चिं.गं. गोगटे
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
चिंतामण गंगाधर गोगटे हे मराठी इतिहास लेखक होते. ते मराठी भाषेत किल्ले ह्या विषयावर प्रथमतः पुस्तके लिहिण्यासाठी ओळखले जातात. गोगटेंचा जन्म इ.स.१८६६ साली तत्कालीन मुंबई प्रांतातील रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप गावी झाला. ते वयाच्या अठराव्या वर्षी शिक्षण पूर्ण करून रेल्वे खात्यात नोकरी करू लागले. गोगटे यांचा कल जास्त करून इतिहास या विषयाकडे होता. १८८५ सालापासून त्यांनी किल्ले पाहण्यास व किल्ल्यांवरील अवशेषांच्या नोंदी करण्यास सुरुवात केली. साधारणतः १०० पेक्षा अधिक किल्ले त्यांनी पदभ्रमण करून पाहिले. पुणे, सातारा व कुलाबा (म्हणजेच रायगड) ह्या जिल्ह्यातील किल्ल्यांवर लेखन करून पहिले पुस्तक महाराष्ट्र देशातील किल्ले ह्या नावाने इ.स.१८९६ साली प्रकाशित केले. १९०५ साली ह्या ग्रंथाची दुसरी आवृत्ती काढण्यात आली. १९०७ साली ह्या ग्रंथाचा पुढिल भाग महाराष्ट्र देशातील किल्ले भाग २ प्रकाशित झाला. यामध्ये ठाणे, रत्नागिरी ह्या जिल्ह्यातील तसेच तत्कालीन सांगली संस्थान, कोल्हापूर संस्थान, सावंतवाडी संस्थान ह्या भागातील किल्ल्यांचा समावेश होता. गोगटेंनी ह्या दोन खंडांमधून एकूण १७२ किल्ल्यांची थोडक्यात माहिती दिली आहे. मराठी भाषेतील किल्ले ह्या विषयावरील पहिली पुस्तके म्हणून ही गोगटेंची ही दोन पुस्तके ओळखली जातात.[१]
खानदेश, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, विजापूर, बेळगाव, धारवाड ह्या जिल्ह्यातील किल्ल्यांवर लेखन करून तिसरा भाग प्रसिद्ध करण्याचा गोगटेंचा विचार होता. पण हा ग्रंथ प्रकाशित झाला का नाही, ह्या बाबत काहीही माहिती उपलब्ध नाही.
बाळाजी विश्वनाथ पेशवे, नानासाहेब पेशवे, औरंगजेब, थोरले शाहू महाराज ह्यांची चरित्रेही गोगटेंनी लिहिली होती.
चिं.गं.गोगटे यांची पुस्तके
संपादन- छत्रपती थोरले शाहूमहाराज यांचे चरित्र, १८९४
- औरंगजेब बादशाहाचें चरित्र - पूर्वभाग, प्र.आ.१८९६[२], च.आ.१९१२[३]
- महाराष्ट्र देशातील किल्ले अथवा महाराष्ट्रातील किल्ल्यांचे वर्णन - भाग पहिला, १८९६, १९०५
- महाराष्ट्र देशातील किल्ले - भाग २ रा , १९०७[४]
- श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचे चरित्र , १९०८[५]
- शालोपयोगी हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास , प्र.आ.१९०७, द्वि.आ.१९०९[६], तृ.आ.१९१६
- मुसलमानी अंमलाचा इतिहास, १९१०
- बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे चरित्र, १९११
संदर्भसूची
संपादन- ^ गोगटे, चिं.गं. (२०१९). महाराष्ट्र देशातील किल्ले (भाग १ व २). श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशन. pp. Page ५-७.
- ^ गोगटे, चिंतामण (१८९६). औरंगजेब बादशाहाचें चरित्र - पूर्वभाग (प्रथम आवृत्ती ed.). पुणे: चिंतामण गंगाधर गोगटे.
- ^ गोगटे, चिंतामण (१९१२). औरंगजेब बादशाहाचें चरित्र - पूर्वभाग (चतुर्थ आवृत्ती ed.). पुणे: चिंतामण गंगाधर गोगटे.
- ^ गोगटे, चिंतामण (१९०७). महाराष्ट्र देशातील किल्ले, भाग २ रा (PDF) (प्रथम आवृत्ती ed.). पुणे: चिंतामण गंगाधर गोगटे.
- ^ गोगटे, चिंतामण (१९०८). श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचे चरित्र (प्रथम आवृत्ती ed.). पुणे: चिंतामण गंगाधर गोगटे.
- ^ गोगटे, चिंतामण (१९०९). शालोपयोगी हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास (PDF) (दुसरी आवृत्ती ed.). पुणे: चिंतामण गंगाधर गोगटे.