श्रीराम लागू आणि डॉ. बाबा आढाव यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात त्यांचा सहभाग होता. ते समितीचे काही काळ कोशाध्यक्ष होते.
सरदार दस्तूर स्कूलच्या समितीवर त्यांनी काम केले होते. अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर यांच्याशी पूनावाला यांचा स्नेह होता. या मैत्रीतून त्यांनी बॉबी चित्रपटामध्ये ग्रंथपालाची छोटीशी भूमिका केली होती.[४]
पूनावाला यांचे १ ऑगस्ट, २०१७ रोजी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९५ होते. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगी आणि नात असा परिवार आहे. पूनावाला यांच्या पार्थिवाचे हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयात देहदान करण्यात आले.[५] त्यापूर्वी त्यांचे पार्थिव एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.[६]
संदर्भ
संपादन- ^ "ताहेरभाई पूनावाला". www.weeklysadhana.in (इंग्रजी भाषेत). 2021-07-15 रोजी पाहिले.
- ^ "ताहेरभाई पूनावालांचे अभीष्टचिंतन". आजचा सुधारक. 2021-07-15 रोजी पाहिले.
- ^ "Nothing could stop Taher Poonawala from fighting injustice, not even a boycott". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2017-08-02. 2021-07-15 रोजी पाहिले.
- ^ "ताहेरभाई पूनावाला". Maharashtra Times. 2021-07-15 रोजी पाहिले.
- ^ author/lokmat-news-network (2017-08-01). "ताहेरभाई पूनावाला यांचे निधन". Lokmat. 2021-07-15 रोजी पाहिले.
- ^ "ताहेरभाई पूनावाला यांचे निधन". Loksatta. 2017-08-01. 2021-07-15 रोजी पाहिले.