पांडुरंग सदाशिव खानखोजे

भारतीय क्रांतिकारक
(डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे (नोव्हेंबर ७, १८८४:वर्धा - जानेवारी १८, १९६७) हे एक मराठी कृषी शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म आणि शालेय शिक्षण महाराष्ट्रातील वर्धा येथे झाले.[१]

१९११ साली खानखोजे अमेरिकेत गेले व त्यांनी ओरेगन कृषी महाविद्यालयात शेतीचे शिक्षण घेतले.[१]

कृषी शास्त्रज्ञ खानखोजे संपादन

अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉ. पांडुरंग खानखोजे मेक्सिकोत गेले. १९२० सालापासून ते १९४७ सलापर्यंत त्यांनी मेक्सिकोमध्ये वनस्पतीशास्त्राचे व पीक निर्मिती शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले.[ संदर्भ हवा ] या काळात हायब्रीड मका, तांब्या रोगाला तोंड देणारा, पावसाळ्यात, उन्हाळ्यात व थंडीत बर्फालाही तोंड देईल असा गहू, अधिक उत्पादन देणारे सोयाबीन आणि घेवड्याचे उत्पादन, कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी जात, आदींवर संशोधन करून मेक्सिकोमध्ये त्यांनी हरित क्रांती घडवून आणली. मेक्सिकन सरकारने खानखोजे यांना कृषिसंचालक म्हणून नेमले होते.[ संदर्भ हवा ]

मेक्सिकोतील शिक्षण खात्याच्या संग्रहालयाच्या भिंतीवर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष व इतर थोर व्यक्तींच्या भव्य भित्तीचित्रांच्या पंक्तीत डॉ.खानखोजे यांचे म्यूरल असून चित्राच्या शिरोभागी स्पॅनिश भाषेत 'आता गोरगरिबांनाही भाकर मिळेल' असे लिहिले आहे.[ संदर्भ हवा ]

मेक्सिकोत सहकारी तत्त्वावर शेती करण्यासाठी डॉ. खानखोजे यांनी शेतकरी संघ स्थापन केले. मका व जंगली वनस्पतीचे संकर करून तेवो-मका ही नवी जात निर्माण केली. त्यात एकेका ताटावर तीस-तीस कणसे येऊ लागली. जंगली वालावर संशोधन करून वर्षांतून दोनदा पीक देणारी जात विकसित केली.[ संदर्भ हवा ] शेतकऱ्यांना पिकांची लागवड करता यावी म्हणून स्पॅनिश भाषेत वीस पिकांवर पुस्तिका छापल्या. नपुंसकांवर इलाज करण्यासाठी पूर्वी माकडांच्या ग्रंथीतून हार्मोन्स मिळवली जात. पण लोकांनी ओरड केल्यावर हे थांबवावे लागले; परंतु यावर उपाय म्हणून डॉ. खानखोजे यांनी मध्वालू या जंगली वनस्पतीपासून अशी हॉर्मोन्स मिळवली.[ संदर्भ हवा ] मसाल्याचे अनेक पदार्थ त्यांनी मेक्सिकोत उगवून दाखवले. ते स्वतः शाकाहारी असल्याने त्यांनी जेवणात अनेक नवीन पाककृती विकसित केल्या.

क्रांतिकारक खानखोजे संपादन

पांडुरंग खानखोजे यांना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा दिली. १९०८ सालापासूनच त्यांचा संबंध स्वातंत्र्य चळवळीशी आला व अमेरिकेत गेल्यावर त्यांनी गदर पक्ष स्थापन करण्यात पुढाकार घेतला. जगात अनेक ठिकाणी फिरून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी देशाबाहेरून प्रयत्न केले. यांनी जपान मध्ये बॉम्बविद्या प्रशिक्षण घेतले होते.[ संदर्भ हवा ]

