गोंड ही भारतातील प्रमुख आदिवासी जमात आहे. ही आदिवासी जमात महाराष्‍ट्रातील नागपूर, चंद्रपूर,अमरावतीगडचिरोली या जिल्ह्यात प्रामुख्याने वास करते.

Gond women


आर्य येण्याआधी गोंड जमातीचे अस्तित्त्व होते. रामायण, महाभारत काळात गोंड हे वैभवी अस्तित्त्वाचे धनी होते. गोंडांची अतिप्राचीन व समृद्ध भाषा होती. आजही ती आहे. ‘गोंड की कोईतूर’ असा एक सूर गोंड समूहात अलीकडे जोर धरू लागला आहे. परंतु ‘कोईतूर’ हाच मूळ व अचूक शब्द होय. ‘कोईतूर’चा अर्थ होतो माणूस. प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेदा’तदेखील ‘गोंड’ असा शब्दप्रयोग नसून ‘कुयवा’ म्हणजे ‘कोया’ असा शब्द आढळतो. ‘गोंड हे नाव त्यांना इतरांनी दिले आहे’, असे कै. डॉ. इरावती कर्वे यांनी त्यांच्या ‘मराठी लोकांची संस्कृती’ या ग्रंथात म्हणले आहे.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये गोंडी भाषा बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता ही केवळ ‘बोली’ राहिली नसून ‘भाषा’ झाली आहे, कारण तिची लिपी उपलब्ध आहे. व्यंकटेश आत्राम, मोतीरावण कंगाली, विठ्ठलसिंग धुर्वे आणि इतरही अभ्यासकांनी गोंडी लिपी आपापल्या ग्रंथांमध्ये प्रसिद्ध केली आहे. गोंडी भाषेचा शब्दकोश व तिचे व्याकरण यांवरही विपुल साहित्य उपलब्ध आहे. काही सन्मान्य अपवाद वगळता या भाषेच्या भाषाशास्त्राकडे किंवा सौंदर्यशास्त्राकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. लिंग, वचन, काळ, विभक्ती यातही गोंडी स्वयंपूर्ण आहे.

अतिप्राचीन गोंडवनात गोंडी लिपीने आणि गोंडी भाषेने एक समृद्ध राजभाषा म्हणून सन्मान प्राप्त केला होता. मुन्शी मंगलसिंह मसराम यांनी १९१८ साली गोंडी मुळाक्षरे हस्तलिखिताच्या स्वरूपात लिहिली. पुढे त्यांच्या मुलानं, म्हणजे एडी भावसिंग मसराम यांनी, "गोंडी लिपी‘ या नावाने ते हस्तलिखित २ जुलै १९५१ रोजी प्रसिद्ध केले.

१ जून १९५७ रोजी ‘आदर्श आदिवासी गोंडी लिपी बोध’ हे पुस्तक देवनागरी लिपीत प्रकाशित झाले. विठ्ठलसिंग धुर्वे यांनीही "गोंडी लिपी सुबोध‘ नावाचे पुस्तक १९८९मध्ये प्रकाशित केले.

सीताराम मंडाले यांनी मुकुंद गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली २०११ साली गोंडी भाषेचा फॉंट तयार केला. "कोयाबोली‘ नावाच्या पुस्तकाच्या माध्यमातून गोंड समाजाला गोंडी लिपी पाहायला मिळाली. गोंडी भाषेचा फॉंट तयार झाल्याने गोंड समाजाच्या विद्यार्थ्यांना गोंडी भाषेतली पुस्तके मिळणे, परिणामी मातृभाषेत शिक्षण घेणे शक्‍य झाले. यापूर्वी गोंडी भाषा अस्तित्त्वात असूनदेखील ती मुद्रणात आली नव्हती. ती हस्तलिखित स्वरूपात असल्यामुळे या भाषेतल्या लिखाणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ शकत नव्हता. फॉंटमुळे हा अडथळा दूर झाला.

गोंडी भाषेतील काही अपरिचित शब्द

संपादन

अनेक अपरिचित, अर्थवाही व इतर भाषांमध्ये न आढळणारे शेकडो शब्द गोंडी भाषेत आहेत. उदा० अद (तो/ती), इद (हा/ही), एटी (बकरा), उंदी (एक), ओडी (टोपली), कयता (कडू), कर्सना (खेळणे), कस्कना (चावणे), कीस (आग), केंजा (ऐका), ढ‌ुंगाल (उंच), नत्तुरी (लाल), नन (मी), नय (कुत्रा), नल्लानेट (सोमवार), नावा (माझा), नेटी (दिवस), नेंड (आज), पदोमान (जानेवारी), पन्ने (बेडूक), पाटा (गाणे), पुंगार (फूल), बोरोंदा (कमळ), भूम (पृथ्वी), मरका (आंबा), मावा (आमचा/आमचे), येर (पाणी), वतूर (पावसाळा), सटार (विळा), सियाना (देणे), हिनाल (पातळ/बारका),अल्ली(उंदीर),अळमी(म्हैस),मळा(झाड),आखींग(पाने),ईंगे(हो),अल्ले(नाही),जवळी(भात),साळी(भाकर),केंजा(ऐक)इत्यादी.

गोंडी भाषा, संस्कृती आणि साहित्य यांवर लिहिली गेलेली मराठी, हिंदी, गोंडी पुस्तके आणि त्यांचे (लेखक)

संपादन
  • कंकाली (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली - जन्म २ फेब्रुवारी, १९४९; - ३० ऑक्टोबर २०१५)
  • कुवारा भिमाल पेन सार (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • कोया भीडिता गोंडी सगा बिडार (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंड वाणी का पूर्वोतिहास (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंडवाना का सांस्कृतिक इतिहास (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोडवाना कोटदर्शन (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंडवाना गढ़ दर्शन (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंडी नृत्य का पूर्वोतिहास (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंडी भाषा व्याकरण (डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंडी भाषा शब्दकोष भाग १, २ (डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंडी भाषा सीखिए (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंडी लम्क पुन्दान (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंडी लिपी सुबोध (विठ्ठलसिंग धुर्वे)
  • गोंडी संस्कृतीचे संदर्भ (व्यंकटेश आत्राम)
  • चांदागढ़ की महाकाली कली (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • जंगो दाई एवं ग्रामीण देवी देवताओं के भजन (हिंदी-गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • तीन्दाना मांदी (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • ते वारीना पाटांग (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • पारी कुपार लिंगो गोंडी पुनेम दर्शन (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)  :
  • बस्तर की दंतेवाडीन वेनदाई दंतेश्वरी (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • बृहद हिंदी गोंडी शब्दकोष (डॉ. मोतीरावण कंगाली)
  • मराठी गोंडी शब्दकोश
  • मुंडारा हीरोगंगा (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • शम्भु उपासक महाराजा रावण के भजन (हिंदी-गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • सिन्धु घाटी का गोंडी में उद्वचन (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • हाकारा (भुजंग मेश्राम)
  • हिंदी गोंडी शब्दकोश (डॉ. मोतीरावण कंगाली)