डॉ. गो.बं. देगलूरकर (जन्म : इ.स. १९३४) हे मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांनी मराठवाड्यातील अन्वा, निलंगा आणि औंढ्या नागनाथ येथील अनेक मंदिरांतील मूर्तींचा अभ्यास केला आहे.

जन्म आणि शिक्षण

संपादन

गो.बं. देगलूरकरांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा येथे परमभागवत देगलूरकर घराण्यात झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. पदवी परीक्षेसाठी त्यांनी इतिहास हा विषय घेतला आणि पदव्युत्तर पदवीसाठी त्यांनी प्राचीन इतिहास व पुरातत्त्वशास्त्र असे विषय घेतले.

पीएच.डी.साठी कल्चरल हिस्ट्री ऑफ मराठवाडा हा विषय त्यांनी निवडला. यात मराठवाडा हाच मराठी संस्कृतीचा स्रोत आहे असे मत त्यांनी मांडले.

नोकरी

संपादन

देगलूरकर यांनी उस्मानिया विद्यापीठात तसेच नागपूर विद्यापीठात अध्यापन केले आहे. यानंतर त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये नोकरी स्वीकारली व कालांतराने ते डेक्कन कॉलेजचे कुलगुरू झाले.

२०१४ साली सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर दुर्ग साहित्य संमेलन झाले. तिथे देगलूरकर संमेलनाध्यक्ष होते.

देगलूरकर यांनी मूर्तिविज्ञान या विषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत.

गो.बं देगलूकरांचे मूर्ती आणि मूर्तिशास्त्र विषयक विचार

संपादन

मूर्तिशास्त्र हा समाजाभिमुख विषय आहे; सर्वसामान्यांच्या जीवनाच्या विविध अंगांशी निगडित आहे. मूर्तीमागे सामाजिक घडामोडी असतात. मूर्तिपूजक समाज लोकशाहीवादी असतो. जगातील सर्व सनातन धर्मीय हे एकेश्वरवादी आहेत. तसेच सर्वधर्मीय लोक मूर्तिपूजकच आहेत.[ संदर्भ हवा ]

व्यक्त, अव्यक्त, व्यक्ताव्यक्त हे मूर्तीचे प्रकार शास्त्रांत सांगितले आहेत. कोणत्याही प्रतीकाची कोणत्याही रूपात केली जाणारी आराधना ही मूर्तिपूजाच आहे. [ संदर्भ हवा ]

आपल्याकडे तेहतीस कोटी देव आहेत, असे हिंदू मानतात. वास्तविक हे तेहतीस प्रकारचे देव आहेत.

देगलूरकरांचे सूर्यपूजेसंबंधीचे विचार

संपादन

इराणमध्ये फार पूर्वीपासून सूर्याची पूजा-आराधना होत असे. तिथे मूर्तिभंजक आक्रमक आल्यावर त्यांनी भारताकडे धाव घेतली. भारतातही हिंदूंमध्ये सूर्यपूजा होत होतीच. श्रद्धासाधर्म्यामुळे दोन्ही समाजांना एकत्र येणे शक्य झाले. या सामाजिक सरमिसळीचे स्पष्ट प्रतिबिंब सूर्यप्रतिमांमध्ये दिसते. भारतातील हिंदू हे पूर्वी यंत्ररूपातील सूर्याला किंवा प्रत्यक्ष सूर्याला अर्घ्य अर्पण करून पूजा करीत असत. इराणी जनतेच्या संपर्कामुळे भारतात सूर्याची मानवी रूपातील मूर्ती घडवली जाऊ लागली. प्रारंभीच्या काळातील सूर्यमूर्तीच्या अंगावर विशिष्ट प्रकारचा मुकुट, मेखला, आखूड धोतर आणि गुडघ्यापर्यंत येणारे बूट असा वेश दिसतो. हा इराणमधील मूर्तीवरून घेतलेला आहे.

गो.बं. देगलूरकरांची काही पुस्तके

संपादन
 • घारापुरी दर्शन
 • Temple architecture and sculpture of Maharashtra
 • प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती
 • बिंबब्रह्म आणि वास्तुब्रह्म
 • मंदिर कसे पहावे?
 • मार्कण्डादेव (मार्कंडी)
 • The Mediaeval Temples at Sātgaon
 • विष्णूमूर्ते नमस्तुभ्यम्
 • वेरूळ दर्शन
 • शिवमूर्तये नमः
 • सुरसुंदरी

डाॅ. गो.बं. देगलूरकरांना मिळालेले पुरस्कार

संपादन
 • इतिहासाचार्य न.र.फाटक पुरस्कार
 • के.के.बिर्ला फेलोशिप
 • चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार
 • छत्रपती सेवा प्रतिष्ठानचा जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार
 • श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक व आध्यात्मिक पुरस्कार
 • पुण्यभूषण पुरस्कार (२०१९)
 • विद्याव्यास पुरस्कार
 • सृजन फाउंडेशनचा सृजन कोहिनूर पुरस्कार ((जानेवारी २०१७)
 • स्नेहांजली पुरस्कार