तमाशा

एक लोकनाट्य
(तमाषा या पानावरून पुनर्निर्देशित)

१७ व्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये तमाशा हा अतिशय लोकप्रिय असणारा कलाप्रकार आहे. हा कलाप्रकार सिद्ध होण्यापूर्वी महाराष्ट्रात गोंधळ,जागरण,बळीराजा आणि महासुभा,ज्योतिबा यांच्या कार्याची जागृती पर गीत गायन जागरण, वाघ्यामुरळी, दशावतार, बहुरूपी, वासुदेवाची गाणी, पोतराज इ. लोककलाप्रकार प्रचलित होते. या सर्व नाटयात्मक लोककलाप्रकारात आणि तमाशामध्ये तांत्रिक अंगाच्या दृष्टीने आणि वाड्.मयीन बाजूने काहीएक प्रमाणात साधर्म्य आढळते. तमाशा हा गण, गौळण, लावणी, बतावणी आणि वग अशा पाच अंगांनी समृद्ध झालेला आहे.[]

तमाशाची उत्पत्ती

संपादन

'भारतीय सांस्कृतिकोशा'त 'तमाशा' या शब्दाच्या उत्पत्तीविषयी पुढील माहिती मिळते. 'तमाशा' हा शब्द अरबी असून त्याचा अर्थ 'प्रेक्षणीय दृश्य' असा आहे. तमाशा संस्थेच्या शिल्पकारांना असलेली 'शाहीर' ही संज्ञाही मूळ 'शायर' किंवा 'शाहर' या अरबी शब्दापासून बनलेली आहे. तमाशा संस्थेचे आणि तिच्या शिल्पकाराचे नाव अरबी असल्यामुळे ही संस्था मुसलमानांच्या प्रभावातून उदय पावली असावी, असा काही विद्वानांचा कयास आहे. 'तमाशा' परंपरेविषयीचा संदर्भ मराठी विश्वकोशातही सापडतो, तो पुढीलप्रमाणे आहे. 'तमाशा' हा शब्द मूळचा मराठी भाषेतील नसून तो उर्दूतून मराठीत आला आहे. १३-१४ व्या शतकात दक्षिण भारतात मुसलमानी अंमल सुरू झाल्यापासून तो मराठीत आढळतो. एकनाथांच्या एका भारुडात 'बड़े बड़े तमाशा 'देखें' अशी ओळ आहे. अशी माहिती तमाशाच्या जन्माविषयी सापडते.[]

तमाशाचे कालमानपरत्वे स्वरुप

संपादन

तमाशाची एकंदर प्रकृती पाहिली तर असे दिसून येईल की, “१८ व्या शतकाच्या सुरुवातीला वीरांच्या विषयवासनेवर उतारा म्हणून जन्मलेला हा खेळ १९ व्या शतकाच्या सुरुवातीला भक्ती, नीति, ब्रह्मज्ञान यात आला. म्हणजे तमाशाचे हाड शूरवीरांच्या शृंगाराचे, तर मांस सात्त्विकतेचेच दिसते. हाडाचे वळण आणि मासांने दिलेला आकार यांनी प्रकृती बनते, तसे शृंगाराच्या हाडाने आणि सात्त्विकतेच्या मांसाने तमाशाचे शरीर बनले आहे. तमाशाच्या गाडीचे एक चाक शृंगाराचे तर दुसरे ब्रह्मज्ञानाचे होते. या दोन्ही चाकांना जोडणारा कणा शूरवीरांच्या पराक्रमाचा होता. " असे नामदेव व्हटकर म्हणतात. साधारणपणे असे तमाशाचे स्वरूप आहे. तमाशाचे खरे स्वरूप जरी पेशवाईतच उत्तर पेशवाईतच उदयास आले असले तरी तो प्रकार महाराष्ट्रात पूर्वीपासूनच अस्तित्त्वात होता असे दिसते.

