गौतमीपुत्र कांबळे (२ जून १९४९). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार आणि फुले-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते. गौतमीपुत्र कांबळे हे स्वतःची एक निश्चित वैचारिक आणि वाङ्मयीन भूमिका घेऊन जगणारे आणि लिहिणारे लेख़क आहेत. त्यांचा जन्म हारोली जि. सांगली येथे झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण देशिंग हारोली जि. सांगली येथे झाले. पदवी पर्यंतचे शिक्षण मिरज येथे तर पदव्युत्तर शिक्षण सांगली येथे झाले. त्यांनी मराठी आणि तत्त्वज्ञान या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ते फुले-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते असून त्यांनी सामाजिक व शैक्षणिक चळवळीसाठी सारे जीवन समर्पित केले आहे. फुले-आंबेडकरी विचारधारा, बौद्ध संस्क़ृतीतील मूल्ये, शिक्षण, साहित्य, समीक्षा, तत्त्वज्ञान हे त्यांच्या व्यासंग आणि लेखनाचे, चिंतनाचे विषय आहेत. त्यांनी असंख्य चर्चासत्र, परिषदा, परिसंवाद, मेळावे, साहित्यसंमेलन या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य केले आहे.

गौतमीपुत्र कांबळे यांचा परिव्राजक  (२००४) हा पाच कथांचा पहिलाच कथासंग्रह प्रकाशित झाला आणि संपूर्ण मराठी साहित्यक्षेत्राचे लक्ष वेधले गेले. एकच कथासंग्रह असला तरी त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात अत्यंत दर्जेदार,कसदार दमदार पाऊल टाकले आहे. आधुनिक मराठी कथेच्या इतरांनी चोखाळलेल्या पायवाटा जिथे संपतात, त्याच्या पुढच्या टप्प्यावरून गौतमीपुत्र कांबळे यांच्या कथांची आगळी वेगळी पायवाट सुरू होते असे प्रस्तावक विधान त्यांच्या कथांसंदर्भात समीक्षक आणि लेखक राजा ढाले यांनी केले आहे. या कथासंग्रहातील कथा, परिव्राजक, शिल्पासन, विरुपनगरी, शोध सहाव्या इंद्रियाचा या पाचही कथांमध्ये जाणीवपूर्वक जपलेले वेगळेपण जाणवते. ‘कथा’ या कथेत टोकाचा अस्वस्थपणा हा कलावंताच्या दृष्टिकोणातून अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण या अस्वस्थपणातच नवनिर्मितिची बिजे रुजलेली असतात, हे सांगणारे विधान मांडून साहित्य निर्मिती प्रक्रियेवरती प्रकाश टाकला आहे.

‘परिव्राजक’ या कथेत सगळं नगरच आपलं घर बनलयं या विधानातून एक व्यापक दृष्टिकोण सूचित होतो. सत्याच्या, ज्ञानाच्या शोधार्थ बाहेर पडलेला हा परिव्राजक – नैसर बुद्ध तत्त्वज्ञानाच्या शोधासाठी आपले संपूर्ण आयुष्य उधळतो. या प्रवासात त्याला माणसांच्या जंगलात दोन पायाच्या मनुष्याच्या शोधात फिरणारी अनिशा भेटते. त्या दोघांचा शोध एकाच ठिकाणी कसा पूर्ण होतो हे दर्शवणारी ही कथा आहे. कथेचा शेवट हा विचारप्रवर्तक आणि परिणामकारक असून वाचकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतो. ‘शिल्पासन’ या कथेच्या सुरुवातीला ईडफ्रा व मोणार्क वाळवंटाची हिरवळ करणाऱ्या अप्रतिम शिल्पासनाच्या शोधात प्रवास करतात याचे चित्रण आलेले आहे. मोणार्क च्या आजीने सांगितलेली ‘बाहुली व तीन मित्रांची कहाणी’ एकाच कहाणीत अनेक कहाण्या, यांची गुंफण यातून सहजासहजी बाहेर पडणे शक्य होत नाही. ‘विरुपनगरी’ या कथेत सुरुवातीला प्राचीन परंपरा व अवशेष यांचे जतन करत नदीच्या ठिकाणी वसलेल्या विरुपनगरीची माहिती चित्रित केली आहे. यातील आकाशनदी व विरुपनगर या ठिकाणांना मानवी भावभावनांच्या वापरलेल्या प्रतिमांतून या ठिकाणांचा जिवंतपणा चित्रित केला आहे. या कथेत कालवडीची प्रथा बंद करून अहिंसेचे-प्रेमाचे मूल्य रुजवू पाहणारे अर्हत व त्यांना विरोध करणारे सनातनी परंपरावादी लोक यांच्यातील संघर्ष चित्रण केले आहे. या कथेचा शेवट आशावादी असून सर्व नगरवासीय विस्मरणात गेलेल्या धम्मपथावर उपोसथी पावलांनी आरूढ होतात. जग हे धम्मराज्य बनविण्यासाठी कटिबद्ध होतात.

