जॉन स्टुअर्ट मिल

(जॉन स्ट्युअर्ट मिल या पानावरून पुनर्निर्देशित)

जॉन स्ट्युअर्ट मिल हा ब्रिटिश तत्त्वज्ञ, राजकीय अर्थशास्त्रज्ञ आणि प्रशासकीय सेवक होता. सामाजिक सिद्धांत, राजकीय सिद्धांत आणि राजकीय अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये त्याने मोलाची भर घातली. नकारात्मक स्वातंत्र्याचा उद्गाता, नाखूश लोकशाहीवादी आणि उपयुक्ततावादाचा पुनर्विचारक म्हणून तो ओळखला जातो.

जॉन स्टुअर्ट मिल
जन्म नाव जॉन स्ट्युअर्ट मिल
जन्म २० मे, इ.स. १८०६
पेंटॉनविले, लंडन, इंग्लंड
मृत्यू ८ मे, इ.स. १८७३
अ‍ॅविग्नन, फ्रान्स
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्र तत्त्वज्ञान, साहित्य
भाषा इंग्रजी
विषय मार्क्सवाद

तत्त्वज्ञान

संपादन

जॉन मिलने उपयुक्ततावादात सुधारणा करताना सुखाच्या गुणालाही महत्त्व दिले. ‘समाधानी डुक्कर असण्यापेक्षा असमाधानी माणूस असणे चांगले; मूर्ख बनून समाधानी असण्यापेक्षा सॉक्रेटिस बनून असमाधानी असलेले चांगले.’ या मिलच्या उद्गारात पुढील गोष्टी गर्भित आहेत : सुखाच्या गुणामध्ये फरक असतो; माणूस पशूंहून वेगळा आहे आणि माणसा-माणसांमध्येही गुणात्मक फरक आहेत.

बेंथमने स्वातंत्र्यापेक्षा उपयुक्ततेला महत्त्व दिले होते. मिल मात्र स्वातंत्र्यालाच एक स्वयमेव साध्य मानतो. स्वातंत्र्याचे महत्त्व तो अधोरेखित करतो. जॉन मिल हा ‘पोकळ स्वातंत्र्याचा भाष्यकार’ आणि ‘अमूर्त व्यक्तिवादाचा दूत’ मानला जातो. (एडमंड बार्कर) अन्यनिष्ठ कृत्ये आणि स्वयंलक्ष्यी कृत्ये असा फरक करून मिल अन्यनिष्ठ कृत्ये शासकीय कायद्यांच्या कचाट्यात आणतो आणि स्वातंत्र्याचे वर्तुळ मर्यादित करतो म्हणून बार्करने त्याला ‘पोकळ स्वातंत्र्याचा भाष्यकार’ म्हणले आहे. स्वयंनिष्ठ कृत्यांमध्येही मिलने शासनाच्या चंचुप्रवेशाला जागा ठेवली आहे – एखादा माणूस स्वतःचेच नुकसान करून घेत असेल तर शासन त्याला तशा कृत्यापासून रोखू शकते असे मिल म्हणतो.

‘दुसऱ्या व्यक्तीचे मत दाबून ठेवण्यात काहीही लाभ नसतो.’ ‘स्वतःपुरता, स्वतःच्या शरीर आणि मनासंदर्भात माणूस सार्वभौम आहे.’ : स्वयंनिष्ठ कृत्यांच्या बाबत माणूस पूर्ण स्वतंत्र आहे असे मिलला सुचवायचे आहे.

लोकशाही

संपादन

जॉन मिल हा ‘नाखूश लोकशाहीवादी’ म्हणून ओळखला जातो. लोकशाही यशस्वी होण्यासाठी खास वातावरण असणे आवश्यक असते. ब्रिटिशांच्या वसाहतींमध्ये तसे वातावरण नसल्याने तिथे लोकशाही असू नये असे मिलचे मत होते. सर्वांनाच समानतेने वागविणारी लोकशाही ही मिलच्या मते फसवी लोकशाही ठरते. शिक्षितांच्या मताला जास्त वजन असावे आणि विद्वानांना लोकशाहीत खास जागा असावी तरच ती अर्थपूर्ण ठरते असे मिलचे मत होते. प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व आणि बहु-मतपद्धतीने (एका व्यक्तीला एकाहून अधिक मते) लोकशाहीचे संरक्षण केले जावे असे मिलचे म्हणणे होते. दुसरा कोणताही शासनप्रकार स्वातंत्र्याचे रक्षण करू शकत नसल्याने मिलचा प्रत्यक्ष लोकशाहीला (आणि ती आता शक्य नसल्याने) प्रातिनिधिक लोकशाहीला पाठिंबा आहे.

कोणत्या प्रकारच्या समाजांमध्ये ती उपयुक्त ठरेल अशासारखे निकष घालून दिलेले असल्याने सी. एल. वायपर मिलला ‘नाखूश लोकशाहीवादी’ म्हणतो. लोकशाही ही शतकानुशतके चाललेल्या संघर्षातून जन्माला आलेली आहे. फुकट वाटण्याजोगे ते बक्षीस नाही असे मिल म्हणतो. शिक्षितांच्या मताचे मूल्य जास्त, द्विहृही कायदेमंडळे, निर्णयकर्त्यांवर मतदारांची बंधने नसावीत असा आग्रह इ. गोष्टींमुळेही त्याची ‘नाखुशी’ स्पष्ट होते.

प्लेटोनंतर स्त्रियांच्या अधिकारांविषयी बोलणारा जॉन मिल पहिलाच. १८६७ मध्ये त्याने कायदेमंडळात महिलांना मताधिकार देण्यासाठीचे विधेयक मांडले होते पण ते फेटाळले गेले.

नागरिकांमध्ये पुढील गुण असावेत : लोकशाहीप्रती निष्ठा; तो शासनप्रकार स्वीकारण्याची तयारी आणि राजकीय व्यवस्थेप्रती असणाऱ्या आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी. अखंड सावधनता ही लोकशाहीची किंमत आहे असे मिल म्हणतो. राजकीय अर्थव्यवस्थेसंबंधीचे त्याचे विचार तो ‘संक्रमणकाळाचा विचारवंत’ असल्याचे स्पष्ट करतात. तो भांडवलदारांचा विरोधक नाही. भूमी मर्यादित आहे. भूस्वामी भाडे वाढवितात त्यामुळे भांडवलदारांचा नफा कमी होतो आणि म्हणून ते मजुरीचे दर कमी करतात असे मिलचे म्हणणे होते. जॉन मिलच्या आयुष्यकाळात समाजवादी आंदोलने जोर धरू लागलेली होती. त्यांचा प्रभाव मिलच्या विचारांवर दिसतो.

हे सुद्धा पहा

संपादन