घागरा नदी
(घागरा या पानावरून पुनर्निर्देशित)
गंगेला हिमालयातून येऊन मिळणारी एक प्रमुख उपनदी. घोग्रा, घाघरा, देहवा, शरयू इ. नावांनीही प्रसिद्ध. ही तिबेटात राक्षसताल सरोवराजवळ ३०० ४०' उ. व ८०० ४८' पू. येथे उगम पावून नेपाळातून कर्नाली म्हणून वाहते. गिरवा व कौरिआल हे तिचे फाटे उत्तर प्रदेशात एकत्र झाल्यावर ती घागरा होते. हिच्या बदलत्या पात्रात वाळूचे दांडे व अनेक प्रवाह दिसतात. गंगा व हिमालय यांदरम्यानच्या अवध मैदानाची ही प्रमुख नदी आहे.
श्रीरामाची अयोध्या हिच्याच काठी आहे. शारदा, राप्ती व छोटी गंडक या तिच्या मुख्य उपनद्या होत. फैजाबाद, अयोध्या, तांदा, बरहज यांवरून जाऊन बिहारमध्ये छप्राजवळ ती गंगेला मिळते. घागरेचे खोरे समृद्ध असून नलिकाकूपांनी उत्पादन वाढले आहे. अयोध्येच्या खाली हिच्यामधून थोडीबहुत वाहतूक होते.