महाराष्ट्रात अनेक तमाशा फड असून आजमितीला प्रामुख्याने रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, काळू बाळू, दत्ता महाडिक, चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे संच अतिशय प्रसिद्ध आहेत. तमाशा हा गावोगावी भरणाऱ्या यात्रेनिमित्त आणि त्यानंतर च्या काळात कापडी तंबू/कनात बांधुन तिकीट विक्री करून सादर केला जातो. महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाप्रकार असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी अनेक वगनाट्ये, लावण्या, लोकगीते, सवाल-जवाब, गण-गवळण आणि फार्स असे विविधांगी साहित्य निर्माण केले आणि महाराष्ट्रातील सर्व प्रमुख तमाशा मंडळांना पुरवले.[][]

तमाशाची अंग

संपादन

तमाशाची सुरुवातच गणाने म्हणजेच गणपतीला आवाहन करून होते.. 'अथर्वशीर्षात 'गं' काराची उपासना आहे. ज्ञानेश्वरांनी या 'गं' काराला व्यवहारी भाषेत गण असे नाव देऊन त्याला ईश आदि अशा शब्दांनी 'भावार्थदीपिकेत' नमन केले आहे. शाहिरांनी गण हा शब्द तसाच ठेवला आणि 'गणापूत झाली सारी उत्पत्ती' असे म्हणले. प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात गणेशपूजनापासून करण्याची आपली परंपरागत प्रथा आहे तीच गणाच्या रूपाने तमाशात रूढ झाली. आजही समाजामध्ये प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही विघ्नहर्त्या विनायकाची पूजा अथवा नमन करूनच होताना दिसते. तमाशातही प्रत्येक खेळ निर्विघ्न पार पडावा म्हणून गणेशाला गणातून नमन अथवा आवाहन केले जाते. १९८० च्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेला, लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) लिखित एक गण येथे उदाहरण म्हणुन उदहृत केला आहे.

हे गणराया l तव गुण गाया SS
धावुनी ये मज l यश दयाया llध्रुll
रसिकांच्या पुढे मी एक पामर l
कवण अर्पितो तव चरणावर l
स्मरण सरुदे l गित स्फुरुदे l भक्तिचे हे गणराया ll१ll
अजाण बालक बोल बोबडे l
मान्य करावे ते वाकुडे ll
तु सुखकर्ता l तु दुःखहर्ता ll वेडा मी दर्शन घ्याया ll२ll
विद्येचा रे तुची विधाता l
वंदन करीतो जाता - जाता l
मस्तकी आमुच्या l हाथ असुदे l पैलतीरावरती जाया ll ३ll

हे करत असानाच पुढे शाहिरात दोन प्रकारचे आध्यात्मिक विचार प्रवाह होते शिव किंवा ब्रह्म यांना श्रेष्ठ मानणारे 'तुरेवाले' तर शक्ती - माया यांना श्रेष्ठ मानणारे 'कलगीवाले' हे आपापल्या परीने आपल्या दैवतांचे स्तवन करीत 'गण गाताना हे शाहीर प्रतिपक्षाला उद्देशून धाक वैन्याला किंवा अपयश द्यावे दुष्मनाला अशी भाषा वापरीत. अर्थात श्रोत्यांनी गण ऐकल्याबरोबर तो गाणारा शाहीर कोणत्या पक्षाचा आहे, याची कल्पना श्रोत्यांना येत असे. हा गण सादर करताना म्हणण्यात येणाऱ्या काव्यास 'गणाची लावणी' असे म्हणले जाते. ज्या काळात तमाशा उभारीस आला तो काळ पेशवाईचा आणि पेशवे गजाननाचे भक्त होते आणि तमाशा हे शेवटी आध्यात्मिक बीज असणारे लौकिक लोकनाट्य असल्याने गणातून गणपतीची आराधना क्रमप्राप्तच ठरते.[]