आपण शेतीसंबंधी जे ज्ञान मिळवले ते भारतीयांच्या कामाला यावे अशी तीव्र इच्छा खानखोजे यांना होती. पण भारत स्वतंत्र व्हावा ही इच्छा त्याहीपेक्षा तीव्र असल्याने त्यांनी शाळेत असल्यापासून विद्यार्थ्यांची संघटना बनवून ब्रिटिशांविरुद्ध जनमत तयार केले. मग त्यांनी जपान, अमेरिका, जर्मनी आणि मेक्सिकोत जाऊन तेथेही हे कार्य त्यांनी चालू ठेवल्याने ते भारतात परतले तर त्यांना पकडून तुरुंगात डांबायला ब्रिटिश सरकार टपले होते. त्यामुळे जरी त्यांचे भाऊ,आई व वडील वारले तरी त्यांना भारतात परत येता आले नाही. शिवाय त्यांच्याकडे भारतात परत यायला ब्रिटिश पासपोर्टही नव्हता.[ संदर्भ हवा ]

भारताला स्वातंत्र मिळाल्यावर, १९४९ साली तेव्हाच्या मध्यप्रांताचे कृषिमंत्री रा. कृ. पाटील यांनी मध्य प्रांतातील शेती सुधारण्यासाठी यांत्रिक पद्धती, सहकारी शेती याचा अवलंब करण्यास कितपत वाव आहे हे पाहण्यासाठी डॉ. खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली एक कृषी समिती नेमून त्यांना भारतात बोलावले. त्यांनी आपल्याकडे दिले जाणारे शेतीचे शिक्षण किती उपयोगाचे आहे, त्यात संशोधनास किती वाव आहे, शेतीवर काही प्रयोग करण्यासाठी प्रायोगिक शेते आहेत का, शेतीतील सुधारणा खेडोपाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची काही सोय केली आहे का, शेतीचे यांत्रिकीकरण करणे इष्ट आहे का, अल्पभूधारकांनी सहकारी तत्त्वावर शेती करावी का हे सगळे ठरवण्यासाठी भारतभर हिडून शेतीचे निरीक्षण केले. २८९ शेतकरी व ८२ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून त्यांनी सामूहिक शेतीचे प्रयोग सुरू करण्याचे सुचविले. हिंदी-मराठीत पुस्तिका काढायचेही सुचविले. पण मेक्सिकोमध्ये खानखोजे यांना जेवढे काम करता आले तेवढे भारतात करता न आल्याने ते असंतुष्ट राहिले.[ संदर्भ हवा ]

१९५५साली डॉ. पांडुरंग खानखोजे कायमचे भारतात आले आणि नागपूरमध्ये स्थायिक झाले.[ संदर्भ हवा ]

चरित्र संपादन

  • पांडुरंग खानखोजे यांची कन्या डॉ. सावित्री सहानी यांनी त्यांच्यावर 'क्रांती आणि हरितक्रांती' असे एक पुस्तक लिहिले आहे.[ संदर्भ हवा ]
  • वीणा गवाणकरांनीही 'डॉ.खानखोजे-नाही चिरा..' या नावाने त्यांचे चरित्र लिहिले आहे.[ संदर्भ हवा ]
  • मी कधीही माफी मागणार नाही (ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग खानखोजे यांचे चरित्र - मेहता प्रकाशन)[ संदर्भ हवा ]

मेक्सिको देशातील शापिंगो येथील नॅशनल स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर विद्यापीठात डॉ. खानखोजे यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. ज्याचे अनावरण लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले.[१][२][३]

भारतीय

पुरस्कार आणि सन्मान संपादन

. मेक्सिकन सरकारने 1930 सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनसाठी असणारा पुरस्कार देऊन डॉ. खानखोजेंचा गौरव केला.[ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा संपादन

  1. ^ a b c "डॉ. पांडुरंग खानखोजे यांचा मेक्सिकोत उभारला पुतळा". दैनिक लोकमत. Archived from the original on ७ सप्टेंबर २०२२. ८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "विश्लेषण : महाराष्ट्राच्या सुपुत्राचा मेक्सिकोत पुतळा, कोण होते स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग खानखोजे?". Loksatta. 23 August 2022. 23 August 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Singh, Rishika (22 August 2022). "Explained: Who was Pandurang Khankhoje, Ghadarite revolutionary and a hero of Mexico?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 23 August 2022 रोजी पाहिले.