‘शोध सहाव्या इंद्रियाचा’ या कथेची सुरुवातच पूर्वकथन पद्धतीने केलेली आहे. सहाव्या इंद्रियाच्या शोधाने अस्वस्थ झालेला निकाय आणि शरीराचा उचित वापर करून जीवन अर्थपूर्ण बनविण्याचा सल्ला देणारे अर्हत यांच्यावर ही कथा प्रकाश टाकते. संगीत, चित्रकला, नृत्यकला या विविध कलांचे संदर्भ लेखकाच्या अथक परिश्रमाची साक्ष देतात. यातून कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोण प्राप्त होतो. कथेतील करुणेचे सत्य स्वरूपात दर्शन झाल्याने हसणारी सालविना,अर्हंतांच्यामुळे निकायच्या डोक्यात पडलेला प्रज्ञेचा प्रकाश व या दोघांना सम्यकदृष्टीचे दर्शन घडविणारे अर्हत वाचकांच्या अंतःकरणाचा ठाव घेतात. कथेमध्ये आलेल्या अनेक कहाण्या, उपकहाण्या विविध कलांचे संदर्भ, धम्मतत्त्वज्ञानाची चर्चा, प्राचीन संदर्भ कथेला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जातात.

गौतमीपुत्र कांबळे सांप्रत सेक्युलर व्हिजन  या मासिकाचे संपादक आहेत. याचबरोबर सेक्युलर मुव्हमेंट, महाराष्ट्र, फुले आंबेडकर शाहू टीचर्स असोशिएशन (फास्टा), कोल्हापूर येथे अध्यक्ष म्हनून कार्यरत आहेत. तसेच सेक्युलर आर्ट मुव्हमेंट येथे महाराष्ट्र समन्वयक म्हणून धुरा सांभाळत आहेत. कांबळे यांनी विविध साहित्य संमेलन, परिषदांचे अध्यक्षस्थान भुषविले आहे. फुले आंबेडकरी साहित्य संमेलन, कल्याण २००२, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर, आयोजीत साहित्य संमेलन, गुंडेवाडी(सांगली) २०११, अल्पसंख्यांक परिषद, सांगली २००८ इ. ठिकाणी त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले आहे. परिव्राजक  या कथासंग्रहास अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत .महाराष्ट्र शासन उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक, बाबुराव बागूल पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार, इत्यादींचा समावेश होतो. परिव्राजक या कथासंग्रहाचा अनेक ठिकाणी अभ्यासक्रमात समावेश झाला होता.

गौतमीपुत्र कांबळे यांनी परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करताना प्रत्यक्षात आलेले अनुभव, निर्माण झालेल्या समस्या, दुःखाने घेरलेली माणसे समजून घेण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना आपल्याला पक्क भान असलेली विचारप्रणाली, तत्त्वज्ञान परिव्राजक या कथांमधील कथांच्या रुपांतून वाचकांसमोर आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. म्हणून केवळ फुले-आंबेडकरीकथेच्या क्षेत्रातच नव्हे तर अखिल मराठी कथाकारांच्यामध्ये त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.