तमाशा सादर करत असताना गणानंतर गौळण सादर होते. या गौळणीचे मूळ ज्ञानेश्वरापर्यंत जाऊन पोचते. त्यांनी आध्यात्मिक गौळणी लिहिल्या. तमाशात मात्र आध्यात्मातुनही शृंगार दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. महाभारत काळात श्रीकृष्ण मथुरेला दही, दूध, तूप, लोणी घेऊन जाणाऱ्या गौळणींना अडवत असे आणि त्यांच्याकडून लोणी घेत असे हे सर्वज्ञातच आहे. तोच संदर्भ येथेही येतो. तमाशातील श्रीकृष्णही मथुरेला जाणाऱ्या गौळणींना अडवतो. गौळणीमध्ये राधा व इतर गौळणींची कृष्ण व त्याचे सवंगडी त्यामध्ये प्रामुख्याने पेंद्या छेडछाड करतो. त्यातूनही विनोद निर्माण होतो. गौळणीतील मावशी आणि पेंद्या, मावशी आणि कृष्ण, मावशी आणि इतर गौळणी यांच्यातील संवाद अतिशय चटकदार आणि द्व्यअर्थी असतात. हे पूर्णपणे करमणूकप्रधान संवाद असतात. सर्व गौळणी, मावशी कृष्णाची विनवणी करतात. शेवटी कृष्ण आपले अस्सल दान म्हणजेच तमाशातील 'गौळण' मिळाल्यानंतर सर्व गौळणींना जाण्याची अनुज्ञा देतो आणि गौळण संपते.

लावणी

संपादन

'लावणी' हा तमाशातील अत्यंत लोकप्रिय प्रकार होय. 'लावणी' या शब्दाचा संबंध काहीजण संस्कृतमधील 'लापणिके शी लावण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक शेतीमध्ये ज्याप्रमाणे भाताच्या रोपाची लावणी असते. तशी अक्षरांची शब्दांची एकापुढे एक लावलेली रचना म्हणजे 'लावणी' अशी निर्मिती सांगून 'लावणी'च्या निर्मितीचा संबंध श्रमपरिहारार्थ झाला असावा असे सांगतात. ती समूहमनाचे रंजन करण्यासाठीही जन्मल्याचे प्रचलित आहे. लावणीचे विषय वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. यात पौराणिक, आध्यात्मिक, सामाजिक, काल्पनिक तसेच स्त्री-पुरूष सौंदर्यवर्णन, शृंगार, विरह, वियोग, रूसवे फुगवे इत्यादी विषय हाताळले जातात. परंतु या सर्व विषयातील शृंगारावर आधारित असणाऱ्या लावण्यांची संख्या जास्त असल्याने लावणी म्हणजे शृंगार अशी धारणा झाल्याचे दिसते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील नावाजलेले लावणी कवी बशीर मोमीन (कवठेकर) यांनी लिहिलेली व सुरेखा पुणेकर यांनी आपल्या तमाशा फडाद्वरे महाराष्ट्रात सादर केलेली एक लोकप्रिय लावणी इथे उदाहरणादाखल उधहृत केली आहे.[]

मध्यानी रात्र झाली, आवचित जाग आली l
सहीना विरह मजला, मी झाले अर्ध मेली ll
सांगू कशी मी तुजला, वैरीण रात्र गेली llधृ ll
इश्काची इंगळी डसली, त्यानेच गोष्ट फसली l
झाला उरात भडका, येईना झोप कसली ll
सहीना यातना त्या- मरणाचे घाव झेली ll१ ll

बतावणी

संपादन

फार्सला बतावणी, संपादणी असेही संबोधले जाते वास्तविक पाहता हा रंगभूमीवर सादर होणारा प्रकार. नाटकाची लांबी वाढविण्यासाठी किंवा गंभीर नाटकात प्रेक्षकांना हसविण्यासाठी फार्स रंगभूमीवर होऊ लागले. समाजातील व्यंगावर यामधून बोट ठेवले जाई. ते ही विनोदाच्या साह्याने. तमाशातील फार्समध्ये बहुतांशी 'तात्या' आणि 'बापू' ही दोन पात्रे असतात. पुढे सादर होणाऱ्या वगातील पात्रांची रंगरंगोटी होईपर्यंतच्या वेळात बतावणीचे सादरीकरण होत असे. 'तात्या' आणि 'बापू' दोघेही विनोदासाठी चुटक्यांचे किंवा शापांचे सहाय्य घेऊन प्रेक्षकांना हसवितात.[]

