चिंतामणराव व्यापार महाविद्यालय (सांगली)

(चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली या पानावरून पुनर्निर्देशित)

चिंतामणराव व्यापार महाविद्यालय हे सांगली शहरातील एक महाविद्यालय आहे.

महाविद्यालयाची मुख्य इमारत

स्थापना संपादन

चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाची स्थापना २० जून १९६० रोजी झाली. आपल्या सांगलीच्या प्रजाहितदक्ष व दानशूर पद्मभूषण श्रीमंत चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन राजेसाहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेने व व्यापार - उदिमातील जाणकारांनी 'गौरवनिधी' जमवला , त्यात श्रीमंत राजेसाहेबांनी स्वतःची एक लक्ष रुपयांची भर घातली आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीला या ठिकाणी व्यापार महाविद्यालय सुरू करण्याचे आवाहन केले. यासंदर्भात त्यावेळच्या 'रोटरी क्लब ऑफ सांगली' ने पुढाकार घेतला आणि हा रोटरीचा एक महत्त्वाकांक्षी शैक्षणिक उपक्रम म्हणून हाती घेण्यात आला.दक्षिण महाराष्ट्रातील व्यापार उदिमाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ज्या धुरिणांनी सांगली येथे व्यापार महाविद्यालय सुरू व्हावे, ही मोठी दूरदृष्टी दाखवली.[१]

 
महाविद्यालायाची पशिमे कडील बाजू

नेतृत्व संपादन

आपल्या महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य म्हणून प्रा. देवदत्त दाभोळकर यांनी अत्यंत समर्थपणाने मुहूर्तमेढ रोवली. अतिशय अभ्यासू, प्रशासनकुशल, समाजाभिमुख, असलेल्या प्राचार्य दाभोळकर सरांच्या विलक्षण नैतिक अधिष्ठानामुळे महाविद्यालयाचा भक्कम पाया घातला गेला. उद्घाटनप्रसंगी तत्कालिन उपराष्ट्रपती आणि थोर तत्त्वचिंतक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शुभाशिर्वाद खूप मोलाचे ठरले.

प्राचार्य दाभोळकर सरांच्या नंतर आपल्या महाविद्यालयाला अत्यंत कार्यक्षम, दूरदर्शी, प्राचार्यांची मालिकाच प्राप्त झाली. त्यामुळे आपल्या महाविद्यालयाची सर्वांगीण प्रगती झपाटयाने झाली आणि जनमानसात नावलौकिक निर्माण झाला. स्वतंत्र ग्रंथालयाची देखणी वस्तू, ग्रंथालयामध्ये काळजीपूर्वक केलेली ग्रंथांची भर, विस्तीर्ण क्रीडांगणाचा तसेच दादुकाका भिडे पॅंव्हेलियनची स्थापना वाढत्या व्यापानुसार निर्माण केलेल्या वर्ग खोल्या व वेलणकर हॉलची निर्मिती तसेच संगणक प्रयोगशाळा या साऱ्या विकासाच्या पाऊलखुणा गेल्या ५० वर्षातील प्राचार्यांच्या कारकिर्दीचे टप्पेच आहेत. भौतिक साधनसुविधांबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनेकविध उपक्रम राबवले गेलेले आहेत. त्यामुळे आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या बि.कॉम, एम.कॉम, डी.बी.एम. आणि अलीकडच्या बी.बी.ए. या अभ्यासक्रमांच्या परिक्षांमध्ये प्रतिवर्षी विद्यार्थी-विद्यार्थीनीनी घवघवीत यश संपादन केलेच परंतु मैदानी खेळात तसेच सांस्कृतिक उपक्रमात मोठे नाव मिळविलेले आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ वाघमारे, प्रा. ए. बी. (२०१०). सुवर्णमहोत्सव स्मरणिका. सांगली: चिंतामणराव व्यापार महाविद्यालय. pp. ८.