जयकृष्ण केशव उपाध्ये (३० मे, इ.स. १८८६:नागपूर, महाराष्ट्र, भारत - १ सप्टेंबर, इ.स. १९३७:नागपूर) हे एक मराठी कवी होते. त्यांनी उमर खय्याम यांच्या फारसी रुबायांचे मराठी अनुवाद केले आहेत.

उपाध्ये यांचा बालपणापासूनच अध्यात्माकडे ओढा होता. वयाच्या २३व्या वर्षी वर्ध्याजवळच्या हनुमानगड येथे जाऊन त्यांनी तीन वर्षे रामाचा जप केला होता. तीर्थयात्रा करीत त्यांनी बरेच देशभ्रमण केले. पत्‍नी आणि मुलीच्या अकाली मृत्यूमुळे त्यांना एकाकीपण आणि उदासीनता प्राप्त झाली होती. अशा वृत्तीमुळे लोक त्यांना बुवा म्हणून ओळखत.

काव्यलेखन

संपादन

उपाध्ये यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी कविता करायला प्रारंभ केला. विषयांची विविधता आणि श्लेषयुक्त सफाईदार रचना हे त्यांच्या काव्याचे विशेष होते. त्यांच्या काव्यांत शृंगार, विनोद, विडंबन, स्वधर्मप्रेम व राष्ट्रभक्ती हे सर्व आढळते. ’श्रीरामराज्याभिषेक’, ’जगन्मोहिनी’, ’अहिल्याकृत रामस्तुती’, ’द्रौपदीचा धावा’ या त्यांच्या भक्तिपर कविता. मुलीच्या निधनाचे दुःख अत्यंत आर्त गीतातून व्यक्त करणारी ’लीले’ ही विलापिका त्यांनी लिहिली. ’चहाटळपणा’, ’कविते करिन तुला मी ठार’ ’चालचलाऊ गीता’, ’बावळट बाळू’ यांसारख्या विनोदी आणि विडंबनात्मक कविताही त्यांनी लिहिल्या.

’वागीश्वरी’, ’विहंगम’ इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या उपाध्ये यांच्या काही कविता कोणत्याही पुस्तकांत समाविष्ट होऊ शकल्या नाहीत. जाहीर कवितागायन करणारे नागपूर भागातील आद्य प्रवर्तक म्हणूनही ज.के. उपाध्ये ओळखले जातात. कवी राजा बढे हे त्यांचे शिष्य होते.

ज.के. उपाध्ये यांचे काव्यग्रंथ

संपादन

ज.के. उपाध्ये यांची एक ध्वनिमुद्रित झालेली कविता

संपादन

विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचने ही गोड गोड देशि जरी आता ॥धृ।।

दृष्टिआड झाल्यावर सृष्टिही निराळी
व्यवसायहि विविध विविध विषय भोवताली
गुंतता तयांत कुठें वचन आठवीता ? ॥१॥

स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा
वशहि वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केविं जसा होता ॥२॥

स्वत्वाचे भान जिथें गुंतल्या नुरावे
झुरणारे हृदय तिथे हे कुणी स्मरावे
होइल उपहास खास, आंस धरू जाता ॥३॥

अंतरिची आग तुला जाणवूं कशाने?
बोलावे न वेदनाच वचन दुःख नेणे
याकरता दृष्टिआड होऊं नको नाथा ॥४॥

अन्य कविता

संपादन
  • कुणि काहि म्हणा (गायिका - कृष्णा कल्ले, संगीत - यशवंत देव
  • रामचंद्र मनमोहन नेत्र (गायिका - माणिक वर्मा, संगीत - व्ही.डी. अंभईकर)
  • हा नाद ओळखीचा गं (गायक-संगीत दिग्दर्शक - गजानन वाटवे]])

संदर्भ

संपादन

https://www.esakal.com/saptarang/saptarang-latest-marathi-article-by-dr-neeraj-deo-on-marathi-poet-jaykrushna-upadhye-nashik-news-psl98 [लिले विकल अन् विफल विलाप; डाॅ नीरज देव]