तमाशातली फार्स किंवा बतावणी संपल्यानंतर वगाचे सादरीकरण होते. तमाशातील नाट्य खऱ्या अर्थाने वगामध्ये पहावयास मिळते. 'वेग' हा शब्द 'ओघ' या शब्दाचा अपभ्रंश असावा, कारण ग्रामीण भाषेमध्ये 'ओघ' ऐवजी 'वग' या शब्दाचा वापर केल्याचे आढळून येते. तर 'सातवाहन राजा हाल याच्या गाथासप्तशती या ग्रंथामध्ये 'वग्ग' हा शब्द समूह कळप या अर्थानी वापरला असल्याचे दिसते. या 'वग्ग' या शब्दापासून वग हा शब्द रूढ झाला असावा. कारण तमाशातील वगाची निर्मिती किंवा प्रत्यक्ष प्रयोग समूहमनाच्या किंवा प्रत्येक पात्रांच्या स्वतंत्र प्रतिभेचे एकत्रीकरण असते म्हणून ती समूहनिर्मिती ठरते. वगाचे स्वरूप हे नाटकाप्रमाणे असते. संवाद, पात्रे नाटकाप्रमाणेच असतात. वगाची कथा ठरलेली असते. पण प्रत्येक पात्राच्या तोंडचे संवाद मात्र स्वयंस्फूतीने किंवा हजरजबाबीपणाने अभिव्यक्त होतात. तमाशाचा साधारणपणे उत्तरार्ध म्हणजे वग. वगाची लिखित संहिता नसते पण स्थूल कथा प्रत्येक पात्राला ज्ञात असते. पात्रे स्वयंस्फूर्तीने पण कथेला अनुसरून संवाद म्हणत असतात. सरदार किंवा तमाशाचा प्रमुख संवादामध्ये सुसूत्रता राखून कथेला गती प्राप्त करून देत असतो. विमुक्त संवाद, अभिनय, नृत्य, संगीत यांच्या माध्यमातून वगाचा प्रयोग सिद्ध होतो. [] आपल्या वैविध्यपूर्ण लिखाणा साठी प्रसिद्ध असलेले लेखक व कवी बशीर मोमीन (कवठेकर) यांची ईश्कान घेतला बळी, बाईने दावला इंगा, तांबडं फुटलं रक्तांच,भंगले स्वप्न महाराष्ट्राचे, भक्त कबीर ही वगनाट्य अनेकविध तमाशा संचाद्वारे महाराष्ट्रात सादर करण्यात आली.[][१०]

तमाशातील वाद्य

संपादन

तमाशातील मुख्य वाद्ये म्हणजे ढोलकी, तुणतुणे, हलगी किंवा कडे आणि झांज या चारींच्या वाद्यमेळ्यात नाचीच्या पायातील चाळांचीही भर पडते. या प्रत्येक वाद्याची माहिती पुढीलप्रमाणे.

ढोलकी

संपादन

ढोलकी हे तमाशातील महत्त्वाचे वाद्य आहे. दक्षिणेतील मृदुंग, खोळ याहून ती वेगळी आहे. मृदंगाचे एक टोक लहान करत नेलेले असते. तसेच तमाशातील ढोलकीचे काहीवेळा ते थोडेसे लहान केलेले दिसते. मृदंगाच्या आवाजात एक दमदारपणा आहे. तर ढोलकीत कडक फडकतेपणा आहे. साधारण दोन-सव्वादोन फूट लाकूड पोखरून हे खोड बनविलेले असते. हे खोड बहुधा शेळी, बोकड यांच्या निम्म्या कमविलेल्या कातड्याने मढविलेले असते. धिमपुडा रुंद आणि शाईपुडा अरुंद असतो. बऱ्याच वेळा तमाशाची ढोलकी सरळ समारंतरही असलेली आढळते. शाईकडचा पुडा लोखंडी कड्यावर आवळलेला आणि तो धिमपुड्याला सुताच्या दोरीने जखडलेला असतो. तमाशा ढोलकीचा स्वर दोरीच्या तिढ्यात बारीक खुंट्या घालून, त्यांनी दोरीचा पीळ वाढवून खालीवर नेतात.

तुणतुणे

संपादन

तुणतुणे लाकडी मापट्याला, खालच्या तोंडाला कातड्याने मढवून तयार केलेले असते. मापट्याच्या मध्यावरून बारीक तार वर घेतलेली असते. मापट्याच्या बाजूला दोन-अडीच फुटाची तिरकस दांडी बसवून तिच्या वरच्या टोकाच्या खुंटीला ती तार गुंडाळलेली असते. ही दांडी हातात धरून, त्याच हाताच्या बोटाने नखाने तुणतुणे वाजवतात. तुणतुण्याच्या टोकाला रंगीत रुमाल बांधलेला असतो. तुणतुणे वाजविणारा सुरत्या असतो. गाण्याचे पालुपद पुढे चालवित तो तुणतुणे वाजवित असतो.

हलगी किंवा कडे

संपादन

हलगी हे वाद्य शाहिरांच्या डफापासून तमाशात आले. पण डफापेक्षा हलगीचा आवाज कडक आणि टणक असतो. हे एक साधे वाद्य आहे. साधारण: मोठ्या ताटाच्या आकाराचे हे वाद्य लाकडी किंवा लोखंडी कड्यावर कातडे मढवून तयार केलेले असते. तमाशात विशिष्ट प्रसंगीच या वाद्याचा उपयोग केला जातो. त्यामुळे तमाशात कडाक्याचा रंग भरला जातो. तमाशाच्या मुख्य सरदाराजवळ ही हलगी असते. ही हलगी तो छातीच्या डाव्या बाजूला उभी धरून तिच्यावर उजव्या हाताची थाप देऊन वाजवितो. हलगीच्या खाली तो डाव्या हाताच्या पंजाने बोटात लहान काडी धरून त्या काडीने हलगीवर आघात करूनही तो हलगी वाजवितो. त्यामुळे काडीच्या आघाताने व उजव्या हाताच्या थापेने हलगीतून कडक आवाजाचे संगीत निर्माण होते. या हलगीला 'कडे' असेही म्हणतात.

तमाशातील झांज गोंधळातून तमाशात आली आहे. भजनी टाळापेक्षा ही झांज थोडीशी वेगळी असते. यात साधारण दोन इंच व्यासाची नादमय अशी वाजवायची दोन पाळी असतात. ही झांज तुणतुणे वाजविणाऱ्या सुरत्याच्या जोडीचा दुसरा सुरत्या वाजवित असतो.

पुरस्कार

संपादन

तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य शासनातर्फे इ.स. २००६ पासून दरवर्षी सात दिवसांचा तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सदर महोत्सवप्रसंगी विठाबाई नारायणगाववकर जीवन गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येते. रुपये ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.[११]

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "तमाशा" (PDF). ir.unishivaji.ac.in (Marathi भाषेत). 21 October 2022. 21 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 21 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "तमाशा". vishwakosh.marathi.gov.in (Marathi भाषेत). 21 October 2022. 21 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "बशीर मोमीन (कवठेकर)" Archived 2019-06-03 at the Wayback Machine., दै.महाराष्ट्र टाइम्स, 2-March-2019
  4. ^ वैजयंती सिन्नरकर, [शब्दगंध : लोककला - तमाशा], "दै. देशदूत, नाशिक, 01-Oct-2023"
  5. ^ "लोककलेतील गणेशाचे रूप". pudhari.news (Marathi भाषेत). 9 September 2021. 22 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "प्रकरण क्र. १ : मराठीतील लोकनाट्य परंपरा - विकास" (PDF). ir.unishivaji.ac.in (Marathi भाषेत). 22 October 2022. 22 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 22 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "तमाशातील दुर्मीळ माहितीचा 'फार्सा'". loksatta.com (Marathi भाषेत). 5 June 2016. 22 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "Bhartiya Loknatya" (Hindi भाषेत). 23 October 2022.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ खंडूराज गायकवाड, लेखणीतून ग्रामीण लोककला संपन्न करणारे- बशीर मोमीन कवठेकर!, “दै नवाकाळ", 20-Jan-2011”
  10. ^ वैजयंती सिन्नरकर, [शब्दगंध : लोककला - वग ], "दै. देशदूत, नाशिक, 22-Oct-2023"
  11. ^ "महाराष्ट्र शासनाच्या योजना" (PDF). cultural.maharashtra.gov.in (Marathi भाषेत). 10 November 2022. 10 November 2022 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)